…… एक पत्र पोमलवाडीला…… प्रिय माझे पोमलवाडीकर… स. न. वि. वि

…… एक पत्र पोमलवाडीला……

प्रिय माझे पोमलवाडीकर… स. न. वि. वि 

      उजनी धरण झालं…पाणलोट क्षेत्र पाण्यानं तुडुंब भरलं… म्हणता म्हणता चांगली तीन ठेसनं पोटात घेऊन निवांत बसलयं…तीनच ठेसनं कसली कितीतरी गावं पाण्याखाली गेली माझी भिमाई काही करू शकली नाही तिचं तरी काय चालणार म्हना कारण ओंजळभर गावं जरी पाण्याखाली गेली तरी पसाभर नाय पण वंजाळं भर न्हायतर सुपभर गावं हिरवीगार झाली.

       कोण म्हणतं पोमलवाडी पाण्याखाली गेली ही तर एक वास्तव आहे पण जरा रिव्हर्स गिअर टाकून 47 वर्ष गाडी थोडी मागे घ्या असं वाटतंय दुपारी एक वाजता वरच्या आणि दोन वाजता खालच्या फलाटावर जाऊन दमलेलं तहानलेलं कोळशाचं इंजिन पाणी पिताना डोळे भरून बघावं आणि स्टेशन वर येताना गळ्यात अडकवलेला तो बुश ब्यारन कंपनीचा रेडिओ मोठा आवाज करून लोकांना दाखवावा मला तर कधी कधी असं वाटतं त्या सय्यद मास्तर बरोबर दर गुरुवारी गवळवाडीला चालत जाऊन कोंडीलाल चाचा च्या घरी मासे खावेत अन कलंदर चाचांनी पानाची पिशवी काढावी कोण म्हणतं पोमलवाडी पाण्याखाली गेलीयं कधीतरी वाटतं माधव काकाचं दुकान अजून पण उघडयं तिथं सखाराम… वाल्या कोळी… गंगाराम…आणि आमचा जयराम दादा… त्या माधवा संगट हसत्यात खिदळत्यात अहो कधी कधी पोस्टात जाताना शिशुपाल शेठ नी दिलेला आवाज अजून कानावर घुमतोय तर विघ्ने मामांच्या मोठ्या आवाजाच्या वराडण्याची अजून पण मला भीती वाटतीय त्यातच गडी येत्यात गडी येत्यात म्हणून सोनार डायवर ( लेखक किरण बेंद्रे यांची वडील ) रातभर लोखंडी पाइप हातात घेऊन फिरताना या पोमलवाडी नी पाहिलयं मला अजून आठवतयं आव डिगा सोनार म्हणजे बारामतीचं चंदूकाकाच… गावात कुठं भांडणं जर झाली थोडी पळापळ झाली असं वाटतंय मिटवा मिटवी करायसाठी अण्णा माने यांच्या घरी जाऊन अण्णांना पुढं

 घालून आणावं आणि अकरा वाजता आमचे बदडे सर शाळेत जाताना निघाल्यावर रस्ता सुनसान व्हायचा असे वाटतं कॅबिनेट मंत्र्यांची गाडी चाललीयं अन सगळं ट्रॅफिक बाजूला केलंय एवढा धाक होता त्यांनी शिक्षणा पल्याड चं शिक्षण पोमलवाडीला दिलयं अन आपल्या शालन बाई तर मास्तरीन बाई आहे का आई आहे हेच कळत नाही एवढी पोरांवर माया आणि त्या सुगीच्या दिवसात देवकर तात्याच्या वस्तीवर आपल्या अण्णा बाबरानी चोळून दिलेला गरम हुरडा खायला अजुन जिभ वळवळतीयं ती पोपट पाटील अन भास्कर आबा पंचायती फुडं उभी राहिल्याला भास व्हतोय कोण म्हणतं पोमलवाडी पाण्यात गेली ती तर एक वास्तव आहे आवं जाळीच्या शाळेमध्ये अजून वाकून बघावस वाटतंय मस सुधारणा झाली पण पहिलं कौतिक आठवलं की डोळ्याच्या कडा अजुनपण वल्ल्या व्हतात कोण म्हणतं पोमलवाडी पाण्याखाली गेलीयं ही तर वास्तव हायं 

बाकी सगळं ठिक हायं… पोमाई ला अन मारुतीला नमस्कार…….

                    … पत्र पाठवणार….आ. नम्र

                         किरण बेंद्रे… पुणे

karmalamadhanews24: