कोरोनामुळे अनाथ झालेल्या करमाळा तालुक्यातील मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेणार व्याख्याते जगदिश ओहोळ; गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन
करमाळा(प्रतिनिधी) ; कोरोना काळात अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही ठिकाणी मात्र एखाद्या परिवारातील आई आणि वडील अशा दोघांचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे. अशा घटना अतिशय वेदनादायी व समाजातील सुजाण नागरिकांची जबाबदारी वाढवणाऱ्या आहेत.
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती,
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी ll
या उक्ती प्रमाणे करमाळा तालुक्यातील ज्या परिवाराच्या बाबतीत असे घडले असेल व त्यांचे पाल्य अनाथ व निराधार झाले असतील तर त्यांच्या नातेवाईक व परिचयातील लोकांनी आपल्याशी संपर्क करावा, आपण मानवतेच्या भूमिकेतून अशा पाल्यांचे दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी सर्व शैक्षणिक साहित्य व साधने मोफत देऊन त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च आपण ‘जगदिशब्द फाउंडेशन’ च्या माध्यमातून उचलणार आहोत, त्यासाठी गरजूंनी 9921878801 या क्रमांकावर संपर्क करावा असे व्याख्याते जगदिश ओहोळ यांनी सांगितले.
लेखक, कवी व व्याख्याते असणारे जगदिश अशोक ओहोळ हे करमाळा तालुक्यातील हिवरे गावचे रहिवाशी असून सध्या पुणे येथे कार्यरत आहेत. व्याख्यानांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार ते करतात.
या अशा वाईट काळात समाजातील निराधार घटकांना आधार देऊन सक्षम करणे , हीच खरी महापुरुषांच्या विचारांची शिकवण आहे आणि आपण ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहोत असे मत व्याख्याते जगदिश ओहोळ यांनी करमाळा माढा न्यूजशी बोलताना व्यक्त केले.
Comment here