*************************************
शेकोटीची धग
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
शेकोटीची धग आणि धगी जवळचं जिणं आणि त्याच्या बसणाऱ्या झळाया हे मी जवळून अनुभवलयं माझा बाप रेल्वेत भीमा नदीवर पंप ड्रायव्हर म्हणून नोकरीला व्हता तो काळ कोळशाच्या इंजिनाचा व्हता आणि साहजिकच नदीवरून पाणी हापसायचं काम बॉयलर वर करावं लागायचं अन रोड साईडचे पोमलवाडी स्टेशन म्हणजे 12-12 घंटे ड्युटी आली अन योगायोगाने रात्रपाळी करताना कडक थंडीत किंवा पावसाच्या रिपरिपित त्या बोचणाऱ्या थंडीमध्ये शेकोटीची असणारी गरज आणि त्याच्या निवाऱ्याला आलेली मासेमारी करणारी माझी भोई मंडळी यांना खरी त्या शेकोटीची गरज नाहीतर आपल्या गल्लीतल्या चार जणांचं टोळकं कोंडाळ करून खरं तर त्यांनी घरी गरम गोधडीत मुस्कटून पडत राहण्याच्या ऐवजी चौकामध्ये रात्री बारापर्यंत फळ्यांची शेकोटी पेटवून गप्पांची मैफल… तंबाखूचा बार… चार सहा कप कटिंग चहाची ऑर्डर देऊन त्या समोरच्या शेकोटीची धग आणि व्हटाला लागलेला गरम चहाचा कप अशी मजा लुटणारी रसिक मंडळी अजून काय सांगावं त्या शेकोटीचं कवतीक
काही वेळेला नाही तो वाह्यात नाद करून शेकोटी आपण पेटवून आनंद घ्यायचा आणि कित्येक तरी कुटुंबाला त्या शेकोटीची धग नाहीतर झळ पोहोचतीय अन हाल अपेष्टा सुरु व्हायला इथूनच सुरुवात होती आणि सिजनेबल धंदा कसा असतोय गणपतीमध्ये मुर्त्या ईकायच्या… दिवाळीत फटाकडे, रांगोळ्या… दसऱ्याला झेंडू , आपट्याची पानं…लक्ष्मी पूजनाला लाह्या, बत्ताशे, केरसूण्या अन हा जसा धंद्याचा हंगाम असतो तसं आताचं ही निसर्गाचं वातावरण म्हणजे पावसाची हमेशाची वर्दळ चिकचिक आणि रिपरिप आणि ह्या असल्या गारव्याच्या आणि वल्ल्या सीजनमध्ये रेनकोट, छत्री, नाही कारण इथं कुठं कुणाला बाहेर पावसात जायचंय इथे एक तर गाराठल्यामुळे गरम गरम खिचडी, वरणफळं,आणि गरम गरम घरातली कांद्याची तोंड पोळत पोळत भजी प्रत्येकाला पाहिजे असते आणि अजून एक म्हणजे शेकोटी म्हणजे गरम गोधडीत मुस्कटून झोपायचं…काय करता तो रंगमहाल आणि शेकोटीचं अजून एक आहे व्हाट्सअप ला स्टेटस ठेवतात मी दोनशे कोटीचा मालक झालो ढिगानी अभिनंदनाच्या कमेंट्स येतात काही जवळचे आपुलकीने चौकशी करतात ह्याच्यासाठी कि कालच्याला ह्याला खायची पंचायत होती आणि आज कस काय तेवढ्यात दुसऱ्या दिवशीचा नवा स्टेटस तयार असतो अंगणात एक पेटवली आणि दुसरी बेडरूम मध्ये तवा कळलं कि ह्यो दोनशे कोटी नाही तर दोन शेकोटीचा मालक झालाय तर असा हा शेकोटीचा किस्सा
काकडणारे खरंच वास्तवात हातापायाची बोटं वाकडी होईपर्यंत काकडत्यात त्यांना उब नाही म्हणजे बघा भोई बांधव…चार घरची धुणी भांडी करणारी बिचारी कामवाली मावशी यांना खरं शेकोटीची आणि त्या उबदार वातावरणाची गरज असते परंतु इथं वर्गणी काढून वखारीतनं मणभर लाकडं आणून चौकात शेकोटी भवती बसायचं स्टेटस कानटोपी, हातमोजे, शाल पांघरलेले, जर्किन घातलेले फोटो फेसबुकवर टाकायचे आणि त्याचा गवगवा करायचा ही तपावत पहिली दूर केली पाहिजे म्हणजे सुधारणा झाली असं म्हणलं पाहिजे आता आपण कडाक्याच्या थंडी मधल्या शेकोटी बद्दल बघू काही महाभाग तर घरदार सोडून त्या भल्या मोठ्या शेकोटीच्या भोवती बिछाना टाकून सकाळपर्यंत हातपाय ताणून देऊन उबदार वातावरणात झोपलेले मी पाहिलेत आता दुसरी कुटुंबाला झळ जाणवणारी शेकोटी म्हणजे हे आपले विचित्र जोपासलेले छंद… म्हंजे बघा काही हिरो ज्यांना समाजाने हिरो म्हणून मान्य केलयं कारण ते नुसते काम करतात म्हणून हिरो नाही तर समाजाने त्यांना हिरो म्हणून मान्य केलयं
