सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ 50 हजारांची मदत द्या; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना
सोलापूर, दि.22(जिमाका): जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे. प्रत्येक विभागांनी कामात सातत्य ठेवावे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी तत्काळ मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, पोलीस आयुक्त हरीष बैजल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
श्री. भरणे यांनी सांगितले की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासन 50 हजार रूपये देत आहे. जिल्ह्यात 11355 ऑनलाईन अर्ज आले असून यातील 6193 अर्ज स्वीकारले आहेत. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील तीन-चार अर्ज आले आहेत.
यामुळे अर्जाची संख्या वाढत गेली आहे. कुटुंबातील नागरिकांनी एकच अर्ज भरावा. काही जणांनी ऑनलाईन कागदपत्रे उपलब्ध केली नसतील तर त्यांना पुन्हा संधी देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
सद्यस्थितीत पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ या तालुक्यात रूग्णसंख्या जास्त वाढत आहे. सध्या 124 ग्रामीणमध्ये तर शहरात 42 असे 166 रूग्ण उपचार घेत आहेत. यातील 79 रूग्ण घरी उपचार घेत आहेत. रूग्णांची लक्षणे सौम्य असली तरी प्रत्येकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
लसीकरणीचा वेग वाढवा-
कोरोना रूग्ण कमी होत आहेत, तोपर्यंत लसीकरण करून घेणे फायद्याचे आहे. लसीकरणानंतरही कोरोना लागण होते पण त्याची तीव्रता कमी होते, जीव वाचवण्याचे सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची आहे, हे जनतेला पटवून द्या. जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लस मिळू लागली आहे.
प्रशासनाने यंत्रणेशी सतत संपर्कात राहून लस उपलब्ध करून घ्यावी. 15 ते 18 वयोगटातील युवकांना कोवॅक्सीन डोसची मागणी वेळेत नोंदवून उपलब्ध करून घ्यावे. पहिला डोस 30 लाख 60 हजार 928 नागरिकांना दिला असून 87 टक्के लसीकरण झाले आहे.
दुसरा डोस 20 लाख 93 हजार 148 नागरिकांनी घेतला असून याची टक्केवारी 86 टक्के झाली आहे. 15 ते 18 वयोगटातील 42 टक्के युवकांना कोवॅक्सीनचा डोस दिला असून लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. भरणे यांनी दिल्या.
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेले रूग्ण 5650 आहेत. यातील 1900 रूग्ण इतर जिल्ह्यातील होते. ऑनलाईन अर्ज केलेल्यामध्ये कागदपत्रे राहिलेल्यांना बोलावून घेऊन 90 जणांचे अर्ज पुन्हा स्वीकारले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी दिली.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त दिपाली धाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Comment here