करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात घोणस सदृश्य विषारी अळीचे आक्रमण :शेतकऱ्यात घबराटीचे वातावरण, कोणत्या पिकावर येते ही अळी? कशी ओळखावी ही अळी.? काय काळजी घ्यावी.? वाचा सविस्तर!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात घोणस सदृश्य विषारी अळीचे आक्रमण :शेतकऱ्यात घबराटीचे वातावरण, कोणत्या पिकावर येते ही अळी? कशी ओळखावी ही अळी.? काय काळजी घ्यावी.? वाचा सविस्तर!

केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यात उसावर व वाढलेल्या गवतावर घोणस अळीचा सदृश्य विषारी अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील वडगाव दक्षिण येथील एका शेतकऱ्याला याचा फटका बसला आहे. तो या घोणस अळीच्या संपर्कात आल्याने खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे.

अशाच प्रकारची विषारी घोणस अळी केत्तूर येथील शिवाजी पाठक यांच्या उसाच्या शेतात दिसून आली आहे. बेण्यासाठी ऊस तोडत असताना अळी खाली पडली होती. विषारी अळी आपल्या भागातही आली हे समजतात शेतकऱ्यात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

वारंवार बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम पिकावर होत असतानाच आता ऊस आणि वाढलेल्या गवतावर हिरवट पिवळसर रंगाची आळी दिसून आली आहे. या अळीचा पिकावर परिणाम होतोच शिवाय माणसावर ही परिणाम होत आहे.

या अळीचा अंगाला स्पर्श झाल्यास अंगाला खाज सुटत आहे तसेच भयंकर वेदनाही होत आहेत व नंतर उलट्या होऊ लागतात तर शरीर बधीर पडून बोलताना जीभ अडखळत आहे. या अळीचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच अळी अंगावर येऊ नये याची दक्षता घ्यावी असे करमाळा येथील डॉ.रोहन पाटील यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना हिरवट पिवळसर प्रकारची आळी दिसताच तण नाशकाची फवारणी करावी.तसेच शेतामध्ये काम करताना अंगभर कपडे घालूनच काम करावे.असे आवाहन कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांनी केले आहे.

ओळख आणि व्यवस्थापन काटेरी अळी (घोणस अळी) चे.!

डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी

काही दिवसापासून वृत्तपत्र, दुरदर्शन व विविध सामाजिक माध्यमंमार्फत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात उसावर आढळून आलेल्या एका अळीमुळे जिची ओळख शास्त्रीय भाषेमध्ये स्लग कॅटरपिलर किंवा काटेरी अळी व ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळी म्हणून आहे. जिच्या काट्यांचा दंश झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले त्यामुळे या अळी बद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भीती बसली असून त्याबद्दल बरचसे गैरसमज निर्माण झाले आहेत.

अळीची ओळख-

हिला स्लग कॅटरपिलर किंवा काटेरी अळी किंवा डंक मारणारी स्लग अळी असेही म्हणतात. हि एक पंतगवर्गिय कीड असून ती लिमाकोडिडे (स्लग कॅटरपिलर पतंग) या कुटुंबातील आहे.
ह्या अळ्यांना त्यांच्या चिकटून राहण्याच्या स्वभावामुळे आणि संथ तरंगत चालण्याच्या लक्षणामुळे स्लग अळी असे म्हणतात.

ह्या अळीचे पतंग त्यांच्या भक्षकांसाठी मऊ आणि पौष्टिक खाद्य असतात, पंतग फार वेगाने फिरत नाहीत आणि उडू शकत नाहीत, म्हणून ते पक्ष्यांचे आणि इतर भक्षकांचे सहज होणारे आणि मुख्य खाद्य आहेत. म्हणून, या जातीच्या अळ्यांनी स्वतःचा भक्षाकापांसून बचाव करण्यासाठी शरीरामध्ये भडक रंग आणि काटे विकसित केले आहेत.

अशा काट्यामध्ये थोडया प्रमाणात विष ही असते. ही एक स्व:संरक्षणाची रणनीती आहे. तसेच ह्या अळ्या त्यांच्या शरीराच्या गर्द आणि प्रखर तेजस्वी रंगाद्वारे आणि काटे किंवा केसांद्वारे त्यांच्या भक्षकांना डंख मारण्याची चेतावणी देतात.

हे या अळ्यांना त्यांच्या भक्षकांपासून वाचवते. या गटातील सर्व अळ्यांच्या शरीरावर काटे किंवा केस नसतात. या किडीच्या काट्यांच्या दशांमुळे काही प्रमाणात त्रासही होऊ शकतो परंतु या किडीचे पतंग अपायकारक नसतात.

आढळ-

ही कीड भारत, श्रीलंका, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या देशांमध्ये आढळून येते.

खाद्य वनस्पती-

बहूभक्षी प्रकारातील कीड आहे- विशेषतः एरंडी, आंबा, केळी, डाळींब, लिंबूवर्गीय फळे, इतर फळझाडे, देशी बदाम, ओक, चहा, कॉफी, शोभेच्या वनस्पती, तणे आणि इतरही वनस्पती वर आढळून येते.

पिकांसाठी किती धोकादायक-

ही अळी फारसे नुकसान करत नाही. परंतु काही वेळा अळीचा प्रादुर्भाव काही ठराविक भागापुरताच मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि प्रादुर्भाव जास्त झाल्यास अळ्या फक्त पानांच्या शिरा सोडून बाकी भाग अधाशीपणे खातात त्यामुळे झाडाला फक्त पानांच्या शिराच शिल्लक राहतात आणि मोठे नुकसान होते.

अळीच्या काट्यांचा दंश झाल्यास काय होऊ शकते-

या गटातील अळ्या त्यांच्या शरीरावर असलेल्या काट्यांमुळे आणि केसांमुळे सहज लक्षात येतात.त्याचा उद्देश त्यांच्या भक्षकांना परावृत्त करणे हा आहे. अळी लोकांच्या “मागे” जात नाहीत. परंतु तुम्ही त्यांना स्पर्श केल्यास किंवा चूकून संपर्कात येऊन शरीर घासले गेल्यास त्याठिकाणी काट्यांचा दंश होऊन अपाय होऊ शकतो आणि लक्षणे उद्भवतात. अशा काट्यांमध्ये असलेले विष शरीरात प्रवेश करते. स्पर्श झालेल्या ठिकाणी अळीचे केस अथवा काटे शरीरात तसेच राहतात. दंश हा मधमाशीच्या डंखासारखा त्रासदायक असतो.

 

विष हे सौम्य स्वरूपाचे असते परंतु वेदना होणे, पुरळ येणे, जळजळ होणे, खाज सुटणे, सूज येणे आणि फोड येणे या सारखी लक्षणे दिसू शकतात. सहसा लक्षणे ही तात्पुरत्या स्वरूपाची असतात आणि एका दिवसात निघून जातात किंवा कमी होतात, परंतु जर ती तीव्र स्वरूपाची किंवा जास्त वेळाकरीता कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत.

काही अतिसंवेदनशील लोकांना अशा अळीच्या संपर्कात आल्यास त्यांना असलेल्या ॲलर्जीमुळे जास्त त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना अस्थमा, ॲलर्जी या सारख्या समस्या असतील अशा लोकांनी सावधगिरी बाळगून अपाय होऊन जास्त त्रास झाल्यास लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घ्यावेत.

 

ताबडतोब करावयाचे उपाय अथवा उपचार –

काही तज्ञ सूचित करतात की चिकट टेप प्रभावित भागात हलक्या हाताने लावून काढावा त्याने शरीरात गेलेले अळीचे केस किंवा काटे सहज निघण्यास मदत होईल. लक्षणे सौम्य स्वरूपाची असतील तर अपाय झालेल्या ठिकाणी बर्फ लावल्यास किंवा बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट लावल्यास त्रास कमी होतो.

अळीचे नियंत्रण-

कोणतेही स्पर्शजन्य किटकनाशक फवारावे. यामध्ये क्विनालफास, इमामेक्टिन बेंझोएट, फ्लूबेंडामाईड सारखे कीटकनाशक शिफारस नसले तरी चांगले नियंत्रण करतात. तसेच बरेच नैसर्गिक मित्र कीटकांद्वारे ही या किडीचे नियंत्रण नैसर्गिकरित्याच होते.

तरी सर्वांनी कोणत्याही “केसाळ” किंवा “काटेरी” अळ्यापासून स्वरक्षणाची सावधगिरी बाळगावी. अळी मुळे दंश झाल्यास घाबरून न जाता योग्य उपाय अथवा उपचार करावेत.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
☎ ०२४५२-२२९०००

litsbros

Comment here