उमरड गावातील अवैध दारू विक्रीला वरदहस्त कोणाचा? गावातील महिला आक्रमक!
करमाळा (प्रतिनिधी);
करमाळा तालुक्यातील उमरड गावात राजरोसपणे अवैद्य दारू विक्री सुरू असून त्यामुळे आजवर गावातील अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. याबाबत अनेक वेळा पोलिसांना निवेदन देऊनही जुजबी कारवाई दाखवली जाते पण गावात पुन्हा राजरोसपणे दारू विक्री सुरू होते. मग हे नेमके कुणाच्या आशीर्वादाने होते असा सवाल गावातील महिला व नागरिकांमधून विचारला जात आहे.
परंतु आता गावातील ही खुलेआम दारू विक्री तात्काळ बंद करावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात गावातील रणरागिनी महिला ग्राम संघाने दिला आहे.
या संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमरड गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री खुलेआम पणे चालू आहे. या दारू विक्रीमुळे दारुडे दारू पिऊन गावात शिवीगाळ करणे, भांडण करणे व नाहक त्रास देणे असे प्रकार करत आहेत.
तसेच या दारू विक्रीमुळे जवळपास गावातील दहा जणांचा प्राण गेला आहे. तसेच अनेक कुटुंबातील व्यक्ती व मुले ही दारू पिऊन बिघडली आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या दारू विक्रेतांना वारंवारार सांगूनही ते दारू विक्री बंद करत नाहीत.
याबाबत ग्रामपंचायतिने 28 जून 2023 रोजी ग्रामसभा घेऊन गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला आहे. तरीही खुलेआम दारू विक्री चालू आहे. पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने हे दारू विक्रेते कोणालाही जुमानत नाहीत, असा आरोप रणरागिणी महिला ग्राम संघाने व गावातील अनेक महिलांनी केला आहे.
ही दारू विक्री तात्काळ थांबवावी अन्यथा कार्यालय समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा रणरागिनी महिला ग्राम संघ व ग्रामस्थांनी दिला आहे.
करमाळा पोलीस स्टेशनला निवेदनन देण्यासाठी आज (ता. 4) सुमन पांडुरंग शिंदे, पल्लवी नितीन कदम, कांता विक्रम कदम, निलावती अर्जुन शिंदे, फुलाबाई अभिमान कदम, कल्पना नितीन कदम, छाया टिळक शिंदे या महिला गेल्या होत्या.
या निवेदनावर रणरागिणी महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा वैशाली दीपक चौधरी, सचिव धनश्री चंद्रशेखर पाटील व कोषाध्यक्षा सुरेखा वसंत वलटे यांच्यासह हिराबाई भाऊराव पवार, शोभा दशरथ पडवळे, कांता विक्रम कदम, लक्ष्मी गायकवाड, सोनाली मल्हारी कोठावळे, वत्सला सुरवसे, उषा सुरवसे, रंजना पाखरे, विद्या इंगळे, मंगल सुरवसे, प्रियंका चौधरी, भारती पाखरे, रेश्मा प्रशांत बदे, पल्लवी कदम, रंजना पाखरे, सुनीता भोसले, मंदा पाखरे, अंकिता भोसले, आदि महिलांच्या सह्या आहेत.