करमाळाधार्मिक

करमाळ्यातील प्रसिद्ध शक्ति पंचायतन श्री कमलाभवानी मंदिर!!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळ्यातील प्रसिद्ध शक्ति पंचायतन श्री कमलाभवानी मंदिर!!

मानवी जीवनात शक्ति उपासनेला अगदी प्राचीन काळापासून विशेष महत्त्व आहे, मानवाला दृश्य सृष्टीतील ज्या शक्तीचे आकलन झाले नाही त्या शक्ती भोवती देवत्वाची वलये गुंफून दैवी स्वरूपात तीची उपासना मानव करु लागला, दुखीतांचे दु:ख दुर करणारी, नवजीवन देणारी, वात्सल्याच्या वर्षावाने सुखावून ठेवणारी तर कधी उग्र रुप धारण करणारी रणचंडिका ही आदिशक्ती अनेक रूपातून प्रकटते.

म्हणूनच आजच्या काळातही शक्तीची उपासना प्रेरणादायी ठरते. या उपासनेला वेद पुर्व काळापासून प्रारंभ झाल्याचे आढळून येते. या नंतरच्या काळात पुराण शास्रात देवीच्या अनेक अवतार कथा प्रसिद्ध आहेत.

या विविध दुर्गा अवतारामध्ये संपूर्ण भारतात जगदंबा मातेची आराधना केली जात आहे. करमाळा तालुक्यातील श्री देवीचामाळ येथील प्रसिद्ध श्री कमलाभवानी मातेचे मंदिर हिंदू धर्मशास्त्रा अनुसार शक्ती पंचायतन म्हणून ओळखले जाते.

हिंदू धर्मातील वेद शास्त्रामध्ये पाच प्रमुख देवता मानल्या जातात त्यामध्ये श्री गणेश, भगवान शिव, भगवान विष्णु, सूर्यनारायण आणि आदिशक्ती जगदंबा यांचा समावेश होतो. याच धर्म शास्रानुसार या पाच प्रमुख देवता मंदिराभोवती विराजमान आहेत, यामुळे या शक्ती पंचायतन श्री कमलाभवानी मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

मंदिराची उभारणी सतराव्या शतकातील असल्याचे दिसून येते, निजाम कालीन मराठा सरदार राजेरावरंभा निंबाळकर यांनी मंदिराची उभारणी केली असल्याचे दिसून येते. मंदिरामध्ये श्री कमलाभवानी मातेची गंडकी पाषाणातील पाच फुट उंचीची अष्टभुजा स्वरुपातील सुंदर व रेखीव मुर्ती विराजमान आहे. जगदंबा सिहांवर आरुढ असून महिषासुर मर्दन करीत आहे.

मुर्तीच्या हातामध्ये विविध अस्रे आहेत.
मुख्य मंदिराभोवती उजव्या बाजूला भगवान शंकराचे शिवलिंग व पुढील बाजुला श्री गणेश मंदिरात बसलेली गणेशाची मुर्ती आहे. तसेच प्रदक्षिणा मार्गावर पुढे सूर्यनारायण रथात आरुढ झालेल्या स्वरूपात मुर्ती असून त्या नंतर पुढे भगवान विष्णुलक्ष्मी गरुडा वर आरुढ झालेल्या स्वरूपातील आकर्षक मुर्ती स्थापन केलेली आहे.

अशा स्वरुपाचे वैशिष्ट्यपुर्ण हे श्री कमलाभवानी मातेचे मंदिर असून येथील नवरात्र उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होतो. घटस्थापना झाले पासून हजारो लोक नऊ दिवस दर्शनासाठी हजेरी लावत असतात.

करमाळा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर असून विश्वस्त कमीटी मार्फत कारभार पाहिला जातो.

मंदिराचे बांधकाम हेमाडपंती शैलीतील असून ९६ या अंकाला विशेष महत्त्व दिले असल्याचे दिसून येते. ९६ कुळी मराठा समाजाला अनुसरून ९६ खांबावर मंदिर उभारणी करण्यात आली आहे तसेच ९६ पायरी असलेली बारव या मंदिराचे वैभवात भर घालते आहे. दुहेरी तटबंदी असलेल्या या मंदिराचा आवार मोठा असून आवारात दगडी फरसबंदी आहे.

मंदिरात तीन भव्य दीपमाळा असून त्याचे वरच्या टोकापर्यंत जाण्यासाठी पाय-यांची रचना केलेली आहे. मंदिराचे शिखर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असून शिखरावर देवतांच्या आकर्षक मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराभोवती असणाऱ्या तटबंदीच्या आतील बाजूस येणाऱ्या भाविक भक्तांसाठी प्रशस्त ओव-या बांधलेल्या आहेत. नवरात्र उत्सवाच्या कालावधीत रोज दोन वेळा महापुजा आरती सोहळा संपन्न होतो.

अशा या वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या मंदिरात नवरात्र काळात दर्शनासाठी एकवेळ अवश्य भेट देऊन आदिमाया आदिशक्ती जगदंबा मातेचा आशिर्वाद प्राप्त करावा.

संकलन
भाऊसाहेब फुलारी श्री देवीचामाळ ता. करमाळा

litsbros

Comment here