*** गोधडी म्हंजे सप्तरंगांचं अस्तित्व ***

*** गोधडी म्हंजे सप्तरंगांचं अस्तित्व ***

पूर्वी आपले वाडवडील म्हणायचे दसऱ्याला थंडी मारुतीच्या देवळा मागं येती अन दिवाळीचा दिवा बघून ती गावात शिरती तसं बोलायचं झालं तर खरं थंडीचं रूप डिसेंबर महिन्यात दिसायला लागलयं सगळीकडं बाजारपेठेत विक्रेते त्यामध्ये जास्त करून नेपाळी विक्रेते यांची स्टॉल्स लोकरीच्या कपड्याने भरगच्च भरलेली दिसून येतात आणि मग जो तो स्वेटर… मफलर… शाल…कान टोपी… हातमोजे…पायमोजे… अशी लोकरीची वस्त्रं परिधान करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या टायमाला अंगणात पेटवलेली शेकोटी ही सगळं खरयं पण एक पिढ्यान पिढ्या मायेची उब देणारी गोधडी हा खरा घरातील आजी आजोबांच्या मायेची ऊब असल्याचा प्रत्यय येतो खरं बगायला गेलं तर गोधडी म्हणजे नुसतं चिंध्याचं बोचकं नाही तर आता एका दृष्टीने थंडीच्या बद्दल बोलायचं झालं तर मला पहिली आठवली ती गोधडी…गोधडी घेतल्याशिवाय थंडी काही जाणार नाही मग ती विचाराची असो किंवा मनाची नाहीतर पेनाची तिच गोधडी त्यात असतं आईचं फाटकं लुगडं… बाबाचं फाटकं धोतर…आणि विशेष म्हणजे शर्टाच्या कोपरीच्या बाह्या सुद्धा तिच्या रूपाने आई-बाबांचा आशीर्वाद सतत पुढे असल्याचा भास होतो


गोधडी या शब्दातच प्रेम… वात्सल्य… माया मातृत्व… जिव्हाळा…लपलाय गोधडी म्हणजे आईने गायलेली अंगाई…मायेची फुंकर… मायेचा संवाद… वडिलांचं कष्ट… जुन्या कपड्यांचं स्नेह मिलन… सप्त रंगाचं अस्तित्व… भावंडांमधली मस्ती… गालावरचं हसू…डोळ्यातील मुसुमुसु रडू… गोधडी म्हणजे ढाल… शब्दांच भांडार…सुखाचं अंगण…समाधानचं वृंदावन…आठवणीतील साठवण… अन गोधडी म्हणजे आईनं लग्नात दिलेलं आंदण…पहिलं थंडी पडली की दात कुडकुड वाजायचे मग पांघरली जायची गोधडी आणि त्यापासून संरक्षण व्हायचं आपलं किती पण रजही…दुलई… बाजारात येऊ देत पण आज पण खरी ऊब देते ती गोधडी एकदा थंडी सुरू झाली की भाद्रपदाचं ऊन दाखवून गाठोड्यात बांधलेली गोधडी बाहेर निघायची बरं एक नाही दोन नाही तर माणसी एक याप्रमाणे गोधडी घराघरांमध्ये असायची आणि आज तसं बघायला गेलं तर नात्या नात्यामधले धागे कमकुवत होताना दिसतात अंगणातही रंगी बेरंगी चिंधी जुळवून मायेच्या धाग्याने घट्ट गोधडी विणताना कोणी दिसत नाही आई आणि इतर बायकांना फावला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न कधी त्यांना पडलाच नाही दुपारच्या वेळी घरातील सगळी कामं उरकून अंगणात मांडली जायची गोधडी शिवण्यासाठी रंगीबेरंगी वस्त्रं आणि चिंध्या अन विणल्या जायच्या एक सारख्या टाक्याने गोधड्या


