आम्ही साहित्यिक

***** *सुरमई* *******

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

****** सुरमई *******


( सावकाश वाचा…..तोंडाला पाणी सुटल )
या दुनियेत एक वेगळा आहार करणारा वेगळा वर्ग पण आहे आता बघा आहाराचे तसे मुख्य दोन प्रकार एक शाकाहारी आणि दुसरा मांसाहारी आणि आता तिसरा पण निघालाय पण तो वेगळं अस्तित्व दाखवतो म्हणजे बघा कॉन्टिनेन्टल, रायता किंवा स्ट्रीट फूड तसं बघायला गेलं तर स्ट्रीट फूड हे खरंतर क्षणिक भूक भागवण्याचे साधन पण काही वेळा तिथेच ढेकर येतो.


खरं पोट भरतं फक्त थाळी किंवा ताट म्हणजे ज्याच्यामध्ये पोळी, भाजी, सुकी भाजी, वरण-भात, यांचा समावेश असतो आता आपण जरा बारकाईनं विचार करू कारण शाकाहारी जरी म्हटलं तरी त्यातही काहींना गोड पदार्थाचं तर काहींना तिखटाचं वावडं काही सुकी भाजी खाणारा वर्ग तर काही जणांची रस्सा भाजीला पसंती आता बघा आपण आपल्याला जे म्हणायचं त्या मेन रोडवर येऊ म्हणजे मांसाहार कारण काही विशिष्ट दिवशी म्हणजे

 रविवार,मंगळवार, बुधवार,आणि शुक्रवार या दिवशी जर पाहुणा आला किंवा आपण पाहुणा म्हणून गेलो तर सागुती जिंदाबाद पण यावेळी आपण जरा काही विशिष्ट खवय्यांचा विचार करू मी पाहिलेत माझ्या घरातलं उदाहरण म्हणजे माझे आई-वडील त्यांना कोणत्याही आर्थिक परिस्थितीमध्ये मग ती अनुकूल असो किंवा प्रतिकूल पण मटण हे लागायचेच मग काही वेळा अतपावसुद्धा मटण आणलं जायचं कारण त्यांचा ओढा पीस खाण्यात कधीच नव्हता फक्त भाजी मटणाची ती पण बोकडाची पाहिजे हा हट्ट कारण पितळी मध्ये रसा घेऊन फरशीचा तुकडा वटकन म्हणून लावायचा दोन गरम जाडसर ज्वारीच्या भाकरी

 चुरायच्या वरनं जवळजवळ अर्ध लिंबू पिळायचं अगोदर थोडसं गुत्त्यावर जाऊन पेट्रोल भरायचं मग त्यो चुरल्याला काला त्याचा तुकडा पाडायचा अन पोतं घेऊन चिंचेच्या झाडाखाली पार संध्याकाळी पाखरं घरट्यात येईपर्यंत चांगली ताणून द्यायची उठल्यावर सगळं कसं अंग ओवर आयलिंग आणि सर्विसिंग केल्यावानी चलाख व्हायचं पुढच्या रेल्वेच्या कामाला हुरूप यायचा.

दुसरे उदाहरण बघायला गेलं तर हा मटण खाणारा जसा एक वर्ग आहे तसाच मासळी खाणारा पण एक वर्ग आहे त्यांना मटणापेक्षा दोन माशाचे तुकडे सुद्धा भलतेच समाधान देऊन जातात आता वेगवेगळ्या ठिकाणानुसार मासे मिळायची पण एक सोय असते काही ठिकाणी गोड्या पाण्यातीलच पण धरणाच्या पाण्यातील मासे,नदीतले मासे,तलाव किंवा ओढ्यावर जाऊन बहुतेक गळ लावून पकडलेले मासे असे कितीतरी जातीचे म्हणजे खवला,कटला,चिलापी,मांगुर,वाम सुरमई,रहू,असे कितीतरी प्रकारची चॉईस पण मी पाहिले काही एक खास असा वर्ग आहे
तो म्हणजे सुकी मासळी खाणारा त्यामध्ये बोंबील,सोडे याला विशेष मान पण दुसरं म्हणजे सुकट, खारा मासा,झिंगे,लांब पापडी,असे कितीतरी प्रकार तो सुद्धा खाणारा एक विशेष वर्ग काही जण तर एवढी शौकीन असतात आता आपली बायको रोज कामाला जाताना डबा देती पण मी तर काय करायचो भाजी कोणतीही असो वांग्याची,मेथीची,बटाट्याची,नाहीतर हरभऱ्याची त्याच्यात दोन चार तुकडे बोंबील किंवा सोडे टाकायचे खरं सांगतो ते बोंबीलचे किंवा सोड्याचे पीस खाण्यापेक्षा ती नुसती भाजीच कडेनं बोट फिरवून डबा आपल्या भाषेत चाटून पुसून खाल्ला जायचा कोरभर भाकर किंवा चपाती जास्त जायची थोडीशी तिखट अथवा पोचट जरी झाली तरी माणूस सनकून हाणतंय
आता आपण पाहू हेच मासे पण समुद्राचे खाण्यामध्ये एक वेगळाच फील आहे या जिनसा म्हणजे एकतर समुद्राचे पाणी खारट आणि त्या प्रत्येकालाच याचा नैसर्गिक खारटपणा म्हणून यांचा पण चाहता वर्ग खूप आहे आणि दुसरे म्हणजे समुद्रकिनारी किंवा जवळपास असणारी यांच्या आहारात आपसुकच हे पदार्थ येतात आता ते पदार्थ आपण करण्यात आणि त्यांनी करण्यात खूप फरक भले दोघांना साहित्य सारखं जरी दिल तरी प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी याला म्हणतात मालवणी खाद्य पद्धती एक निसर्गाने वेगळाच दर्जा बहाल केलेला अन्नपदार्थ….. आता त्या आणि आपल्या मुंबईचा बहुतेक भाग तिकडे कोकण किनारपट्टी,मालवण, वेंगुर्ला,चिपळूण,राजापूर,सावंतवाडी अशा ठिकाणी थोडा फेरफटका मारावा लागणार…नाही तर आपलं नुसतं वाचून तोंडाला पाणी सुटतयं त्याचा काय पण उपयोग नाही आता आपण सुरुवात करू कारण बांगडा…कारण आमची खूप दिवसाची शेजारी राहणारी फॅमिली होती ते साहेब पोमलवाडीला बंडिंग खात्यात सुपरवायझर होते लांघे साहेब त्यांचे नावं होते पूर्वी बदली जरी झाली तरी पत्राद्वारे प्रेम ताजं ठेवलं जायचं पण आता तोच ताजेपणा मोबाईल ने जपून ठेवलाय आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉल म्हणजे दुधात साखर खरोखर घरात गेल्यावाणी फील येतोय तर त्यांच्याकडे धावता दौरा म्हणजे तरी दोन अडीच दिवस राहायचा योग आला
त्यांचं गाव खोरोशी तालुका महाड जिल्हा रायगड तर सांगायचं तात्पर्य पहिल्या दिवशी बांगडा माशाची मेजवानी झाली खरंतर उन्हाळ्याचे दिवस आंब्याचा सिझन कोकणात आंबे प्रसिद्ध पण ते म्हणाले किरण आंबा सारखा खाण्यात येतो दौंडला तुला बांगडा पण मिळत असेल पण हे बांगडे दुपारी धरलेले ताजे आहेत आपण ते करू मी ठीक आहे म्हटलं कारण एकंदर सार्वत्रिक परिस्थितीचा विचार केला तर बांगडा हा मध्यमवर्गीयांसाठी महाग कधी कधी जाळ्यात जास्त बांगडे मिळाले तर कोळीण मावशी रुपयाला 14-14 बांगडे देऊन जायची हा किस्सा आहे 1995 च्या दरम्यानचा तर हळदीचे पान,त्रिफळा टाकून बांगडा व टिकला करतात किंवा घोटून त्याची कढी करतात आपण हे पाहिलेलं नाही पण ऐकलेले पण नाही आपण काय खातोय आणि किती खातोय याची काही पण सुद राहत नाही त्या लांघे वहिनी सांगायच्या दुसऱ्या दिवशी बांगडे स्वस्त मिळायचे म्हणून भरलेले सुके बांगडे व रवा लावून खरपूस शालो फ्राय केलेले ओले बोंबील असं वाटायचं की आपण सातव्या आस्मानात आहोत त्यांचा नेहमीचा आंबेमोहर तांदूळ भात शिजाय टाकला की गल्लीभर वास… आपल्या दिल्ली गेट सुपर बासमती तांदळाला सुद्धा मागे टाकतोय
पण भरलेले बांगडे करताना गृहिणींना आपलं कौशल्य पणाला लावावं लागतंय आणि बांगडा सुटी करताना तो मोठ्या आकाराचा असतो आणि आणतानाच त्याचा काटा काढून टाकणे सर्वांनाच काही जमत नाही कर्ली मासा खाताना कौशल्य लागतं प्रचंड बारीक काटे आणि अप्रतिम चव तसेच माशाचा अख्खा पीस तोंडात टाकून ऊस खाऊन चुयटी बाहेर काढतो तसे माशाचे काटे हातात बाहेर काढून टाकायचे तरीपण आई मुलांना वाढताना पाठीकडचा तुकडा वाढते त्या भागामध्ये तुलनेने काटे कमी असतात मी तिथे बाजारात पाहिले बुगडी हा मासा कमी दर सर्व सामान्य हा मासा घेऊन जातात त्यावेळी आठ आणे,बारा आणे दिले तर मोठ्या आकाराचा मासा मिळायचा मुंबईत त्याला खोपा मासा म्हणायचे कधी चार पैसे कनवटीला असले तर सुंगटाचा वाटाही पिशवीत यायचा आता सुंगटा म्हणजे आपण त्याला कोळंबी म्हणतो तसेच हा सुंगटा फ्राय करून खाण्यात मजा खरी बहुतेक जण तर या सुंगटाचा मसाल्याच्या वाटणात वापर करून रस्सा करताना उपयोगात आणतात तसे नाव माहीत नसलेले छोटे छोटे म्हणजे हाताच्या बोटाच्या आकाराचे मासे थोडे उकळून चाळणीमध्ये घेऊन रगडतात व त्याचा सार पुन्हा गाळणीने गाळून अर्क भाजीमध्ये वापरतात म्हणून खास मालवणी पद्धतीने बनलेला स्वयंपाक उत्कृष्ट ठरतो असे कितीतरी प्रकार त्या माऊलीलाच माहिती बरं का…
तसेच इस्वन,सरंगो,पापलेट हे मासे खाणारा विशेषता श्रीमंत वर्ग असा माझा समज होता पण जाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मासा मिळाल्यामुळे तेथे तो सर्व सामान्य भावामध्ये मिळायचा नाहीतर त्याचा दर आम्हाला परवडण्याच्या जोगा नव्हता आता बघा आपली नेहमीची बोलीभाषा आणि त्यांची नैसर्गिक भाषा याचा काहीबी ताळमेळ लागत नाही इस्वनला सुरमई तर सरंग्याला हलवा म्हणतात हाय का नाही ही असली वेगळी नावं ऐकल्यावर मच्छी बाजारात गेल्यावर ते लोक आपल्याला बावळटात का काढायची नाहीत मुंबईत स्थानिक असलेले परंतु मूळचे ज्या भागातून आलेत त्या भागामध्ये समुद्रातली मच्छी मिळत नाही त्यांना माशाची गोडी लागलेली असते आणि मासे हा प्रकार अजूनच महाग होत चाललाय आम्हाला मच्छी खाऊ म्हणून चिडवणारे हॉटेलात गेल्यावर सुरमई थाळी, बांगडा थाळी ची ऑर्डर देतात पण एक लक्षात ठेवण्यासारखा किस्सा मुद्दाम सांगावासा वाटतो मच्छी सुटी करण्यासाठी एक पाटासारखं ठेवलेलं लाकूड त्यावर बसून त्या सटासट मासे सुट्टे करायच्या माशाची खवले साफ करणे,त्यांचे पंख,कल्ले शेपटी वेगळे करणे, डोके वेगळे केल्यावर मांजरा पुढं टाकलं जायचं इथं लहान मुलाचं सैन्य हातात काठी घेऊन थांबलेलं असताना पण त्या माशापासून मांजराला लांब ठेवायच्या साठी उभी असायची
