पाणी वाटपात जर का करमाळा तालुक्यावर अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरु; मा आ नारायणआबा पाटील यांचा कुकडीच्या पाण्यावरून इशारा
करमाळा (प्रतिनिधी);
कुकडीचे पाणी मांगी तलावासह पोंधवडी चारीतून इतर तलावात सोडा, पाणी वाटपात करमाळा तालुक्यावर अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.
याबाबत अधिक बोलताना पाटील यांनी सांगितले की, कुकडीचे ओव्हरफ्लो पावसाळी आवर्तन चालू असताना काही गोष्टी नियोजनात प्रामुख्याने घेतल्या पाहिजेत. एक तर एरव्ही कुकडीचे पाणी करमाळा तालुक्यास मिळत नाही. परंतु आता पावसाचे अतिरिक्त पाणी ओवरफ्लो होऊन मिळत आहे.
यातून मांगी तलाव भरला गेला पाहिजे. मांगी तलावावर या खालील पोथरे ,करंजे, भालेवडी, खांबेवडी, धायखिंड, मिरगव्हाण, अर्जुननगर, तर पलीकडे कामोने, निळजसह काही अन्य गावे अवलंबून असतात.
शेतीसह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची योजना यावर चालते. यामुळे मांगी तलाव हा पाणी साठवण क्षमता असेल तेवढा भरून घेतला पाहिजे.पोंधवडी चारीतुन कुकडीचे पाणी आसपासच्या भागात पोहचले पाहिजे.
यामधे पोंधवडी, विहाल , राजुरी , कोर्टी ओढा, सावडी, कुंभारगाव, देलवाडी- अंजनडोह, वीट , मोरवड बंधारे, भोसे , रावगाव, वंजारवाडी बंधारे, पिंपळवाडी बंधारे,कुंभेज, जिंती, भिलारवाडी तलाव, झरे कालवा (पोंधवडी चारी व चिलवडी चारी ) तसेच कर्जत ब्रँच कालवा – जातेगांव, कामोने, पुनवर तसेच मांगी तलावात पिण्यासाठी पाणी पोहचले पाहिजे. कुकडी योजनेत करमाळा तालुका हा टेल कडील तालुका म्हणजेच शेवटच्या टोकावरील तालुका आहे.
इतर वेळेस पाणी वाटपात व नियोजनात या तालुक्यावर अन्याय होतो किमान आता पावसाळी पाणी वाटपात तरी टेल कडील या भागात जास्त दिवस पाणी दिले जावे. संबधीत योजनेतील तलाव, बंधारे, चाऱ्या भरून घ्याव्यात. करमाळा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे.
चारा व पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. अशात कूकडीचे पाणी मिळणे आवश्यक आहे.या पाणी नियोजनात करमाळा तालुक्यावर जर अन्याय झाला तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा सूचक इशारा माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला.