तालुक्यात ‘गाव तिथे कोविड सेंटर’ उभारणे काळाची गरज; ग्रामपंचायतींनी पुढाकार घेणे गरजेचे
उपळवटे(प्रतिनिधी) ; सध्या करमाळा व माढा तालुक्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या 200-300 च्या पुढे चालली आहे. या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर तरी किती मोठे करणार.? आणि एका ठिकाणी उपचार कसे होणार ? हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे कोरोनाची साखळी कुठेतरी तुटावी. रुग्णांचे व नातेवाईकांचे हाल थांबवेत, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार ‘गाव तिथे कोविड सेंटर’ उभारण्यासाठी आता ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे झाल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागात सध्या वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांवर लवकरात लवकर उपचार होणे गरजेचे असुन या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक गावातील जिल्हा परिषद शाळांचा उपयोग कोविड सेंटर म्हणून केल्यास तालुक्यातील एकाच ठिकाणी कोविड सेंटरवर येणारा ताण कमी होईल. परिस्थिती थोडी तरी सुधारेल, अशी आशा आहे.
कौतुकास्पद; ‘या’ तालुक्यातील शिक्षकांनी वर्गणी करून उभारले ६० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर
करमाळा तालुक्यातील केम या ग्रामपंचायत ने ग्रामपंचायती मार्फत 50 बेडचे कोविड सेंटर आजपासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून सुरू केले आहे. त्यामुळे आता गावातील रुग्णांवर बाहेर जाण्याची वेळ येणार नाही. केम ग्रामपंचायतचा हा आदर्श इतर सर्व ग्रामपंचायतींनी घेतला पाहिजे.
रुग्ण गावातील कोविड सेंटर मध्ये राहिल्यास त्या रुग्णांना जेवणाचा घरचा डबा व बेड मिळवण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही बेड गावामध्ये उपलब्ध झाल्यामुळे गावांमध्ये कमी खर्चात उपचार होईल. रुग्णांवर प्राथमिक अवस्थेत उपचार होणे गरजेचे आहे. लक्षणं दिसताच चाचणी करून औषधोपचार केल्यास पेशंट प्रथम टप्यात बरा होईल.
याच पार्श्वभूमीवर उपळवटे गावामध्ये हि कोविड सेंटर उभारण्यात यावे, यासाठी उपळवटे गावचे सरपंच बालाजी काका गरड पाटिल यांच्याशीही आपण चर्चा करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संदिप घोरपडे यांनी ‘करमाळा माढा न्युजला’ सांगितले.
Comment here