त्या एकेक टाक्याकडे पाहिलं की त्यावरील टाके ही आपल्याला भूलवतात मनाला आजही किती सुंदर विणली जायची विण नात्याची सुन…मुलगी… कुणीही बाळंतीण झाली की तिला आणि तिच्या बाळाला चौघडी करून पक्कं गुंडाळून झोपवलं जायचं अगदी तवापासून मायेची ऊब मिळायची आणि या गोधड्यांचं एक आहे गोधड्या धुणं हा एक सोहळाच म्हणावा लागेल कारण घरामध्ये सगळे बायका पोरं भीमा नदीवर गोधड्या घेऊन जायचे म्हणजे चक्क बैलगाडीतून या गोधड्या घेऊन जाव्या लागायच्या इतक्या गोधड्या आणि त्याचबरोबर एकदा पित्तरपाठ संपला की घरातली चिंधी न चिंदी धुतली जायची पार डोक्याखाली घ्यायच्या उशा त्या सुद्धा उसवून त्याच्यातल्या चिंध्या धुतल्या जायच्या आणि घरी गंमत असती ती त्या चिंध्या खडकावर वाळत घातल्यावर ते दृश्य लांबून उंचावरून किंवा झाडावरून बघावं साधारण फर्लांगभर तरी अंतर असावं काय मनामनाची कल्पना असते बघा आखाडे बांधलेले असतात आपल्याला त्यात नाही नाही त्या आकृत्या…चित्र…किंवा निसर्ग चित्र… दिसतात आता बघा ही गोधड्यांनी भरलेली बैलगाडी नदीपात्रात शिरते अगदी आणि पाणी जिथं वाहत असेल तिथं किंवा त्याच्या जवळच थांबते मग गोधड्या उतरवायच्या…पावडरचे डबे खाली घ्यायचे मग पोरं पाण्यात खेळतात आणि बाया गोधड्या धुतात
मी अगदी लहान असल्यापासून अजून पर्यंत न बदललेली एक प्रथा म्हणजे गोधडी दगडावर किंवा खडकावर आपटायची झाली की सगळे त्या गोधडीच्या भोवती जमा होतात आणि हे दणादण गोधडी आपटायचे त्या मोठ्या दगडावर जवळजवळ ती पाणी उडतं ना ते असं गुदगुल्या करणारं असतं गोधड्या पिळायची पाळी आली की पोरं पळ काढतात काही दिवसापूर्वी मोहोळला आमच्या पाहुण्याकडे गेलो होतो तेव्हा नदीच्या पात्रात एक जीप भरून आणलेल्या गोधड्या धुताना एक फॅमिली दिसली म्हणजेच गोधडी आणण्याची स्टाईल तीच वर्षांनुवर्षे बदलत असली तरी तोच उत्साह अजून पण टिकून आहे हे महत्त्वाचं याबद्दल सांगायचं झालं तर हल्ली वेबसाईट किंवा इतर माध्यमातून गोधडीला मॉडर्न लूक देऊन घराघरांमध्ये गोधडी पोहोच करण्याचा उपक्रम स्तुत्य वाटतो हा एक व्यावसायिक प्रयत्न आहे मग त्याची स्तुती करावी का आपल्या मनाला वाईट वाटून घ्यावं तेच कळत नाही म्हणजे एका गोधडीची किंमत बाराशे रुपये किंवा त्याच्या पुढेच असतीयं खरंतर माझ्या दृष्टीने ही लूट आहे कारण गोधडी ही कन्सेप्टच असा आहे की टाकाऊ पासून टिकाऊ समोर आलं गोधड्यांमधील पारंपारिकता जपायला हवी टिपिकलपणे टाके घालण्याची पद्धत हाताने शिवलेल्या गोधड्यांमध्ये कुठेही दिसत नाही मुद्दाम त्रिकोणी किंवा वेगळ्या पद्धतीने टाके घालणे किंवा ठराविक पद्धतीचे टाके घालणे यामुळे गोधडीचा मुख्य उद्देश नष्ट होत असून तो एक बाजारातील प्रॉडक्ट म्हणतो असं हे चालायचचं प्रत्येक गोष्ट काळानुरूप बदलत असते तरी गोधडीने कात टाकलेली आहे हे मनाला पटत नाही


तसं बघायला गेलं तर अजूनही ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने गोधड्यांचा वापर आहे घरी शिवलेली गोधडी आणि कंपनीची गोधडी यात खूप फरक जाणवतो गावाकडं कधी कधी दोघांमध्ये एक गोधडी मिळायची आमच्यामधी जो लहान असेल त्याच्यात अन आमच्यात सुरू व्हायचं ते युद्ध गोधडी खेचाखेचीचं मग मज्जाच यायची म्हणजे बाजूच्या ला थंडीत उघडं पाडण्यामध्ये आहे म्हणजे थोडक्यात डोळे बंद केले की आपल्या अंगावरची गोधडी ऑटोमॅटिक गायब व्हायची थोडी गार अशी हवा लागल्यावर शुद्धीवर आल्यावर कळायचं गोधडी आपली पसार झाली म्हणून रोजच्या जीवनामध्ये रात्री कितीही उकडत असलं तरी वरती पंखा कितीही रोरावत असला तरी काहींना अंगावर पांघरून घेऊन झोपायची सवय असते काही पूर्ण डोक्यापर्यंत तर काही फक्त ताटात नावाला मीठ घेतल्यासारखं नावाला पायावर पांघरून घेऊन झोपतात एवढेच काय आजारी माणसाला आजूबाजूच्या माणसांपेक्षा पांघरूण जवळचं वाटतं लहान मुलांना डोक्याखाली उशी नसली तरी अंगावर पांघरूण हवं असा पालकांचा अट्टाहास असतो हिवाळ्यामध्ये पांघुरनांना वेगळाच साज चढत असतो मुंबई सारख्या ठिकाणी 22 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमानाला देखील झोपताना पांघरूण रुपी चिलखत घालून झोपावं लागतं दुसरं एका दृष्टिकोनातून पाहिलं तर शास्त्रीय संगीताला जशी घराणी असतात तशी घराणी पांघुरणाला सुद्धा आहेत काश्मीरमध्ये मिळणारी मखमली शाल… राजस्थान मध्ये आढळणाऱ्या 20 ग्रॅमच्या शाली… अंगठीतूनही त्या आरपार सरकतात…महाराष्ट्राची शान असलेली सोलापुरी चादर…हिमाचल उत्तराखंड परिसरामध्ये विकली जाणारी रजई…आणि योगायोगाने ग्रामीण भागातील मायेची उब देणारी गोधडी …खरं बघायला गेलं तर गोधडी या विषयावर अजून बरचं काही लिहिता येईल मोठमोठ्या कादंबऱ्या… चरित्रं…यासारखी साहित्य सुद्धा होतील एवढा मायेचा उब देणारा इतिहास या गोधडीच्या पाठीशी आहे
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
किरण बेंद्रे
कमल कॉलनी फेज ll… मांजरी – पुणे
7218439002

karmalamadhanews24: