जिंती मंडळात ‘महसूल सप्ताह’ शुभारंभ उत्साहात
करमाळा (प्रतिनिधी): महसूल विभागाने वर्षभर लोकाभिमुख केलेल्या कामाचा आढावा जनतेसमोर मांडण्यासाठी दरवर्षी दि.1 ऑगस्ट हा दिवस ‘महसूल दिन’ म्हणून साजरा केला जातो.जनतेला अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षी दि.1 ऑगस्ट ते दिनांक 7 ऑगस्ट या दरम्यान ‘महसूल सप्ताह’ चे आयोजन राज्य शासनाच्या आदेशानुसार करण्यात आले आहे.जिंती मंडळात ‘महसूल सप्ताह ‘ चा शुभारंभ मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात करण्यात आला.जिंती महसूल मंडळात असणा-या जिंती,भिलारवाडी,रामवाडी हिंगणी येथे शालेय विद्यार्थ्यांची फेरी गावातून काढून ‘ई हक्क प्रणाली’ व मतदान नाव नोंदणी जागृती करण्यात आली.
‘ई हक्क प्रणाली’ ही लोकाभिमुख सेवा सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून महा-ई-सेवा केंद्र चालक यांना प्रशिक्षण साहित्य व मार्गदर्शन करून जिंती मंडळातील सर्व महा ई सेवा केंद्र ही ई हक्क प्रणालीतील फेरफार नोंदीबाबत ‘नागरिक मदत कक्ष’ म्हणून जाहीर करून तसे फलक संबंधित महा ई सेवा केंद्राच्या दर्शनी भागात लावण्यात आले.तसेच सर्व तलाठी कार्यालयात देखील याबाबत मार्गदर्शन उपलब्ध राहील असे मंडळ अधिकारी संतोष गोसावी यांनी सांगितले.
मतदार जन जागृती च्या अनुषंगाने लोकांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे,नावात चुक-दुरूस्ती या बाबत मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.’
महाराष्ट्र राज्य कृषी ग्रामीण बहुद्देशीय विकास बॅंक मर्यादित,मुंबई व
जिल्हा सहकारी ग्रामीण बहुद्देशीय विकास बॅंक (भूविकास बॅंक) संबंधी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने संपूर्ण कर्जमाफी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील संबंधित कर्ज बोजा नोंद कमी करून दुरूस्त उतारा संबंधित शेतक-यांना सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे. असल्याचे तसेच दि.1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान विवीध कार्यक्रम राबविणार असल्याचे मंडळ अधिकारी जिंती संतोष गोसावी यांनी सांगितले.
‘ महसूल सप्ताह ‘ चा शुभारंभ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी संतोष गोसावी, तलाठी जिंती प्रबुद्ध माने,तलाठी कात्रज/भिलारवाडी सोमनाथ गोडसे,तलाठी रामवाडी संजय शेटे,तलाठी हिंगणी राहुल बडकणे,तलाठी टाकळी (रा) रामेश्वर चंदेल यांनी विशेष परिश्रम घेतले तर केंद्र प्रमुख महावीर गोरे,जिंती परिसरातील शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,मतदान केंद्र स्तरीय अधिकारी,कोतवाल कमाल मुलाणी यांचे विशेष सहकार्य लाभले.