‘करमाळयातील सुपुत्राच्या पुस्तकाचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावी झाले प्रकाशन : कॅबिनेट मंत्री उदय सामंत राज्यमंत्री योगेश कदम यांची होती उपस्थिती!
पुणे(प्रतिनिधी) ; महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रेरणादायी पद्धतीने लिहिलेले व सध्या बहुचर्चित असणारे लेखक जगदीश अशोक ओहोळ यांचे “जग बदलणारा बापमाणूस” या बेस्ट सेलर पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत तसेच महसूल व गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम आदी मान्यवरांचा हस्ते करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी बाबासाहेबांचे मूळगाव आंबडवे, तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
आपल्या देशातील तरुणाईला डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरणादायी पद्धतीने या पुस्तकातून सांगितले आहेत, आता एका मराठी युवा लेखकाने लिहिलेले हे पुस्तक व विचार सर्व भारतभर जाईल ही गौरवास्पद बाब आहे असे मत प्रकाशनांनंतर बोलताना रत्नागिरीचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
हेही वाचा – उन्हाळ्यापूर्वीच उजनीत पाण्याचा खडखडाट
इंग्लिश असोसिएशच्या वतीने प्रा.करे पाटील यांचा सन्मान
तर पुस्तक खूपच अप्रतिम आहे, मराठी वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे, आता हिंदी वाचक ही या पुस्तकाचे जोरदार स्वागत करतील यात शंका नाही असे मत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना जगदीश ओहोळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट, मुलाच्या शिक्षणासाठी पिता रामजी सुभेदार यांनी केलेला त्याग व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य हे सबंध देशासाठीचे कार्य आहे. त्यातूनच आधुनिक भारत उभा राहिला, हाच इतिहास नव्या पिढीला, नव्या भाषेत या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितला आहे, अशी मांडणी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र सकपाळ यांनी केले. यावेळी आंबडवे गावात भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.