करमाळा तालुक्यातील नेरले येथील रेशन दुकानातील भ्रष्टाचाराचे प्रकरण मंत्रालयापर्यंत; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण
करमाळा(प्रतिनिधी) ; सोलापूर येथील जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे यांच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभारामुळे नेरले ता. करमाळा येथील लाभार्थी रेशनच्या धान्यापासून वंचित, तसेच त्यांनी नवीन दुकान मंजुरी देताना लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा मी दि.१७/६/२०२२ रोजी पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विजय पन्हाळकर यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
श्री.पन्हाळकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील नेरले येथील नागरिकांना स्वस्त धान्य दुकान हे गेल्या अनेक वर्षांपासून वरकुटे व काही कार्ड धारक यांना आवाटी येथे तात्पुरत्या स्वरूपात जोडून दिलेले होते.
परंतु मागील सहा महिन्यांपूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर यांनी जाहीर प्रसिद्धी करून शासकीय नियम व अटी नमूद करून नवीन दुकान परवाना मिळणे साठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार गावांतील विविध बचत गट व संस्थांचे अर्ज दाखल झाले होते. परंतु जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे यांनी त्यांच्या पदाचा गैर वापर करून, लाखो रुपयांची माया गोळा करून इतर कोणत्याही अर्जाचा विचार केला नाही.
मात्र ज्या बचत गटाच्या सचिव गेल्या वर्षी मयत आहेत, त्यांच्या सह्या खोट्या आहेत. त्यांनी या वर्षीचा ऑडिट मेमो तयार करून घेतला आहे त्यावरही मयत झालेल्या सचिव यांच्या खोट्या सह्या केल्या आहेत. अशाच अपात्र असलेल्या बचत गटास नवीन दुकान परवाना मंजूर केला आहे. त्याबद्दल व रेशन कार्ड धारक यांना न्याय मिळवून द्यावा म्हणून आम्ही अनेक वेळा निवेदन देऊन, समक्ष भेटून ही तक्रार केली होती.
परंतु श्रीमती वर्षा लांडगे या कुणालाच जुमानत नाहीत. त्या अत्यंत भ्रष्टचारी व मनमानी कारभार करीत आहेत. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे व बचत गटाच्या अध्यक्षा कांचन शरद काळे व सर्व सबंधित सदस्य यांनी बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय नियम व अटी यांची पायमल्ली करून संगनमताने लाखो रुपयांची देवाणघेवाण करूनच बचत गटास नवीन दुकान परवाना मंजूर केला आहे.
तसेच या दुकानातून आत्ता पर्यंत फक्त ११ लोकांनीच धान्य साठा उचल केलेली आहे. हे धान्य दुकान तात्काळ रद्द करण्यात यावे म्हणून या पूर्वीही आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे यांच्या कडे तक्रार केली होती परंतु श्रीमती वर्षा लांडगे याच या प्रकरणात सामील असल्याने त्या कोणतीही कारवाई करू शकत नाहीत. तसेच तहसीलदार करमाळा यांच्या कडे ही तक्रार करून उपयोग होतोच नाही. असेही नमूद केले आहे.
निवेदनात शेवटी म्हटले आहे की, आपण स्वतः लक्ष घालून श्रीमती वर्षा लांडगे यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी व ज्या बचत गटाने बोगस कागदपत्रे तयार करून दुकान परवाना मंजूर करून घेतला आहे त्या बचत गटाच्या सबंधित अध्यक्षा, सौ कांचन शरद काळे व सदस्य यांची सखोल चौकशी करून त्यांच्या विरूद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कारवाई होणे विषयी सर्व सबंधित अधिकारी यांना आदेश द्यावेत हि विनंती अन्यथा मी नेरले गावातील हनुमान मंदीरात दि.१७/६/२०२२ रोजी पासून आमरण उपोषणाला बसणार आहे. याची नोंद घ्यावी अशी विनंती केली आहे.
या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री,विरोधी पक्षनेते, विभागीय उपायुक्त पुरवठा विभाग पुणे, जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर, तहसीलदार करमाळा पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन करमाळा यांना पाठविल्या आहेत.
Comment here