करमाळा तालुक्यातील गावागावात सुरूय ग्रामपंचायतीची रणधुमाळी: जनतेतून सरपंच.. अनेकांनी बांधले गुढग्याला बाशिंग
केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीसाठी 28 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी गाव, वाडी, वस्तीवरील नागरिक तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. ग्रामसेवकाकडून घरपट्टी, पाणीपट्टी इतर कर भरल्याच्या पावत्या स्वच्छतागृह असल्याचे प्रमाणपत्र, बँकेत खाते, फोटो, विविध शपथपत्रे आदि कागदपत्रांसाठी लगबग व गडबड पाहावयास मिळत आहे.
जनतेतून थेट सरपंचाची निवड होणार असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे व तयारीला लागले आहेत. काही ठिकाणी सुशिक्षित राजकारणापासून दूर असलेली मंडळीही इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.
निवडणुकीला रंग चढण्यापूर्वीच निवडणुकांच्या निमित्ताने चर्चा होत असून इच्छुकांनी व्हॉट्सॲप, फेसबुकवरून प्रचाराची राळ उठवली आहे.ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भावी उमेदवारांनी मतदार याद्या गोळा करणे, मतदारांची संपर्क साधणे,मतदारांच्या अडीअडचणी समजावून घेणे याकडे लक्ष दिले आहे.
उमेवारी देताना पॅनल प्रमुखांकडून बंडखोरी होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे.परंतु सरपंच जनतेतून निवडला जाणार असल्याने सदस्य पदासाठी ईच्छुकांची संस्खा कमी आहे.त्यामुळे पँनल प्रमुखांना उमेदवारी देताना दमछाक होत आहे.सगळी भिस्त पॅनल प्रमुखावर असल्याने त्यामुळे हा त्यांचेसाठी कसोटीचा काळ समजला जात आहे.
तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्या तरी तालुक्याचे राजकारण मात्र तापू लागले आहे. सत्तास्थापन करण्यासाठी गावातील राजकीय आखाडे चर्चेने रंगत आहेत. भावनिक सात घातली जात आहे.
हॉटेल तसेच धाब्यावर वर्दळ वाढू लागली आहे. प्रचार मोहिमेसाठी रणनीती आखली जात आहे.एकूणच सगळे वातावरण निवडणूकमय झाले आहे.
Comment here