बैलपोळा हा भारतीय सिंधू कृषी संस्कृतीतील सण: वाचा बैलपोळा विशेष लेख!
बैलपोळा हा भारतीय सिंधू कृषी संस्कृतीतील सण. हा सण सबंध शेतकरी वर्गामध्ये साजरा केला जातो. साहजिकच ह्या सणाच्या निमित्ताने काही प्रश्न पडतात.काय आहे या सणामागील नेणीव? अजूनही शेतकरी वर्गात हा सण सर्वात लोकप्रिय असण्याचे काय कारण आहे?
ह्या सणाची नेणीव येथील शेतकरी वर्गात इतकी घट्ट आहे की ज्यांच्याकडे स्वतःची बैल नसतील ते लोक या दिवशी मातीची बैल जोडी करून त्यांची पुजा करतात. त्या दिवशी गोडधोड जेवायला करून पुरण पोळीचा घास बैलांना भरवतात.
त्या दिवशी कुठल्याही प्रकारचे श्रम हे बैलांकडून करून घेतले जात नाही त्या दिवशी केवळ त्यांना अंघोळ घालून, सजवून सन्मानाने पुजले जाते. गावातील मुख्य मंदिराला त्यांना घेवून प्रदक्षिणा घातल्या जातात.
इ. सन. पूर्व 2800 च्या दरम्यान लाकडी नांगराचा शोध लागल्याचे काही अर्कियोलोजिकल पुराव्यावरून समोर आलेले आहे. असाच नांगराच्या शोधाचा पहिला पुरावा हा कालिबंगण येथील नांगरलेल्या शेतीचा असल्याचे सिद्ध झालेले आहे.
त्या अगोदर म्हणजे सिंधू संस्कृतीच्या पूर्वकाळात स्त्रीसत्तेत ही शेती ही हस्तश्रमाने केली जात होती स्त्रीसत्तेच्या नंतर म्हणजे सिंधोत्तर काळात लाकडी नांगराच्या शोधाने स्त्रीसत्तेच्या जागी मातृसत्ताक राजर्षीसत्ता येवून शेती ही बैलाच्या साह्याने करणे सुरू झाले असावे.
स्त्रिसत्तेतील हस्तश्रमाच्या शेतीच्या तुलनेत नांगराच्या शोधाने बैलाच्या साह्याने केल्या जाणाऱ्या शेतीतून मिळणारे वरकड हे दुप्पटीने होते. हस्तश्रमाच्या शेतीत सबंध गण हा केवळ काहीच क्षेत्र खेडू शकत असे त्याला क्षेत्राची, अन् उत्पादनाची मर्यादा होती मात्र नांगराच्या शेतीने ही मर्यादा संपुष्टात येवून अधिकचे क्षेत्र लागवडीखाली आणणे शक्य झाले.
त्यामुळे एकूणच शेतीक्षेत्र आणि या शेतीत वरकड उत्पादन यामुळे गणाची भरभराट झाली, समृध्दी आली. हे केवळ शक्य झाले बैलाच्या साह्याने केल्या जाणाऱ्या नांगराच्या शेतीमुळे त्यामुळेच त्याच्याप्रति पूज्यभाव व्यक्त करणे हा सिंधूजणांचा व्यवहार झाला.
याच पूज्यभावातून सिंधू संस्कृतीच्या सिल्सवर बैलाची प्रतिकृती साकार झाली असावी . काही सीलवर बैलाची मुद्रा उमटवली असल्याचे समोर आलेले आहे.
जेव्हा ही जाणीव त्यांच्या नेनिवेच्या अंधारात गडप झाली तेव्हा बैलांप्रती असलेला पूज्यभावाचा अवशेष हा कर्मकांडाच्या रूपात म्हणजे या बैलपोळा या सणाच्या रुपात शिल्लक राहिला. आजही शेतीत बैलांशिवाय शेतीला पर्याय नाही.
भलेही या 21 व्या शतकात बैलाची जागा ही बहुतांशी ट्रॅक्टरने घेतली असेल मात्र तरीही अजूनही शेतीसाठी बैलांची असलेली आवश्यकता टिकून आहे.
Comment here