न्यू इंग्लिश स्कूल ने राबविलेला नवोपक्रम कौतुकास्पद- सरपंच मयूर रोकडे
करमाळा (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वांगी नंबर 3 ने राबविलेला “आनंद बाजार” हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान चांगल्या प्रकारे मिळणार आहे .या ज्ञानाचा वापर विद्यार्थी आपल्या जीवनात करून आपले जीवन आनंदी आणि भरभराटीचे करू शकणार आहेत. हीआनंदाची बाब आहे “असे गौरव उद्गार सरपंच मयूर रोकडे यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस महादेव आबा रोकडे (स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष )यांच्या व मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पांजली अर्पण करून आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, पालक ,ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रशालेचे मुख्याध्यापक संजय पानसरे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रशालेमध्ये अनेक उपक्रम राबविले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना आनंदा बरोबरच व्यवहार ज्ञानही प्राप्त होते असे सांगितले.
या आनंद बाजारामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी अनेक प्रकारची फळे ,फुले, पालेभाज्या आणल्या होत्या. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचेही अनेक स्टॉल लावले होते. या बाजारामध्ये अनेक पालकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून अनेक प्रकारच्या गोष्टींची मनमुरादपणे खरेदी केली व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच खाद्यपदार्थांचाही अगदी मनापासून आस्वाद घेतला. यामुळे हजारो रुपयांची उलाढाल याच्यातून झाल्यामुळे विक्री करणारे विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, स्कूल कमिटी सदस्य व सर्व शिक्षक सेवकांनी आनंद व्यक्त केला. तसेच या कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुकही केले.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील सहशिक्षक महादेव पवार यांनी केले . तसेच या कार्यक्रमासाठी प्रशालेतील अतुल खूपसे, गणेश अवघडे ,प्रशांत देवकर, विश्वनाथ सुरवसे विक्रम होनपारखे, सौ प्रमिला होनपारखे, मंगेश देशमुख अमरदीप वारे या सर्व शिक्षक सेवकांचे तसेच विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.