ज्ञानपंढरीचे आम्ही वारकरी
करमाळा प्रतिनिधी – जि.प.प्रा. केंद्रशाळा पोथरे ता. करमाळा येथे साक्षरता दिंडी अगदी उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आली . यावेळी शाळेतील शिक्षिका श्रीम. शिरसकर मॅम यांनी दर्शनी भागातील फलकावर विठूरायाचे अप्रतिम चित्र साकारून वातावरणनिर्मिती केली होती.
या साक्षरता दिंडीसाठी ग्रंथ, पुस्तके,तुळशी वृंदावन, गुरु रुपात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती , विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात हुबेहूब विठू रखुमाई साकारलेल्या विद्यार्थीनी आणि वारकऱ्यांच्या वेशात ज्ञानपंढरीचे सर्व वारकरी साक्षरताविषयक घोषणा फलक, टाळ, मृदंग घेऊन दिंडीत सहभागी झाले होते. ही साक्षरता दिंडी भक्तिमय वातावरणात संपूर्ण गावातून काढण्यात आली . यामधे पोथरे गावातील सर्व अंगणवाडीचे चिमुकले, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, सन्माननीय पालक यांनी आवर्जून सहभाग नोंदवला . साक्षरता विषयक घोषणांनी ज्ञानपंढरीचा सर्व परिसर दुमदुमला होता .
अगदी,
*भक्तीरसात ज्ञानाच्या*
*जो जो वारकरी न्हाला*
*त्याचे सार्थकी जीवन*
*विठुराया त्याला पावला*
याप्रमाणेच सर्व वातावरण !
प्रभातफेरी नंतर शाळेच्या क्रिडांगणात विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा संपन्न झाला . यामधे वैष्णवी शिंदे, श्रावणी शिंदे या विद्यार्थीनींनी विविध भजने, सुमधुर गवळणी, हरिपाठ सादर केला तर दिव्यांग विद्यार्थी सोहम झिंजाडे या विद्यार्थ्याने अस्खलितपणे संपूर्ण मारुती स्तोत्र म्हणून वातावरण अगदी भक्तिमय करून टाकले . त्यानंतर फुगडी, टाळांच्या गजरात विठूनामाचा दिव्य सोहळा साजरा झाला .
यात शाळेतील सर्व शिक्षकांनीही सहभागी होऊन सोहळ्याचा आनंद व्दिगुणित केला .सोहळ्यातील क्षण न् क्षण टिपण्यासाठी गावातील युवावर्गही हातात कॅमेरे घेऊन ठिकठिकाणी सज्ज होता.
ही दिंडी यशस्वी करण्यासाठी आदरणीय श्री. खारगे सर यांनी पूर्वनियोजन केले तर श्री. रोकडे सर, श्री. जाधव सर , श्रीम. हुंडेकरी मॅम, श्रीम. मिर्झा मॅम, श्रीम. गानबोटे मॅम, श्रीम. शिरसकर मॅम यांनी विशेष परिश्रम घेतले .
हेही वाचा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोगाव पश्चिम येथे योग दिन उत्साहात साजरा
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री . यशवंत भैय्या शिंदे , उपाध्यक्षा सौ . विद्याताई शिंदे व सर्व सन्माननीय सदस्य यांनी या सुनियोजित वारकरी आनंदमेळ्याचे विशेष कौतुक केले व विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली .