डॉ. आंबेडकरांच्या करमाळ्यातील सभेला ८८ वर्षे पूर्ण; २४ जानेवारी १९३७ रोजी बाबासाहेबांचा करमाळा दौरा ; लेखक जगदीश ओहोळ यांची माहिती
प्रतिनिधी(किशोरकुमार शिंदे); करमाळा, दि. २४- संविधानाचे निर्माते, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे २४ जानेवारी १९३७ रोजी करमाळा शहरात आले होते. त्यावेळी येथे झालेल्या सभेत बाबासाहेबांनी आपली राजकीय व्यवस्था निर्माण करा, असे आवाहन नागरिकांना केले होते. अशी माहिती जग बदलणारा बाप माणूस या डॉ. आंबेडकर यांच्याविषयीच्या पुस्तकाचे लेखक, इतिहास अभ्यासक जगदीश ओहोळ यांनी दिली आहे.
शुक्रवारी असलेल्या २४ जानेवारीच्या पार्श्वभुमीवर ओहोळ यांनी संचारशी संवाद साधला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, १९३७ साली बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष खेडोपाडी रुजविण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्या काळात सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहर, बार्शी, कुर्डुवाडी, टेंभुर्णी, वळसंग तसेच करमाळा येथे सभा घेतल्याच्या नोंदी आहेत. त्यावेळी करमाळा येथील समाज बाबासाहेबांच्या कार्याने भारावून गेलेला होता. जगभर ख्याती असलेल्या बाबासाहेबांबद्दल करमाळकरांनाही आकर्षण होते. त्यामुळेच २४ जानेवारी १९३७ साली ते येथे आले असता समाजात उत्साह होता. स्वतंत्र मजूर पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बाबासाहेब करमाळ्यात आले होते. सोलापूर जिल्हातील त्यांची ही शेवटची सभा होती. सडा, सारवण, रांगोळी, पताका, स्वागत कमानी असे त्यांचे स्वागत झाले होते. ते ज्या ठिकाणावरुन चालले तेथील त्यांच्या पावलांची माती अनेकांनी कपाळी लावली होती.
हेही वाचा – दहावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाची पुनरावृत्ती आणि सरावाची नितांत गरज
श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक मध्ये गेस्ट लेक्चरचे आयोजन
त्यावेळी झालेल्या सभेत बाबासाहेबांनी करमाळावासियांच्या साक्षीने सोलापूर जिल्ह्याचा दौरा पूर्ण झाला. तुमच्या प्रेम आणि विश्वास यामुळेच प्रत्येक संकटावर मात करत आहे. पुढची लढाई केवळ सामाजिक अन्यायाविरोधात नाही तर राजकीय अस्तित्वाची लढाई लढायची आहे. ती जिंकायची आहे कारण तरच आपल्याला न्याय मिळू शकतो. अशा भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन नेते खंडेराव कांबळे यांनी पुष्पहार घालून बाबासाहेबांचे स्वागत केले होते. स्वागताध्यक्ष जनार्दन कांबळे होते. सोलापूरचे उमेदवार जिवाप्पा येदाळे व नगरचे उमेदवार पी. जे. रोहम त्यावेळी उपस्थित होते. त्याकाळी सहाय्यक शिक्षणाधिकारी म्हणून सेवा देणारे पहिलेच अधिकारी ठरलेले ज्येष्ठ कार्यकर्ते गो. गो. कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. अशी माहितीही ओहोळ यांनी दिली.