द्वेषातून ज्यांनी कामगारांना घरी बसवून त्यांच्या अन्नात माती कालवली, त्यांच्या दारात धुळ उडाली तर लगेच राजकीय द्वेष कसा? पेरलं तेच उगवणार!
करमाळा(प्रतिनिधी); करमाळा उपजिल्हा रुग्णालयाकडून न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अगदी वाईट झाली आहे. या रस्त्यावरच राजकीय नेत्यांची घरे आहेत. पण ह्या रस्त्याचे काम मागील काही काळापासून रखडलेले आहे. “राजकीय सूडापोटी हे काम रखडवले जात आहे” असे आरोप होताना व माध्यमातून तशा बातम्या येऊन चर्चा होताना दिसून येत आहे. पण याच विषयावर जनतेतूनही नेमकी काय चर्चा चालली याचा हा खास रिपोर्ट!
मकाई सहकारी कारखान्यावर अनेक वर्ष काम करणाऱ्या अनेक कामगारांना कोणतेही कारण न देता चेअरमन व कारखाना व्यवस्थापनाने मागील तीन वर्षांपासून घरी बसविले आहे.
एक प्रकारे अनेक वर्ष कारखान्याच्या नोकरीवर अवलंबून असणारे, ज्यांचा घरसंसार या नोकरीवर अवलंबून होता, त्यांच्या घरची रोजी रोटी कारखान्याच्या आपल्या कामाच्या कष्टावर चालत होती. पण त्यांना कोणतेही कारण न देता केवळ राजकीय द्वेषातून, त्या कामगारांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळली आहे. चेअरमन व व्यवस्थापनाने त्यांना घरी बसवून ते कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या अन्नात माती कालवली आहे.
पण याच कारखान्याच्या चेअरमनच्या बंगल्याकडे जाणारा रस्ता खराब झाला. त्याचं काम लवकर झालं नाही. तर ते धुळीने त्रस्त झाले आणि रस्त्याचे काम राजकीय द्वेषातून होत नाही अशी सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
पण ज्यांनी द्वेषातून शंभराहून अधिक कामगारांना कामावरून काढून घरी बसवून त्यांच्या अन्नात माती कालवली, त्याची कोणीच चर्चा करत नाही. पण त्यांच्या दारात धुळ उडाली तर लगेच राजकीय द्वेषाची चर्चा होते.
याबाबत “त्यांनी जे पेरलं तेच उगवून येणार!” अशी चर्चा करमाळा तालुक्यातील गावागावातून पारावर होताना दिसत आहे. तसेच अनेक कामगारांमधूनही दबक्या आवाजात हे बोलले जात आहे.
खरंतर नेत्यांचं घर आहे म्हणून रस्त्याची चर्चा होण्यापेक्षा त्या नेत्याने तालुक्यातील रस्त्याच्या दुरवस्थेची दखल घेत त्यासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे. पण तालुक्यातील प्रत्येक गाव अन् गावातील रस्ते धुळ खात असताना.. “खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे” हे कळत नसताना चर्चा मात्र फक्त नेत्याच्या दरातील रस्त्याची करण्यात काय अर्थ आहे.
Comment here