मी केले … तुम्हीकरा … आपण करुया …

मी केले … तुम्हीकरा … आपण करुया …

(मिलिंद यादव, कोल्हापूर यांच्या फेसबुक वाॅलवरुन)

      इकबाल ! माझा शालेय मित्र . शालेय जीवन संपलं आणि जो- तो आपापल्या मार्गाला लागला . सांसारिक व्यापात प्रत्येकजण गुरफटून गेला . आज सारेच शालेय मित्र संपर्कात आहेत असं नाही . काही फोनवर . काही सोशल मिडीयावर . पण इकबाल मात्र बऱ्याचवेळा दिसायचा, तो रस्त्यावर . तो फेरिवाला झाला होता . जाता-येता कधीतरी आम्ही सामोरे यायचो . फार काही बोलणं व्हायचं नाही पण …

” कसा आहेस? ” या माझ्या प्रश्नाला

” अरे, चाललंय बघ हे रोजचंच ” . गाडीवर, आश्चर्य वाटावं अशा पद्धतीने रचलेल्या कपबश्यांकडे हात करत त्याचं उत्तर असायचं . अर्ध्या मिनीटाभराच्या या भेटीत लक्षात रहायचा तो त्याचा हसरा चेहरा आणि कसलाही गर्व नसलेली त्याची देहबोली.

      काल सकाळी-सकाळी चहा पीता- पीता वर्तमानपत्रात छापून आलेले शहरातील दंगलीचे फोटो पहात होतो . त्या अनेक फोटोपैकी एका फोटोने माझे लक्ष विचलीत झाले आणि चहात बुडवलेले बिस्कीट तसेच हातातून गळून पडले . तोंडातून एकच शब्द बाहेर पडला . ‘ इकबाल ‘ .

     गाडीवरील कपबश्यांच्या ढिगार्‍यासह जमावाने गाडी कशी उलटी रस्त्यावर आपटली असेल याची जाणीव होत होती , तो फोटो पाहून .

नक्की माहित नाही, पण …

शाहू राजाच्या स्मृतीसाठी असेल .

माझ्या पानसरे नावाच्या म्हातार्‍याने दिलेल्या शिकवणुकीमुळे असेल .

मी त्या क्षणी ठरवले की, इकबालला भेटायचं . त्याचा हा हातगाडीवरचा संसार पुन्हा उभा करायचा .

      आज सकाळीच त्याच्या घरी गेलो . इकबाल घरी नव्हता . त्याचा नंबर घेवून फोन केला, तर हा गाडी दुरुस्त करायला गेलेला . मी मुद्दामच वहीणींच्याकडून पाणी मागून घेतले . अशा परिस्थितीतही परधर्मिय कोणी आपल्या घरात येवून हक्काने पाणी पीतंय . इतका आत्मविश्वास त्या घरात यावा . इतकाच उद्देश या कृती मागचा . 

    इकबालला, तो होता तिथे जावून भेटलो . मला वाटले होते हा साधासुधा माणुस या घटनेने खचला असेल . कुठंल काय? त्यानं नेहमीच्या हास्यमुद्रेनं माझं स्वागत केलं . मी म्हटलं, ” दोस्ता, तुला काय लागणार आहे सांग . ते सगळं मी करायला तयार आहे . तुझी गाडी परत सुरू झाली पाहिजे . ” यावर हसत, नेहमी प्रमाणे डोळे बारीक करत तो जे बोलला, त्यातून माणुस म्हणून आपणही काही शिकण्यासारखे आहे .

” अरे, जावू दे रे . हे व्हायचंच . याला पर्याय काय आहे सांग ? ज्यांनी गाडी पलटली त्यांचा तरी काय दोष . कोणतरी करतंय . कोणतरी सांगतंय . डोक्याला हात लावून बसण्यात काय अर्थ आहे . तू आपलेपणाने आलास . बोललास . खुप झालं . करतोय प्रयत्न . आधी गाडी सरळ करतो . ” 

    मला तर इकबालमध्येच देवदर्शन झालं . यानं तर नुकसान करणाऱ्यांना एका दमात माफ करून टाकलं . इकबाल तू हतबल नाहीस दोस्ता. तुझ्यासारखी लढण्याची ताकद सर्वात येवो .

 गंमत म्हणजे इकबालची गाडी एक हिंदू दुरुस्त करत होता . ज्याचा या घडलेल्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता . त्याला हे मान्पच नसावं , हे त्या दोघांच्या संवादावरून मला लक्षात येत होतं . मला त्या दोघांचा धर्म एकच दिसत होता . ‘ राबणारा ‘.

     तरीही मी त्याला म्हटलं, ” हे बघ माझं ठरलंय . संध्याकाळी तुझ्या घरी येतो . तू फक्त सांग . मी तुला काय आणि किती देवू ?”

       संध्याकाळी त्याच्या घरी गेलो . मुद्दाम बायको व मुलीला घेवून गेलो . दोन कारणं १ . त्या घरात आत्मविश्वास यावा.

 २ . म्हातार्‍यानं मला दिलेली विचाराची शिदोरी पुढच्या पिढीकडे, कोणत्याही प्रबोधन वर्गाशिवाय कृतीने जावी .

      डोक्यात आलेल्या रकमेचं पाकीट त्याच्या हातात दिलं .

” दोस्ता, आणि काय लागलं तर न लाजता हक्काने माग.”

इकबाल म्हणाला,” अरे, नाही रे . तू आठवण ठेवून मदत केलीस . खुप झालं .”

मी म्हटलं,” मदत नाही , कर्तव्य . मित्रा यात माझा स्वार्थ आहे . माझ्यात जो काही थोडा फार चांगुलपणा शिल्लक आहे . तो आणखी वाढावा यासाठी मी हे करतोय .”

      मित्रांनो, समाजातील एकोपा, चांगुलपणा टिकायचा असेल तर असेच करायला हवे . 

मी केले . तुम्ही करा . आपण करूया …

 

                  – मिलींद यादव

karmalamadhanews24: