अखेर जगताप पितापुत्र भाजपच्या अधिकृत यादीत!विशेष निमंत्रिताच्या यादीत मा.आ.जयवंतराव जगताप तर शंभुराजे जगताप यांची..
करमाळा (प्रतिनिधी); भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष (माढा ) चेतनसिह केदार सावंत यांनी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली . त्यामधे विशेष निमंत्रित सदस्यांच्या यादीत करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांना स्थान देण्यात आले आहे .
तर माजी आ .जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांची भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे . यामुळे जगताप गटात आनंदाचे वातावरण आहे . जगताप यांनी पूर्वीपासूनच वेळोवेळी भाजप समर्थनाची भूमिका घेतलेली आहे .
सन २००० साली नगरपालिका निवडणुकीवेळी जगताप यांनी काँग्रेसमधे असताना भाजप बरोबर कमळ या चिन्हावर युती केली होती .सन २००९ साली दस्तरखुद्द शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार असताना तत्कालीन आमदार जयवंतराव जगताप यांनी राजकीय नुकसानीची पर्वा न करता स्वतःचे राजकीय भवितव्य पणाला लावत भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा प्रचार केला होता.
सन २०१९ साली लोकसभा निवडणुकीपूर्वी जगताप गटाने युवानेते शंभूराजे जगताप यांचे नेत्तृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत ( दादा ) पाटील , आमदार राजेंद्र राऊत ,रणजितसिह निंबाळकर , रणजीतसिह मोहिते पाटील , सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमात भाजपमधे प्रवेश केला होता.
लोकसभा निवडणूकी मधे त्यावेळी निंबाळकर यांच्या प्रचारात युवानेते शंभुराजे जगताप यांनी मोठा झंझावती प्रचार केला होता . २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठींबा देताना निवडून आलेनंतर भाजपला पाठींबा देण्याची अट घातली होती . त्यास अनुसरून आ . संजयमामा शिंदे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना पाठींब्याचे पत्र दिले होते .
या सर्व बाबींचा विचार करता भाजपने देखील जगताप यांचा योग्य सन्मान केल्याचे दिसून येत आहे. याचा आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला निश्चितच फायदा होईल .