कंदुरी                        *********      ( एक मनाजोगी मांसाहारी आखाड पार्टी )        ………………………….

कंदुरी

                       *********

     ( एक मनाजोगी मांसाहारी आखाड पार्टी )

       ………………………….

           त्याचं काय झालं तेव्हा आम्ही होतो पोमलवाडीला राहायला आणि वडिलांची भीमा नदीवर पंपावर ड्युटी त्यामुळे मासेमारी करायला येणारी भोई मंडळी…नदीच्या पाण्यावर बागायती करणारी शेतकरी मंडळी…किंवा नदीवर धुणं धुण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक घराशी झालेली जवळीक…आणि गाव पडलं उदार मनाचं त्यामुळे लग्न…बारसं… जागरण गोंधळ…सारख्या कार्यक्रमाची आमंत्रणं सारखी यायची कवाकवा हौसं कवतीकांनी बाहेर गावचे शेतकरी बैलगाडी पाठवायचे हुरडा खायला म्हणा किंवा अति लोभामुळे एखादा दिवस आमच्याकडे हवा बदलायला या म्हणणारे पण… एकदा काय झालं सहज बसल्या बसल्या आठवलं बाहेर दोन दिवसापासून पावसाची रिपरिप आपली रात्रंदिवस चालूच होती तिकडे वरच्या पट्ट्यात आणि मावळामध्ये मायंदाळ पावसाचं प्रमाण असल्यामुळे बहुतेक धरणं भरायच्या मार्गावर तर काही छोटी छोटी धरणं व बंधारे पूर्ण पात्रतेने भरून त्यांनी प्रत्येकाने आपापले हात वर केलेले होते आता आषाढ श्रावण म्हटल्यावर पावसाच्या सरीवर सरी येणारच त्यात काही जणांची कंदुरी पण असायची पण बघा आमंत्रण जर गोडाचं असलं तर जातातच पण वशाटाचं असल तर काहीही केलं तरी जावचं लागतयं एरवी बाप पोराला म्हणल लग्न…पूजा असलं तर तू जाऊन ये पण ही असलं वशाट आमंत्रण जर असेल तर सगळा काम धंदा सोडून मला जायला पाहिजे नाहीतर पाहुण्याला राग येईल असं म्हणून सगळ्याच्या अगोदर बायको नाही आली तरी स्वतः पळतंय

      अन तुम्हाला तर माहितीच आहे बांधावरच्या म्हसोबाची जत्रा किंवा खळ्याची जत्रा नाहीतर एखाद्या ठिकाणी कंदुरी असेल तर तिकडं सगळ्यांचं लक्ष असतं कारण कोणी तरी गावातील देवीला… लक्ष्मी आईला… किंवा पिराला… बांधावरच्या म्हसोबाला नवस केलेला असतो खरं म्हणजे कोणत्याही देवी किंवा दैवताला मांसाहारी नैवेद्य कधीही चालत नाही देवी व मुख्य देवाला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवावा लागतो व त्यांच्या दैत्यासाठी मांसाहारी नैवेद्य दाखवावा लागतो त्याला खेडेगावांमध्ये कंदुरी म्हणतात परंतु काही ठिकाणी या मटनाच्या पातळ रशाला बरबाट असही म्हणतात बहुतेक ग्रामीण भागातील ठराविक घटकच या शब्द प्रयोगाचा वापर करतात ते सुद्धा कमीत कमी दहा पंधरा लोकांचा किंवा त्याहूनही जास्त लोकांचा मांसाहारी स्वयंपाक असेल तर त्या कालवणाला बरबाट असे म्हणतात हे बघा एखाद्या गावात गाव देवाची जत्रा असेल त्यावेळी ग्रामदैवताची पालखी किंवा छबिना निघतो त्या दिवशी पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवतात व दुसऱ्या दिवशी आवर्जून पाहुणे मंडळी साठी एक दिवस थांबून घेऊन त्यांना पुन्हा मांसाहारी जेवणाची पार्टी दिली जाते एवढी आपली लोकं या वशाट पार्टीला भुलतात तसं बघायला गेलं तर प्रत्येक जण आपापल्या घरी मस खातोय पण ही म्हणजे चारचौघात सामाजिक स्वरूपाचं जेवण असतयं ती मजा काही वेगळीच असते त्याचं सांगायचं विशेष म्हणजे काही काही लोकं आडवं लावायला पटाईत असतात लग्नाच्या टायमाला पत्रिका दिली समक्ष जरी सांगितलं तरी आम्हाला काय मानपान हाय का नाही का आम्ही काय असलं ऐर गैर हायं काय असं उलटं डोकं चालवतात आता हेच बघा ना याला पत्रिका दिली होती त्याच्या बायकोला सवासणी जेवायला पण बोलावलं होतं देवकाला पण बोलावलं होतं बस्ता बांधायला पण बोलावलं होतं तरी असं म्हणतयं म्हणल्यावर काय बोलावं असल्याला एखाद्याच्या जागरण गोंधळाचा किंवा कंदुरीचा निरोप तिसऱ्याच्या हाती जरी मिळाला तरी सगळ्यांच्या आधी हजर अशी मानसिकता असते एकेकाची.

       आणि विशेष म्हणजे लग्नामध्ये किंवा इतर कार्यामधील लोकांना काम करा किंवा कामात थोडीशी मदत करा असं सांगावं लागतंय पण कंदुरी च्या कामांमध्ये प्रत्येक जण मनापासून स्वयंसेवक होत असतो पार सरपणाची लाकडं फोडण्यापासून इतर कार्यक्रम व कंदुरी मध्ये असा काय फरक आहे की लोकं यास प्राधान्य देतात कारण एकच आहे मटण आणि मद्य रोजच्या आपल्या कष्टमय जीवनात तीच तीच कामं करून लोक मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या दमलेली असतात व ग्रामीण भागातील मांसाहार करणार्‍यांना नियमित मांसाहार करणे शेतीच्या कामाच्या दगदगीमुळे शक्य नसतं आणि मटण व मद्य तेही फुकट कंदुरी च्या वेळी असतयं म्हणून कंदुरी मध्ये लोक उत्साहाने सहभागी होतात गावातील लोकांना… मित्रमंडळींना…आप्तेष्टांना…आमंत्रित केलं जातं नवस पूर्ण करण्यासाठी बकरं कापलं जातं आणि ज्या दैवताचा किंवा पीराचा नवस असेल ते दैवत डोंगरावर किंवा माळावर वसलेले असते ज्या घरात कंदुरी आहे त्या घरात आठवड्यापासून पूर्व तयारीची लगबग सुरू असते सगळ्यात आधी जनावरांच्या बाजारातून बकरं आणलं जातं दोन-चार दिवस अगोदरच घरातल्या पोरांना पण त्या बकऱ्याला वेगवेगळा पाला चारण्याचं काम मिळतं आणि घरातील पोरं सोरं उत्साहानी ते काम पार पाडत असतात मोठी माणसं मसाला… तिखट… मीठ…तांदूळ… पीठ…याच्या तयारीला लागतात कंदुरीचे स्थळ जर जवळ असेल तर टमटम नाहीतर टेम्पो ठरवतात घरी बकरं आणलेल्या दिवसापासून काही जण चाखा चोळा बघण्यासाठी म्हंजी कुठवर आलंय ते बघण्यासाठी घराकडं उगाच चकरा मारतात अखेर कंदुरीचा दिवस उजाडतो सकाळी सकाळी टेम्पो दारा समोर येऊन थांबतो न बोलावताच माणसं पटापट जमतात क्षणात टेम्पो भरतो काही जण फाळक्या जवळ दोर धरून उभी असतात पाण्यासाठी घेतलेल्या रिकाम्याच 2-4 घागरी फाळक्याला बाहेरून दोरीने बांधलेल्या असतात बहुतेक कंदुरीची गाडी अशी तिची ओळख असावी कारण गाड्यांना लोंबकळणाऱ्या घागरी म्हणजे कंदुरीचा सिम्बॉल म्हणावा लागेल बरीच माणसं टू व्हीलर वरून कंदुरीला येतात कारण वाटेत त्यांना थांबत थांबत घुटके घेत घेत यायचं असतं आणि समजा कंदुरी करणाऱ्याची परिस्थिती जर चांगली असेल तर तोच घुटक्याची पण सोय करतोय टेम्पोतच घुटक्याचे बॉक्स घेतले जातात गाडी कंदुरीच्या ठिकाणी आली की सगळेजण पटापटा आपल्या कामाला लागतात एखादा आचारी सोबत आणलेला असतो तो तीन दगडाची चूल अशाप्रकारे दोन चुली पेटवतो बाया भाकरी करायला बसतात कोणी कांदा… लिंबू… चिरायला घेतो दोन-तीन जण आचाऱ्या कडे लक्ष देऊन असतात कोणी पूजेची तयारी करतोय तिकडं एका झाडाच्या फांदीला बकरं उलटं लटकवून बकऱ्याला सोलण्याचं काम चालू असतं घुटका घेणारे आपापलं पार्सल घेऊन जवळच्या झाडाखाली निवांत बैठक मारतात उरलेली माणसं बाया आणि पोरं झाडाखाली टाकलेल्या चटईवर बसून जेवण तयार व्हायची वाट बघतात पूजा वगैरे होऊन जेवायला बराच वेळ असतो सकाळी निघताना काय खाल्लं नाही खाल्लं असं करून माणसं बिगर नाश्त्याची निघालेली असतात