आणि त्यांना हिरो म्हणून मान्य करणं ही पण तेवढचं महत्त्वाचं कारण ह्या हिरोचा आदर्श पुढची पिढी घेत असते आणि हेच जर जंगली रमी पे आव ना महाराज… कोणत्यातरी माझ्या भिवंडीच्या राहणाऱ्या ताईला भावाने तिच्या फोन मध्ये रमी डाऊनलोड करून दिली आणि तिला कितीतरी लाखाची रक्कम मिळाली कौतुक आहे त्या बिचारीच्या संसाराला तेवढाच हातभार लागला त्या भावाचं पण मनापासून आभार पण असं सगळ्यांच्याच बाबतीत घडल असं नाही हे खड्ड्यात जायचे अन भिकला लागायचे धंदे म्हणून खरंतर हिरोनी माझ्या मते समाज सुधारायला पाहिजे नाही ती रमी आणि जुगार खेळायला जनतेला प्रवृत्त करू नये दोन दिवसात तीन कोटी किंवा तीन लाख रुपये मिळाले तर सगळे उद्योगधंदे….नोकऱ्या.. बंद करून सगळे लोक हेच करायला लागले असते म्हणजे असली शेकोटी काय कामाची काही तर असल्यापण शेकोटीचे शौकीन मी पाहिलेत खालच्या गल्लीत राहायचं आणि कुडकुडत वरच्या गल्लीला शेकायला जायच
अन त्या शेकोटीचं अजून एक सांगायचं म्हणजे खरंतर गावाकडच्या थंडीला थंडी म्हणणं म्हणजे तिचा अपमान आहे तर गावाकडच्या थंडीला गारठा हाच शब्द योग्य आहे आणि जेव्हा थंडीचा कडाका अनुभवायला मिळतो त्या थंडीला हाडं मोडणारी थंडी म्हणावी लागेल ती हुडहुडी भरल्यावर किंवा दात एकमेकावर आपटून तडतडा वाजायला लागल्यावर कळतं खरं तर गावातली पाच पंचवीस घरं दाट अशा झाडीतून डोकावत असतात त्यामुळे म्हणावी एवढी दाट वस्ती नसते बहुतेक सगळी घरं कौलं… पत्रा… आणि माळवदाचीच बघायला मिळतात आणि आजूबाजूची हवा थंडगार असते गावातल्या दाट झाडीमुळे पडणाऱ्या त्या दाट सावलीमुळे आपलं गाव ही काय थंड हवेचं ठिकाण आहे का काय असा प्रश्न कधी कधी मनाला पडतो आणि ह्या असल्या धावपळीत हळूच हिवाळा डोकं वर काढतो आणि खऱ्या अर्थाने थंडीचा मोसम सुरू होतो झाडं निस्तब्ध होतात… पक्षी पंखात गोठतात.. वारा मंदावतो…पण वाऱ्याच्या मंदगार झुळकेने माणसं पण गारठतात प्रत्येकाचे दोन्ही हात हे खिशात नाहीतर मागं पुढं छातीशी घट्ट असे बांधलेले दिसतात
थंड हवेमुळे रक्त सळसळतं अन भूक वाढते मग आपण सपाटून जेवतो ते सपाटून पडलेल्या थंडीमुळे पुण्या मुंबईतच काय खेड्यापाड्यात पण लोक कपाटातून किंवा बोचक्यातून स्वेटर… मफलर… शाल…बाहेर काढतात आणि गावातल्या गारठ्यात मात्र गावकरी घोंगड्या…गोधड्या किंवा कांबळी अंगावर घेतात आणि थंडीचा प्रतिकार करतात गारठा अंगाला झोंबू लागला की आठवण होते ती शेकोटीची हुड हुडी भरल्यावर अंगावर सोलापुरी चादर घ्यायची आणि शेकोटी भवताली उन्ह पडूस्तवर बसायचं पोरं शेकोटी भवती बसली कि थोराड झालेली म्हणायची उठा आता काम धंदा बघा रात्रीचं राखण्यासाठी शेतावर किंवा मळ्यात गेलं की रात्रभर शेकोटी पेटत राहायची अंगावर घोंगडी घेऊन आगीची उब घेत रात्रभर शेतीची राखण शेतकरी करायचा त्यावेळी त्या शेकोटी भोवती ज्या गप्पा आणि गजाली रंगायच्या त्यामुळे रात्रभर मनोरंजन व्हायचं ते वेगळच गावातल्या अनेक भानगडी गप्पांच्या ओघाने त्या शेकोटीने पण ऐकायच्या आणि गारठा कवाच पळून जायचा
खरं बघितलं तर शेकोटी ही आग पेटवून थंडीपासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणारी व्यवस्था आहे यात चुलीसारखंच पण लाकडं…कोळसा…इत्यादी घराबाहेर पेटवतात आणि त्याच्यासमोर बसल्यावर उब मिळते व थंडी म्हणजे गारठ्यापासून बचाव होतो थंड झालेले हात सुद्धा यावर शेकले जातात हिवाळ्यात तापमान घसरले म्हणजे याचा सर्वजण वापर करतात
*************************************
किरण बेंद्रे
थेट पुण्याहून
7218439002