कोरोनात छत्र हरपलेल्या बालकांना जगदीशब्द फाऊंडेशनचा आधार; सलग तिसऱ्या वर्षी केले शैक्षणिक साहित्याचे वाटप
करमाळा(प्रतिनिधी); व्याख्यानातील शब्दांना प्रत्यक्ष कार्याची जोड द्यायची या उद्देशाने व्याख्याते जगदीश ओहोळ यांनी स्थापन केलेल्या जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने कोरोना काळामध्ये आई वडील व पालक यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने अनाथ झालेल्या किंवा एकल पालक राहिलेल्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना करमाळा तालुक्यातील सोगाव व शेटफळ येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
अशा गरीब गरजू अनाथ बालकांचे शैक्षणिक चालकत्व जगदीश शब्द फाउंडेशनचे संस्थापक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते जगदीश मोहोळ यांनी घेतले आहे. मागील तीन वर्षांपासून अशा विद्यार्थ्यांना फाउंडेशन च्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. यावर्षीच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप रविवारी करण्यात आले.
विद्यार्थ्यांना उद्योजक अशोक शिंदे, निलेश पाखरे, वक्ते गंगासेन वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते शहाजी गोरवे, सोमनाथ ओहोळ आदीच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी सोगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मदेव सरडे, सतीश भोसले, देविदास भोसले, मोरे गुरुजी, भीमराव राऊत, मनोज घनवट, शेटफळचे सामाजिक कार्यकर्ते व शेती विषयक अभ्यासक गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे, योगेश सातपुते, नागनाथ माने आदिजन उपस्थित होते.
तीन वर्षांपासून जगदीश भाऊ आमच्या लेकरांसाठी शाळेचं साहित्य घेऊन आठवणीने येतात, आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणावर त्यांचं लक्ष आहे, या गोष्टीचा आधार वाटतो.
– रूक्मिणी माने (बालकांची आज्जी, शेटफळ)
कोरोना काळातील विदारक परिस्थिती पाहून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.
साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व सांडून वाहत होता नवीन बॅगा, वह्या हातात घेऊन बालके आनंदली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद कायम राहिला पाहिजे व ही बालके शैक्षणिक प्रवाहात कायम राहून यांचे शिक्षण पूर्ण झाले पाहिजे हाच जगदीशब्द फाउंडेशनचा या उपक्रमा मागील उद्देश आहे.– जगदीश ओहोळ
व्याख्याते व संस्थापक जगदीशब्द फाउंडेशन