आमदारकीला पाटील गटाची स्पर्धा आमदार संजय मामा शिंदे यांच्याशी; बागल आमदारकीच्या स्पर्धेत ही नाही? पाटील गटाने डिवचले!
करमाळा (प्रतिनिधी); पाटील गटाची स्पर्धा आ.संजयमामा शिंदे यांचेशी असून 2024 मध्ये नारायण पाटील हेच आमदार असतील, असा दावा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला. नुकताच मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागला. बागल गटाने यावर निर्विवाद बहुमत मिळवले. यानंतर पराभुत मकाई परिवर्तन पॅनल कडून आजी माजी आमदारांनी बागल गटास अपरोक्ष मदत केल्याचा आरोप केला गेला.
यावर आज पाटील गटाकडून स्पष्टीकरण देताना तळेकर यांनी स्पष्ट केले की, माजी आमदार नारायण पाटील हे आज पर्यंत पारदर्शक पद्धतीने राजकारण करत आले आहेत. राजकारणातील दिलेला शब्द पाळणे हा त्यांच्या राजकारणाचा आत्मा आहे. नारायण (आबा) पाटील हे 2014 साली रश्मी बागल यांचा पराभव करुनच आमदार झाले.
सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार नारायण आबा पाटील यांची स्पर्धा आमदार संजय मामा शिंदे यांच्याशी असेल, असे सांगत पाटील गटाच्या प्रवक्त्यांनी अप्रत्यक्षपणे बागल व इतर आमदारकीच्या स्पर्धेत ही नाहीत असा खोचक टोला लगावला आहे व डिवचले आहे, याची जाणकार मंडळी चर्चा करीत आहे.
तब्बल 25 वर्षे करमाळा पंचायत समितीवरील सत्ता माजी आमदार नारायण पाटील यांनीच मोडीत काढली व पाटील गटाकडे पंचायत समिती खेचुन आणली. हा निवडणुकांचा इतिहास लक्षात घेतला पाहिजे. मकाईवर स्थापनेपासून बागल गटाची सत्ता आहे. करमाळा पंचायत समिती ज्याप्रमाणे ताब्यात घेतली त्याप्रमाणे मकाई सहकारी साखर कारखाना हा सुद्धा घेता येईल, परंतू यासाठी भरपुर पूर्वतयारी करण्याची गरज आहे.
विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या निष्क्रियतेमुळे तालूक्याचा विकास खुंटला आहे. कुकडीचे पाणी मिळत नाही, दहिगाव उपसा सिंचन योजना आवर्तन एक महिना अगोदरच बंद होतेय. ही योजना पुर्ण क्षमतेने चालत नाही. तालूक्यात सर्वत्र खराब रस्त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतीसाठी पुर्ण दाबाने वीजपुरवठा होत नाही. पुनर्वसन खात्याकडून धरणग्रस्त गावांना अठरा नागरी सुविधा दिल्या जात नाहीत.
माजी आमदार नारायण पाटील यांनी अथक प्रयत्नाने मंजुर करुन उभारलेले जेऊर येथील आरोग्य केंद्र कर्मचारी नसल्याने बंद आहे. जातेगाव-टेंभुर्णी रस्ता राज्य व केंद्र यांच्या हस्तांतरात तसाच दुरावस्थेत आहे. हे असे शेकडो प्रश्न आज नागरिकांसमोर आहेत. यामुळे पाटील गटाची खरी लढाई ही निष्क्रिय लोकप्रतिनिधी विरोवात आहे.
तालूकांतर्गत निवडणुका होत राहतीलच. जि प सदस्या सौ सवितादेवी राजेभोसले ह्या पाटील गटासाठी महत्वाच्या नेत्या असून पाटील गटात त्यांना आदराचे स्थान आहे. पाटील गटासाठी नवनाथ झोळ काय म्हणतात हे महत्त्वाचे आहे. इतर झोळ कोणते आरोप करतात याचेशी आम्हाला काही देणेघेणे नाही.
यामुळे सोशल मीडियावर ज्या पोस्ट फिरत असतील त्यामधील मजकुराच्या आशयाचा आणि माजी आमदार नारायण पाटील यांच्या भुमिकेचा काडीमात्र संबंध नसल्याचे स्पष्टीकरण तळेकर यांनी दिले. आगामी सर्व निवडणुका पाटील गट मोहिते-पाटील गटास बरोबर घेऊनच लढणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील व आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली माजी आमदार नारायण पाटील काम करत असून जो मोहिते-पाटील यांचा शत्रु असेल त्याला नारायण(आबा) पाटील सुध्दा शत्रुच मानतील असे बेधडकपणे प्रवक्ते तळेकर यांनी स्पष्ट केले.