करमाळासोलापूर जिल्हा

मैदानातल्या पेक्षा जास्त ग्रामपंचायत निवडणूक रंगली सोशल मीडियावर; लोकांचे मोबाईल हँग !

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मैदानातल्या पेक्षा जास्त ग्रामपंचायत निवडणूक रंगली सोशल मीडियावर; लोकांचे मोबाईल हँग !

केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यात 30 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागल्या असल्या तरी त्यापैकी दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पडलेल्या आहेत. बाकी 28 गावातील निवडणुकीचा प्रचार अत्यंत शिगेला पोहोचला आहे त्यासाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यावेळी पारंपारिक प्रचाराला फाटा देऊन आधुनिक प्रचाराला उमेदवार भर देत आहेत.

त्यामुळे मोबाईल मेसेज, व्हिडिओ, गाणी यांनी मोबाईल हाउसफुल झाले आहेत. निवडणुकीला उभा राहिलेल्या प्रत्येक जणांनी प्रामुख्याने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

यामध्ये व्हाट्सअप व्हिडिओ, स्टेटस, गाणी,फोटो रिल्सद्वारे प्रचार जोरात सुरू आहे यामुळे उमेदवाराला खर्चही कमी करावा लागत आहे. डिजिटल बॅनर, पोम्प्लेट जाहीरनामानाचा प्रचाराचा भर दिसून येत आहे.

पारंपारिक प्रचार गायक झाल्याचे यावेळी प्रकर्षाने दिसून येत आहे. पूर्वी स्पीकर, मंडप, सभा याद्वारे सहभाग घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असे परंतु यावेळी केवळ गावफेरी काढल्यानंतर मतदारांच्या गाठीभेटी होत आहेत जणू काही डिजिटल वॉर सुरू झाल्याने मोबाईल मात्र गच्च भरून वाहत आहेत.

ग्रामीण भागातील गावगाड्याच राजकारण कमी जास्त होणाऱ्या थंडीतही चांगलंच तापले आहे. यामध्ये आजी माजी सरपंच तसेच सदस्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे आणि गावात सध्या तरी निवडणूक होत असून संक्रातीच्या तोंडावर काहींची दिवाळी तर काहींवर संक्रांत येणार आहे.

गावगावात गटबाजीला उधान आले आहेच त्यातच जातीपातीचे राजकारण, जुने वाद, भाऊबंदकी याला मोठ्या प्रमाणावर उधान आले आहे.सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने तो आपल्या जवळचा विचाराचा तसेच आपले ऐकणारा असावा असे सर्वांनाच वाटत आहे त्यामुळे एक एक मत महत्त्वाचे असल्याने ते जुळवण्यासाठी गडबड सुरू झाली आहे.

मतदारांची जुळजळव करण्यात नेतेमंडळी तसेच उमेदवार व्यस्त झाले आहेत. भावकी, नातेगोते यांची जुळवाजुळ करताना चांगलीच दमछाक मात्र होत आहे. परगावी असणाऱ्या मतदारांची गाठभेट घेऊन झाल्या आहेत आता त्यांना मतदानासाठी आणण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे.

सोशल मीडियावर गुलाल आपलाच, दादा, मामा, भाऊ, आबा अशा पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. विकासकामे, जाहीरनामा, वचननामाही प्रदर्शन करण्याची औपचारिकता मात्र पाळली जात आहे.

मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसतसे बहुतेक ठिकाणी जेवणावेळी पार पडत आहेत. दोन्ही गटातील मतदार जेवणासाठी हजेरी लावत असल्याने मतदार नेमके काय करणार ? याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

शेवटी काही मतदार मात्र पैसे घेऊन मतदान करतात त्यांना विकास तसेच कामाचे काही देणे घेणे नसते त्यामुळे तो एखादे काम घेऊन गेल्यास तू कुठे मला मतदान दिले आहे असा जाब उमेदवाराकडूनच विचारला जात आहे.त्यामुळे आपोआपच त्याचे तोंड बंद होत आहे.

सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे मात्र अनेक उमेदवारांनी प्रचारासाठी वापर केला आहे.

त्याद्वारे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत याकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष आहे.ठराविक कालावधीनंतर प्रचार थांबविणे याकडे कोणाचेही लक्ष नाही आचारसंहितेचे पालन होते की नाही याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

litsbros

Comment here