करमाळा एसटी आगाराचा अजब कारभार; ‘प्रवासी कमी आहेत’ म्हणत रद्द केली मुक्कामी एसटी, प्रवासी महिला व नागरिकांचे हाल; प्रवाशांना उलट उत्तरे
करमाळा(प्रतिनिधी) ; ऐन दिवाळीत करमाळा एसटी बस आगारात सध्या संतापजनक कारभार सुरू आहे. आगारावर कुणाचे नियंत्रण आहे की नाही.? मनाला वाटेल तेव्हा व मनाला वाटेल त्या बस गाड्या केव्हाही रद्द केल्या जात आहेत व प्रवाशांना उलट सुलट उत्तरे दिली जात आहेत.
असाच प्रकार गुरुवार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी करमाळा डेपोत दिसून आला. सायंकाळी सात च्या ‘करमाळा-आवटी’ गाडीसाठी अनेक महिला, त्यांच्या चिमुकल्या मुलीमुले व नागरिक स्टँडवर गाडीची वाट पाहत होते. वेळ होऊन गेली तरी गाडी लागेना तेव्हा या लोकांनी चौकशी कक्षात विचारणा केली तर ‘प्रवासी कमी आहेत म्हणून आम्ही गाडी रद्द केली आहे , दुसरं कशाने जायचं ते तुमचं तुम्ही बघा’ असे उत्तर प्रवाशांना मिळाले.
यावर बाहेर गावाहून प्रवास करून हिसरे, हिवरे, कोळगाव, गौंडरे, आवाटी याभागात जाणाऱ्या या महिला व प्रवाशांत कपाळावर हात मारून घ्यायची वेळ आली. यातील महिला व मुली हतबल झाल्या आता ऐन वेळी, या रात्रीच्या वेळी घरी कसे जायचे? हा प्रश्न या प्रवाशांपुढे निर्माण झाला.
त्यातील एका प्रवाशाने अशी अचानक गाडी का रद्द केली.? विचारले व तक्रार पुस्तक मागितले तर तक्रार पुस्तक नाही , ते आत डेपोत मॅडम कडे असते. व सध्या मॅडम गावी गेल्या आहेत, असे उत्तर श्री नवले यांनी दिले. व तुम्हाला बोलायचं असेल तर मुसळे साहेबाना बोला असे सांगून त्यांचा नंबर देण्यात आला.
त्यानंतर श्री मुसळे याना संपर्क केला असता ‘शाळा बंद आहेत, प्रवाशी कमी आहेत म्हणून आम्ही ही अशा पन्नास टक्के गाड्या रद्द केल्या आहेत’ हे उत्तर मिळाले. पण संध्याकाळी बाहेरगावहुन येणारे लोक व इतर प्रवाशी याना अचानक कसे कळणार, त्यांची अडचण होणार यास कोण जबाबदार.? असे विचारले असता “आम्हाला काय स्वप्न पडलंय का.? तुम्ही संध्याकाळी येणार म्हणून!” अशा प्रकारे त्यांनी प्रवाशांनाच उलट उत्तरे दिली. दिवसभरातील कोणतीही फेरी रद्द करणे ठीक, पण मुक्कामी गाडी रद्द करणे चुकीचे आहे.
या गाडीसाठी आलेल्या, या महिला, मुली यांनी आता काय करायचं.? यांची जबाबदारी कोणाची.? त्यांच्या सुरक्षेची हमी तुम्ही देता का.? या प्रश्नावर तुमचं तुम्ही बघा. अशी उत्तरे करमाळा स्थानकातील या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली.
गाडी रद्द केली हे स्टँडवर माईकवर सांगितल्याने जे लोक बाहेरून दुरून प्रवास करून, मुक्कामी गाडीसाठी येणार आहेत, त्यांना हे माहीत होणार आहे का.? प्रवाशी कमी आहेत म्हणून एसटीच्या फेऱ्या रद्द करणारे हे करमाळा आगारातील कर्मचारी महामंडळाचे आहेत की वडाप जीप वरचे ड्रायव्हर आहेत.? असे सवाल प्रवाशी उपस्थित करत होते. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या महिला व प्रवाशांना झालेल्या या त्रास व मनस्तापाची जबाबदारी नेमकी कोणाची.? यांच्यावर कारवाई होणार का.? हा सवाल आता विचारला जात आहे.
प्रवाशांनी तक्रार पुस्तक मागितले असता, ते पुस्तक इथे नसते असे म्हणत चौकशी कक्षातील कर्मचाऱ्याने आधी तक्रार पुस्तक द्यायला नकार दिला पण नंतर कक्ष प्रमुख मुसळे यांच्याकडे तक्रार फोन झाल्यावर तेथेच हाताखाली असणारे तक्रार पुस्तक काढून दिले. म्हणजे एकूणच सामान्य नागरिकांना करमाळा आगारात तक्रार पुस्तकच दिले जात नाही ही बाब उघड आहे.
Comment here