आम्ही साहित्यिक

… गुराखी अन राखूळी …

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

… 🌹🌹🌹 गुराखी अन राखूळी 🌹🌹🌹…


ही गोष्ट आहे जुन्या पोमलवाडीची तसं पोमलवाडी म्हटलं म्हणजे गावात भरपूर शेतकरी तर होतं पण कारणास्तव रेल्वेचे कर्मचारी, शिक्षक, बंडिंगचे साहेब लोकं , तलाठी, अशा विविध माध्यमातून तिथे स्थायिक झालेले अन गावच्या लोकसंख्येमध्ये भर पडली गावचं अर्थकारण वाढलं त्यामुळे गाव कसं गजबजल्यासारखं वाटायचं त्यातल्या प्रत्येकाचं कामधंद्यानिमित्त दैनंदिन चक्र सुरू झालं आता गावकरी हे शेतकरी ते पण दोन विभागात विभागले गेलेले काही पोमाईच्या परिसरात म्हणजे गावामध्ये तर काही स्टेशन परिसरात आणि त्यातून पण देवकर वस्ती, पोपटराव जाधव यांची वस्ती, ढवाणांची वस्ती, फडतरे वस्ती, मगर वस्ती, अशी विभागली गेलेली
आता शेतकरी म्हटल्यावर पदरी थोडी तरी जित्राबं आणि कोंबड्या असायच्या पण ही जित्राबं राखूळीनं गुराख्याच्या हवाली करावी लागायची कारण जनावरांचा पण दिनक्रम असतोय आता काही बैल जोड्या होत्या त्यांना वैरण टाकली जायची तशीच बाकीच्यांना पण वैरण, चारापाणी गोठ्यात दिला जायचा पण आमच्या गावात बबल्या नावाचं एक व्यक्तिमत्त्व होतं आमच्याच शिनंपाकचं पण शिक्षणाचा लय काही गंध नाही ते राहायचं बघा रेल्वेच्या फिल्टरच्या मागं एक कोपाट होतं म्हातारी अन त्यो दोघच राहायचे पण गावातल्या बकऱ्या, गाई, शेरडा, अशी जित्राबं चरायला न्यायचं पण त्या राखणीबद्दल काही ठराविक रक्कम जनावराचा मालक त्याला द्यायचा त्याला राखूळी म्हणायचे
एवढेच काय त्या राखूळीवर चांगलं त्यांचं घर चालायचं खरं म्हणजे शेतकरी जीवनाचा विचार केला तर जनावरं पाळणं एक अविभाज्य घटक आणि त्या जनावरांची नैसर्गिक वातावरणात पैदास व्हावी हे मुख्य कारण आपल्याकडची

 जनावरं गुराख्याच्या हवाली करणं हेच कारण असतं आणि आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये मोकळेपणानं संचार करता येतो तर अशी झाली पार्श्वभूमी आता आपण या बबल्याचा जरा विचार करू म्हणजे पोमलवाडीतली सुमारे 40-50 शेरडं, करडं, गाई बबल्याकडं राखूळीला होत्या गुरांचे पण दोन-तीन गुराखी असतील एक मेंडका होता सकाळी ही पटापटा गुरा ढोरांच्या, शेरडा करडांच्या गळ्यातली पेंड मोकळी करून माळाकडं म्हणजे पारेवाडी कडे जाणारा ओढा त्याच्या आसपास एखादं दुसऱ्या किलोमीटरचा परिसर ही शेरडं करडं आणि गुरं पारेवाडीकडं जाणारा रस्ता गाई गुरांच्या आणि शेरडांच्या खुराच्या रांगोळीने आणि शेणा मुताच्या वासाने भरून जायचा