        आणि तशातच जेवणाची वेळ होऊन गेलेली त्यामुळे भूक लागलेली असतीयं मटणाची फोडणी दिलेला तो खमंग वास तोंडात पाणी आणतोय आणि पोटात आणखीन भुकेने खोल खड्डा पाडतोय दूर झाडाखाली बसलेल्या लोकांचं घुटक्याचं पार्सल संपलेलं असतं दुचाकीवरून येणारे सगळे जण तोल सांभाळत डोंगर किंवा माळ चढून आलेले असतात सगळ्यांचं लक्ष स्वयंपाक करणाऱ्या मालकाकडे असते……. कधी या म्हणतील याकडे सगळ्यांचं लक्ष असते देवीला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जातो नातेवाईक हा कार्यक्रम ज्याचा असतो त्याला कपडे करतात भूक लागून लागून शेवटच्या टप्प्यात येते मग या बसा आता लईच वकूत झालाय असं गुळगुळीत बोललं जातं सगळी जेवणावर तुटून पडतात खायचं खूप असतं चवही मस्त असते पण दोन-चार बोट्याचं वाट्याला येतात त्यात तिखट लागलेलं असतयं जरी भूक लागलेली असली तरी तीन चार भाकरी सहज जातात जेवण झाल्यावर अर्धा तास तरी तोंड तिखटामुळं भगभग करतयं नाक… डोळ्याच्या खालचा भाग… कपाळ… केसामधी…घामानी वल्लं झालेलं असतयं तरी पण जेवणाचं एक वेगळचं समाधान असतं पट्टीचे पिणारे घुटका घेत बसलेले असतात त्यांना शेवटी उठवून जेवू घालावं लागतं कोणाला तर जेवायच्या जागेवरून उठता पण येत नाही मग त्याची सोय जागेवरच करावी लागते काहीना जाग्यावर नेऊन दिलं तरी त्यांना जेवता येत नाही मग एखादा जाग्यावर झोपी जातो अजून बायांची जेवण बाकी असतात मटण न खाणार्‍यांसाठी पुरणाच्या कटाच्या आमटीची सोय केलेली असते पण एक आहे या कार्यक्रमाच्या वेळी मटणाच्या कालवणाला मसाला जरी कमी असला तरी वेगळीच चव असते कारण ते सामुदायिकरीत्या निसर्गाच्या सानिध्यात केलेले जेवण असते

