रस्त्यांची दुरावस्था : ऊस वाहतूकीला बसतोय ब्रेक
केत्तूर (अभय माने) : यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू राहिलेल्या परतीचा पाऊस त्यामुळे सर्व रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. एकीकडे 15 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या ऊस गाळप हंगाम सध्या वेग पकडत असताना केवळ रस्त्यामुळे या ऊस वाहतुकीला ब्रेक लागत आहे. काही ठिकाणी कारखान्यामार्फत जरुरीच्या रस्त्यावर मुरूम टाकून रस्त्याची तत्पुरती दुरुस्ती केली जात आहे.
करमाळा तालुक्यातील रस्त्यांची अति पावसामुळे पार वाट लागली आहे. ऊसाने भरलेली वाहने शेतातून तसेच रस्त्यावर काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्रात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने उसाने भरलेली वाहने शेताबाहेर काढताना ऊस उत्पादकांना मोठी दमछाक करावी लागत आहे परंतु खराब रस्त्यामुळे ऊस उत्पादकांना कारखाना कर्मचाऱ्यांची हांजी हांजी करावी लागत आहे. शेतातून वाहन बाहेर काढले तरी पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे कारखान्यापर्यंत वाहन नेताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर सोबत दोन ट्रेलर जोडलेले असतात या ट्रॅक्टर वाहतूकदारांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे व महत्त्वाचे असताना येथे मात्र पालन करणेविषयी कोणतेही गांभीर्य दिसून येत नाही नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत आहे. ट्रेलर भरताना क्षमतेपेक्षा जास्त भरला जात असल्याने चढ असणाऱ्या रस्त्यावर ड्रायव्हरची दमचक होत आहे तसेच याठिकाणी रस्ताही उचकट आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.खराब रस्त्यामुळे ठिकठिकाणी भरलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रेलर पडण्याचे प्रमाण वाढले आहे यामध्ये ऊस उत्पादकांचे नुकसान होत आहे.
स्टंट नकोच
काही ट्रॅक्टर वाहतूकदार ट्रॅक्टरचा पुढचा अर्धा भाग उचलून ट्रॅक्टर चालविण्याचा स्टंट करीत आहेत हा जीवघेणा स्टंट महागात पडण्याची शक्यता आहे तरी कोणत्याही वाहनधारकांनी वाहनाचे पुढील चाके उचलून वाहन चालू नये अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. ऊस वाहतूक करणारी वाहने अन्य वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.
वाहने होताहेत खराब
खराब झालेल्या रस्त्यामुळे उसाने भरलेल्या वाहनाचे टायर फुटणे, वाहन पलटी होणे असे प्रकार वाढले आहेत तर काही वेळेस गाड्यांचे पाटेही तुटत आहे.एकूणच वाहतूक करणारी वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.
Comment here