करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 74 हजारांचा मुद्देमाल व तिघेजण ताब्यात
करमाळा(प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरू असून अनेक ठिकाणी पोलीस कारवाया होत आहेत. तशीच एक कारवाई काल रविवार दि. 30 जानेवारी 2022 रोजी करमाळा तालुक्यातील नेरले या गावात जुगार अड्ड्यावर करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुंगशी नेरले रोडवर नेरले येथे कांतीलाल काळे यांच्या शेतात एका झाडाखाली जुगार सुरू होता. त्या अड्ड्यावर करमाळा पोलिसांनी छापा टाकून सुमारे ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच यावेळी तेथे जुगार खेळणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना पोलिसांनी जागेवर पकडले तर चौघे येथून पळून जाण्याचा यशस्वी झाले.
सदर प्रकरणी पोलिस नाईक बालाजी घोरपडे यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले की, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी बिभिषण शंकर शिंदे (रा.लोणी, ता.माढा), कांतीलाल मिजास काळे व छबन महादेव अंधारे (दोघे रा. नेरले, ता. करमाळा) अशी यातील पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.
तर शशीराव भारत काळे, नानासाहेब विठठल नाईक, सोमनाथ अभिमान मुसळे व बबन यल्लप्पा काळे (सर्व रा. नेरले, ता. करमाळा) अशी पळून गेलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
जुगार खेळत असलेल्या ठिकाणावरून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोटरसायकली असा सुमारे ७४ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपींच्या मोटरसायकली ही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. याप्रकरणी करमाळा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Comment here