        कंदुरीच मटन बनवणारा पट्टीचा कलाकार असतोय त्याच्या हाताला एक वेगळीच चव असते का तर हे कालवण चार बायांनी केलं आणि तेवढाच मसाला किंवा सामग्री वापरून त्या आचाऱ्यांनी केलं तर जमीन-अस्मानाचा फरक असतो म्हणजे बघा पातेल्यात एक तर भरपूर तेल गरम झाल्यावर कांदा..लसूण…आलं पेस्ट.. हळद.. मीठ…आणि मटण टाकायचं आपण घरी काय करतो हळद मिठाच्या पाण्यात शिजवून घेतो फरक हा आहे त्यात वरून पाणी घालायचं नाही कारण हळद मीठानी त्याला पाणी सुटतं आणि त्यावरच त्या पहिल्या पाण्यावरच ते शिजायला पाहिजे पूर्ण अंगाच्या पाण्यात मटन शिजलं की ते गरम पाणी घालायचं मटण जर अंगच्या पाण्यात शिजले नाही तर त्याची चव जाते आणि एवढे करून सुद्धा पाण्याकडे लक्ष ठेवावं लागतं कारण मटण लागलं तर त्याची चव जाते आणि विशिष्ट म्हणजे मांद्याची आता मांदं म्हणजे चरबी चरबीची फुलं त्या रशावर तरंगली पाहिजे चरबीचा तेलकटपणा खाताना हाताला लागला पाहिजे कारण प्रथमच फोडणी टाकायच्या अगोदर अळणी रस्सा एखादं पातेलं भरून बाजूला काढला जातो काही नाजूक प्रवृत्तीची पाहुणे मंडळी यांना झणझणीतपणा नको असतो त्यांच्यासाठी खास सोय केलेली असते हा आळणी रस्सा भातावर टाकून पाव्हण्यांच्या पोरांना चारला जातो त्यांनाही याची मजा लुटता येते मिरे…दालचिनी… लवंग… विलायची…इत्यादी तिखट जाळ व प्रखर मसाल्याचे पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात असल्यामुळे तोंड काही पोळत नाही पण नंतर नरड्याची जी नळी असते त्याची नुसती आग होते दिवसा काहींना आकाशात तारे दिसतात त्या अवस्थेत मटणावर येथेच्छ ताव मारणारे सुद्धा भरपूर आहेत आणि अशा कार्यक्रमाच्या म्हणजे कंदुरी च्या मटनामध्ये सर्व पार्ट असतात बघा कलेजी…लिव्हर… फेर वजडी… तिल्ली…काही वेळा मुंडी सुद्धा भाजी मध्ये एकजीव करतात त्यातला कोणताच भाग घरी घेऊन जात नसतात असा काही ठिकाणी रिवाज असतो

       कारण आमच्या जुन्या पोमलवाडी गावात म्हणजे स्टेशन परिसरामध्ये मा.रामभाऊ खताळ गँगमन मुकादम व मा.रसूल भाई दोन प्रतिष्ठित बकरं कापून ते वाट्यावर पोमलवाडी मध्ये लोकांना विकत द्यायचे बहुतेक त्यांचा रविवार व शुक्रवार हा वार ठरलेला असायचा कारण रविवार का तर गावामध्ये काही सर्विस वाले त्यांना रविवारची सुट्टी असायची त्यामध्ये बंडिंगचे साहेब…शाळेचे शिक्षक… हायस्कूलचे सर लोकं…तलाठी… ग्रामसेवक… रेल्वेचे स्टेशन मास्तर…इत्यादी तसेच नोकरवर्ग असायचा आणि शुक्रवारी बाजार असल्यामुळे आवर्जून दुपारी मटणाचा बेत व संध्याकाळी पाच वाजता भेळभत्ता हा बेत ठरलेला असायचा

…………………………………………………….

किरण बेंद्रे

 पृथ्वी हाइट्स… कमल कॉलनी… फेज ll

पुणे

7218439002

karmalamadhanews24: