***** घोंगडी एक महावस्त्र *****
( जरासा टोचणारा विषय )
जरा थोडंसं बारकाईने पाहिलं तर आजचा विषय जरा प्रत्येकाला थोडासा टोचणारा आहे कारण वस्तूच अशी बहुगुणी आहे की त्याला तोड नाही कारण अन्न, वस्त्र, निवारा या जरी मूलभूत गरजा असल्या तरी प्रत्येक ठिकाणी जराशी आडवी येणारी व खटकणारी गोष्ट ती म्हणजे माणसाचा चॉईस
आता आपण बघू अन्न हे अन्न असतं पण ते कधी चुलीवरचं तर कधी झोपडीतलं असतं कधी फाईव्ह स्टार हॉटेलमधलं किंवा कधी ढाब्यावरचं असतं तसेच निवारा पण काहीना झोपडी पण पुरेशी होती पण काहींना 2 बी.एच.के.किंवा रो हाऊस पण मनात भरत नाही तसेच वस्त्राचं पण आहे अंग झाकण्यापूरचं पण वस्त्र असतं आणि फॅशनच्या नावाखाली पण वस्त्र असतंय तसं आपण पाहू रात्री झोपताना लागणारं अंथरून पांघरून म्हणजे बिछाना एक सुखी शय्या तसं बघायला गेलं तर सामान्याच्या पांघरण्याच्या वस्त्रामध्ये घोंगडे हे सर्वात महत्त्वाचे वस्त्र आहे त्याची त्या क्षेत्रामध्ये सुंबरान या नावाने पण ओळख आहे.
पांघरण्यासोबत अंथरण्यासाठी सुद्धा घोंगडी चा वापर होतो हे मेंढीच्या लोकरी पासून विणले जातं घोंगडी शिवाय आणखी काही लोकरीची वस्त्र आहेत लोकरीच्या वस्त्रांना ऊर्णा वस्त्रही म्हटले जाते घुशा,बुरणुस, पट्टू, धाबळी,कलानीन,कांबळीट,ही या उर्णा वस्त्रांची नावे आहेत वरीलपैकी पट्टू हे सर्वात उंची लोकरीचे वस्त्र मानलं जातं लालसर, तपकिरी,घोड्या सारख्या रंगाचं असायचं या रंगाला तेल्याबोर असं पण नाव आहे धाबळ सुद्धा लोकरीचे पांघरायचे वस्त्र आहे त्याला लोई म्हणतात हे नेहमी शुद्ध समजल्यामुळे सगळ्यात ही वापरलं जातं धाबळ ही घोंगडीपेक्षा वजनाने हलकी व उबदार असते कधीही न धुता हे वस्त्र पवित्र व शुद्ध मानले जाते बुरणुस हे मात्र न विणलेले वस्त्र आहे ते बनवताना पिंजलेल्या लोकरीला खळ लावायची नंतर लाटली जायची शेवटी तिच्यावर दाब दिला जात असे घोंगडी, घोंगडे किंवा कांबळ हे प्राचीन काळापासून वापरले जाणारे अंथरूण व पांघरून आहे
याचा उपयोग ग्रामीण भागामध्ये जास्त होतो घोंगडी हे कच्च्या लोकरी पासून बनवलेले सैलसर विणीचे जाडे भरडे कापड बहुदा काळे किंवा करड्या रंगाचे असते रुंदी साधारण दोन घोंगड्यांच्या पट्ट्या एकत्र केल्या त्या शिवून बनवलेल्या वस्त्राला कांबळा असे म्हणतात आयुर्वेदामध्ये वर्णीलेली उल्लेखनीय असलेली सणासुदीला उपयोगात येणारी आपल्या आजोबाची घोंगडी सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे पारंपरिक खड्डा माग आणि त्यावर घोंगड्या बनवणारे असल ग्रामीण धनगर समाजाचे बांधव कलाकार आज बोटावर मोजण्याइतपत राहिलेले आहेत ही घोंगडी वापरल्यामुळे पाठ दुखी, कंबर दुखी,पासून मुक्ती होते,म्हातारपणासाठी संधिवातापासून भरपूर आरामासाठी, व्यवस्थित रक्ताभिसरण व उच्च रक्तदाब नियंत्रण,निद्रानाश व शांत झोप याबद्दल असणाऱ्या व्याधीपासून मुक्ती, शरीराच्या तपमानावर नियंत्रण व उष्णतेसंबंधीच्या आजारावर मात,पारायण,तळी भंडारा,जागरण गोंधळ,सत्यनारायण, सारखे दैविक विधी यामध्ये घोंगडीला मोलाचा मान असतो पुराणामध्ये ध्यानधारणा योग मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी घोंगडीचे महत्त्व ऋषीमुनींनी सांगितलेले आहे
घोंगडीवर बसून केलेल्या साधनेतून अत्युच्च मानसिक समाधान मिळते श्री गुरुचरित्र पारायण,श्री गुरु लीलामृत इत्यादी सर्व अध्यात्मिक साधना व मंत्राच्या अनुष्ठानसाठी घोंगडी चा उपयोग करतात प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील घराघरात या उबदार घोंगडी चा वापर केला जायचा माण,आटपाडी,नातेपुते,म्हसवड,रुई – बाबीर, चिकलठाण,करमाळा,तुळजापूर,सांगोला,जालना, अशा महाराष्ट्रातील असंख्य गावागावात घोंगडी बनवणारे असंख्य हात या कामांमध्ये गुंतलेले आहेत कारण ही घोंगडी फक्त हस्तकला प्रदर्शनापूरती मर्यादित राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे रानावनात,काट्याकुट्यामध्ये, थंडी, वारा,ऊन,पाऊस, याची तमा न बाळगता काठी हातात आणि अंगावर घोंगडी घेऊन आपला उदरनिर्वाह करणारा समाज म्हणजे धनगर बांधव या समाजाचे खरं पाहायला गेलं तर दोन प्रवाह आहेत एक हटकर व दुसरा खुटेकर हटकर म्हणजे शेळ्या मेंढ्या पाळणारा व दुसरा खुटेकर म्हणजे एका जागी स्थिर राहून घोंगडी विकणारा या समाजाची ही अशी एक खास ओळख आहे
माण,आटपाडी,कोल्हापूर,या भागामध्ये सनगर समाजातील लोक मोठ्या प्रमाणात घोंगडी विणण्याचे काम करतात आता आपण घोंगडीची निर्मिती पाहू घोंगडी ही पारंपरिक हातमागावर विणली जाते त्यासाठी चांगली उबदार लोकर असणे आवश्यक असते चरख्यावर लोकरी पासून सूत काढले जाते घोंगडी साठी लागणाऱ्या लोकरीचे लाकडी मोजणी यंत्रावर माप घेतले जाते त्याला ताना काढणे असे म्हणतात साधारण आठ ते बारा फूट लांबीच्या घोंगड्या बनवल्या जातात एका घोंगडी साठी पाच किलो लोकर लागते वीणायला दोन दिवस लागतात घोंगडी तयार झाल्यावर सुताला पीळ यावा मजबूती यावी यासाठी चिंचुक्याची खळ लावली जाते नंतर दोन-तीन दिवस ती खळ कडक उन्हात वाळवली जाते हातमागावरची घोंगडी आठ ते दहा वर्ष टिकते बाजारपेठेत एका घोंगडीला 1000 ते 5000 रुपयांपर्यंत किंमत मिळते रुई तालुका इंदापूर हे गाव घोंगडी निर्मितीसाठी आणि विक्रीसाठी प्रसिद्ध आहे या घोंगडीच्या विश्वामध्ये सुंबरान, अन मल्हार हे दोन कलेक्शन विशेष मानाचे आहेत अंदाजे सहा किलो वजन असणाऱ्या दोन घोंगड्या सुतळी सारख्या जाड असणाऱ्या 100% लोकरीच्या धाग्यापासून बनवल्या जातात धनगर समाजातील प्रचलित लोककले मधून मल्हारी मार्तंड देवाच्या खांद्यावर असणारी घोंगडी ही 12 kg वजनाची असायची त्या प्रकारच्या अस्सल मानाच्या घोंगड्या बनवणारे कलाकार आज बहुतेक अस्तित्वात नाहीत शुद्ध उबदार लोकरी पासून घरगुती वापरता येतील अशा तयार केलेल्या सुंबरान व मल्हार या घोंगड्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या आहेत
**************************************
प्रस्तुती –किरण बेंद्रे
पुणे
7218439002