तसं बघायला गेलं तर बबल्या केळीच्या सोटासारखा, भरगच्च देहयष्टीचा, अंगापिंडाने चांगलाच भरलेला असूनही, पण कावळीच्या फोकगत लवलवीत होता, शाळा सोडून शेरडा करडा मागं कधी फिरायला लागला त्याचं त्यालाच कळालं नाही, आई होती अडाणी, मोल मजुरी करून खाणारी, पोरांनी शाळा शिकावी असा विचार पण कधी तिच्या मनाला शिवला नाही, शेरडामध्ये राहून बबल्या रानभैरी झाला होता तीन-चार भाकरीची फडक्यात बांधलेली चवड, भाकरीच्या पापुड्याच्या पडद्यात तेल चटणी, वर डाळ, कांदा, लसूण, मिरचीचा वाटलेला गोळा, बुक्कीने फोडलेला कांदा असा त्याच्या जेवणाचा बेत असायचा भाकरीचं गठुडं झाडाला अडकवून ठेवलं की कुत्र्याची भीती नसायची
गवताळ माळावर शेरडं चरायला सोडायची मग पाव्यावर गाणी रचायची चांगली चाल बसली की मग त्याच्या पाव्यातून मंजुळ स्वर निघायचे तो त्याचा स्वतःचा आलाप किंवा ताण असायची ती कुठेही सापडणार नाही शेरडं भान हरपून चरणं विसरायची लांब जाणारी चुकार शेरडं बबल्या तोंडातून चित्रविचित्र आवाज काढून माघारी वळवायचा हे शेडुरकी आणि गुराखी सगळा परिसर पायाखाली तुडवायचे रानाच्या सगळ्या खोड्या यांना माहीत असायच्या कळकाच्या बेटात लवलवत्या वादीवाणी हिरवा गार साप असतो हे त्यांना माहीत असतं तरी पण ओल्या लवचिक कळकावर चढून जायचं आणि भार देऊन कळकावर उभा राहूनच खाली यायचं आणि कळकाबरोबरच उसळून पुन्हा वर यायचं असला यांचा झोक्याचा खेळ चांगलाच रंगायचा ओढ्याच्या पटांगणात देवबाभळीनी गर्दी केलेली होती त्यात कावळीचं वेलतार माजलं होतं जणू सावलीसाठी मंडपच घातला होता या झाडावरून त्या झाडावर ते माकडउड्यांचा खेळ खेळायचे
दुपारच्याला भूक लागल्यावर सगळे तरटून जेवायचे, हुळहुळ्या तोंडाने चटणी भाकरी खायचे, गुळाचा खडा जिभेवर घोळवत ठेवून तोंडाची आग कमी करायचे, आता त्यांचं रानावनात असलेलं निसर्गाचं नातं पाहू छोटा चाकू, पायातला काटा काढायचं नाचकेन, काडी पेटी, चटणी, मीठ, मसाला, यासारख्या वस्तू जिन्नस त्यांच्याकडे कायम असायच्या कधी होल्याची, पारव्याची अंडी सापडायची, वस्तीवरच्या कोंबड्या कुठेही अंडी घालायच्या, मग असला घावलेला ऐवज गुरांच्या शेणात गुंडाळायचा काटक्या कुट्क्या गोळा करून त्याचा जाळ करायचा, आणि हे शेणाचे गोळे त्यात टाकायचे गोळ्यातला ओलसरपणा आटून मातीच्या भाजलेल्या गुंडगुल्यासारखे हे गोळे कडक व्हायचे, आतली अंडी खरपूस भाजून निघालेली असायची, मग टरकल काढून त्यावर ताव मारायचा
कधी पाणी उपसून मासे पकडायचे, जाळावरच भाजायचे, वरची करपलेली काळी कातडी काढून चटणी, मीठ लावून तिथेच खाऊन टाकायचे, कधी एखादा ससा घावायचा, कधी चित्तर,कधी भुरकन उडणाऱ्या बोरगांज्या,लाव्हे, सापडायचे, ओढ्याच्या जाळीत पानकोंबड्या मिळायच्या तर कधी घोरपड, दिवसभर कसली ना कसली शिकार ही मिळायचीचं मग ती सगळ्यांनी वाटून खायची चार वाजता चरून तट्ट फुगलेल्या शेरडांच्या कासा बबल्या तांब्यात घेऊन पिळायचा ते निरस दूध गटागटा प्यायचा आणि जोडीदाराला पण द्यायचा
म्हणजे गुराख्याचा एकंदर दिनक्रम सकाळी आठ वाजता सुरू व्हायचा सगळी जनावरं ताब्यात घेऊन वाटंला लागूस्तवर दहा अकरा वाजायचे आणि संध्याकाळी पाच सहा वाजता परत गावात येतोय शेवटचं जित्राब सोडायला साडे सातचा बिजवडा म्हणजे मुंबई हैदराबाद एक्सप्रेस गावातन कोळश्याचं इंजिन घेऊन धडधडत जायची पण एक आहे या गुराख्याचं त्यांना ड्युटी अवर्स नसतात, विकली रेस्ट, रजा, सी एल,नॅशनल हॉलिडे नाही दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी आणि गुढीपाडव्याला पण बबल्या गुरामागचं असतोयं
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Comment here