देवाच्या पायावर हळदी कुंकू लावण्याचा विधवांना मान, मग समाजाने का नाकाराव? करमाळा येथे आगळावेगळा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न!
केतूर (अभय माने ) करमाळा शहरात नेहमी सामाजिक उपक्रम राबवित अग्रेसर असलेल्या शिवकन्या अकॅडमीच्या वतीने आज संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला.
नेहमी प्रमाणे या कार्यक्रमातही शिवकन्या अकॅडमीच्या संस्थापिका प्रियांका गायकवाड यांनी जुन्या चाली रितीना फाटा देउन विधवा महिलांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात हळदी कुंकू लावुन सहभागी करून घेतले.
यावेळी गायकवाड यांनी सांगितले की, रिती रिवाज हे माणसांनी त्या त्या परिस्थितीनुसार बनविले होते. परंतु बदलत्या काळानुसार अनिष्ट रूढी परंपरा ही बदलायला हव्यात. समाजातील प्रत्येक महिलेला सन्मानाची वागणूक देणे काळाची गरज आहे.
आज त्या विधवा आहेत तर त्यात त्यांची काय चूक ? समाजाच्या जडणघडणीत प्रत्येक महिला मग ती विधवा का असेना तिची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. शेवटी त्या म्हणाल्या की, विधवा हया देवाच्या पायावरच हळदी कुंकू लावू शकतात तर मग आपण त्यांना हळदी कुंकू का लावू शकत नाही? देवापेक्षा कोणीही मोठे नाही.
त्यामूळे आपण त्यांना हळदी कुंकू लावणे यात गैर काय असा खणखणीत सवाल यावेळी गायकवाड यांनी उपस्थित केला.यावेळी सर्व उपस्थित महिलांना वाण देण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या सर्व महिलांनी अथक परिश्रम घेतले.
Comment here