तोडून टाकलेले माशाचे डोके जमिनीवर पडायच्या आत मांजर डाइव मारून झेलायची त्याच्या या झेला पुढे एखाद्या नामांकित क्रिकेटपटूचा झेल सुद्धा कमी पडायचा बरं एवढं सैन्य हातात काठी घेऊन असून सुद्धा मांजर एखादा मासा लंपास करायची आणि ओरडा मात्र पोरांना पडायचा पण टॉमी मात्र या मेजवानी पासून वंचित राहायचा जेवताना सुद्धा काटे खायला मनी आणि तिची फॅमिलीच उपस्थित असायची तरीही ती घरची माऊली टॉमी साठी एक दोन चांगले बघून मासे टॉमी साठी बाजूला ठेवायची आणि त्याला बाहेर नेऊन वाढायची आता बघा योगायोगाने परत परत आपल्या तोंडाला पाणी सुटणार कारण हॉटेलला गेल्यावर आपल्याकडे विशेष प्रकारची राईस प्लेट नाहीतर थाळी असते
‌ पण कोकणपट्टीच्या या समुद्रकिनाऱ्यावर जी पण हॉटेल असतील त्यांचा मेनू ठरलेला म्हणजे ठरलेला…अस्सल मालवणी मच्छी थाळी, मालवणी कोंबडी वडे,जिभेवर रेंगाळणारी अस्सल घरगुती मालवणी चव,कोंबडी मसाला,सुकी कोंबडी,कोंबडी रस्सा, कोंबडी वडे,मटन मसाला, खिमा वगैरे सारे मटणाचे पदार्थ व त्यांचे विविध प्रकार तर मत्स्यप्रेमींसाठी तळलेल्या माशांमध्ये भरलेलं पापलेट,बोंबील, सुरमई, रावस, मांदेली, कोळंबी,तिसरर्या,बांगड्याचं तिखलं,पापलेट, मासळी रस्सा,कोळंबी मसाला, सुकी कोळंबी, तिसरर्या मसाला, खेकडा मसाला, या सगळ्यांसोबत भाकरी किंवा आंबोळी या अस्सल कोकणी पदार्थांचा आस्वाद आपल्याला घेता येतो हिरव्या मसाल्याचा रावस,हळदीच्या पानातले बांगडे,पापलेट,तिखलं,सुरमई,मसाला जोश,सुक्या कोलीमाची कोशिंबीर, आणि मांदेली फ्राय सह बाजरीची भाकरी, लसणी मिरचीचा ठेचा, सुकं मटण कलेजी फ्राय,कोळंबीचं लोणचं,पापलेट, सुरमई फ्राय,तांदळाची भाकरी शुभ्र कागदावाणी भाकर मी तर म्हणतो खरंच काय नाही पण आपली नुसती सासरवाडी तरी कोकणातली असली म्हणजे खवयाच्या दृष्टीने खाद्य जत्राच म्हणावी लागेल आणि हॉटेलचं जेवण कसं अगदी घरचं असायला हवं त्यातून मालवणी मसाल्यातून बनवलेले जेवण,तळलेले वडे,भाकरी,सोलकढी, मालवणी मसाला, कांदा गरम मसाला टाकून झणझणीत रस्सा लाजवाब चव… मालवणी जेवणाच्या वासानेच पोट भरलं की काय असा भास कधी कधी होत असतो
लुसलुशीत कोळंबी मसाला, ओल्या नारळाच्या चटणीतून तयार झालेल्या तर्रीचा खमंग दरवळ,मोहात पाडतो तळलेले वडे ही स्पेशालिटी म्हणजे सहज करता येण्यासारखं जसे आपण कांदे पोहे झटक्यात बनवतो तसं मालवणी जेवण माशा शिवाय म्हणजे अपूर्णच छान पैकी काप केलेले मसाला लावून रव्यात घोळवलेले पापलेट,सुरमई,हलवा, बोंबील खरंच रुचकर काहीही खा पण या वरच्या माशांचा एखादा पीस तरी चाखून पाहण्याचा मोह आवरत नाही मालवणी जेवण झाल्यावर हमखास हवीहवीशी वाटणारी सोलकढी ही खवय्याच्या किमतीला हजर असते पेलाभर सोलकडी पोटात गेल्यावर तृप्त झाल्यासारखं वाटतं सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून बसल्यावर आपल्याकडे कसं रतिबाचं लावलेलं दूध घेऊन गवळण बाई किंवा भाजीवाली नित्य नियमाने आपल्याकडे दररोज येते त्यांनी सांगितलं अगदी तसंच ही आजी रोज येतीयं डोक्यावर टोपली हातात हिरवा पाला असलेली छोटीशी फांदी पायात कधी चप्पल तर कधी अनवाणी कोळी पद्धतीचं काष्ट्याचं लुगडं नेसलेली कानात मोठ्या गाठ्या वाणी म्हणा किंवा मोठ्या कोळंबी प्रमाणे असलेले कानातले त्याच्या वजनाने आपली करंगळी जाईल इतपत होल असलेली कानाची पाळी असं स्वरूप असलेली ती आजी त्या वहिनींची मैत्रीण सुद्धा होती आल्या आल्या हॉलमध्ये टोपली उतरायची चहा वगैरे घेऊन झाला पाव्हणं कुठलं कोकणी भाषेतच बोलणं झालं तिच्या गावी यायचं आमंत्रण पण दिलं माझं लक्ष त्या टोपलीत गेलं त्या टोपलीत एक रास लावलेली होती पण घपकन कुबट वास आला मला तो कुबट वाटला पण त्या वासाच्या दिशेने टोपलीत डोकावले तर दिसले ते सुके मासे जवळा,करंदी,वाक्या,बोंबील, पिंगळी, बांगडा सगळी सुकी मासळी होती त्या टोपलीतील काही भाग आजीच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणून द्यायचा माझी सुक्या मासळीची जुनी नातं असल्यासारखी वासाची दुनिया निर्माण झाली
सुक्या मासळीच्या काही जुन्या आठवणी आज पण तोंडाला पाणी सोडतात बहुतेक मला रोजचा नाश्ता हा चुलीत भाजलेले खारे मासे व ज्वारीची गरम गरम दगडी कोळश्याच्या हारावर भाजलेली भाकरी असायची घरामध्ये कायम दगडी कोळशाची शेगडी धगधगत असायची आई सकाळीच त्या दगडी कोळश्याच्या निखाऱ्यावर बोंबील भाजायची खाली घेतल्यावर तेलाच्या वाटीत बोट बुडवून बोंबलावरून नुसतं फिरवायचं पुसटसा तेलकट बोंबील दिसायचा नुसतं बघूनच पोट भरायचं कधी एकदा तोंडात टाकतोय असं व्हायचं बोंबील भाजून काढला की त्याची राख झटकायसाठी थोडं वरच्यावर ठोकायचं म्हणजे त्यातली राख निसटून जायची थोडासा तुकडा तोडून भाकरीच्या घासाबरोबर दोन्ही गरम म्हणजे भाकरी पण आणि बोंबील पण त्यात सुका बांगडा हा असा प्रकार की कुणाच्या घरी भाजला आहे हे कळावं असा वास यायचा शेजारी कुठेतरी बाजूला असेल तर तो तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही बांगडा एवढा खरावलेला असतो की त्याचा इंचभर तुकडा सुद्धा अख्ख्या भाकरीला पुरून उरतोय चिमुटभर भाजलेल्या बांगड्याचा तुकडा भाकरीला लावून खाताना सुखावून जायला होतं
त्या काळी सुके मासे इतके स्वच्छ असायचे की आई भाकरी केलेल्या तव्यात डायरेक्ट टाकून खरपूस भाजून घ्यायची वर थोडीशी तेलाची धार हा ss हा ss हा ss…भाकरीबरोबर खाताना खरपूसपणा चविष्ट लागायचा पण एक सुक्या मासळीचे सिक्रेट आहे बोंबलातले काटे काढायचे नसतात ते चावून चावून चोथा टाकून द्यायचा असतो फॉस्फरस असतो त्यात मेंदूंना व हाडांना पोषक असतोय असं मासळी विज्ञान सांगतंय खरं म्हणजे सुकी मासळी म्हणजे दुधाची तहान ताकावर भागावल्याचा प्रकार तरी पण किंचित आलं,वल्ली मिरची,लावलेलं ताक पण फर्मास लागतच ना सोड्याची नारळाच्या दुधात खुरमटत ठेवलेली खिचडी सुक्या बांगड्याची स्वादिष्ट चटणी काय बेत म्हणायचा म्हणायचा
**************************************
किरण बेंद्रे… शब्दांची मेजवानी
पुणे
7218439002

litsbros

Comment here