करमाळा शहरातील पाणी पुरवठयाबाबत जयवंतराव जगताप यांनी अधिकाऱ्यांना केल्या ‘या’ सूचना !
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा शहराला होणारा पाणीपुरवठा रोज सकाळी ठीक सात वाजता नियमितपणे होण्यासाठी पालिका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी व पुरेशा दाबाने पाण्याचे वितरण करावे याबाबतीत कसलाही हलगर्जीपणा करू नये अशा स्पष्ट सूचना माजी आ. जयवंतराव जगताप यांनी पालिकेचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
उजनी जलाशयाची पाणी पातळी सध्या प्रचंड हलावलेली असल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहीगाव येथील जॅकवेलला पाणी मिळण्यासाठी चारी खोदून कसेबसे पाणी मिळवून पंपिंग करावे लागत असल्यामुळे सकाळी साडेसात ऐवजी बऱ्याचदा पाणी उशिरा येत असल्याने तसेच सकाळी ८ ते ९ या दरम्यान विजेचे भारनियमन केले जात असल्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी मिळू शकत नाही, परिणामी विजेअभावी इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सध्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
याबाबतच्या नागरिकांच्या असलेल्या वाढत्या तक्रारी मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या कानावर घातल्यानंतर जगताप यांनी याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत.