दौंड-कलबुर्गी रेल्वे गाडी कायम करण्याची मागणी
केत्तूर (अभय माने) पारेवाडी (ता.करमाळा) या रेल्वे स्टेशवर थांबा देण्यात आलेली दौंड-कलबुर्गी डेमो रेल्वे दिवाळी सणानिमित्त चालू करण्यात आली आहे, ही रेल्वे कायमस्वरूपी करण्याची मागणी परिसरातील प्रवासी नागरिकांतून होत आहे.
सदरच्या स्टेशन परिसरात हिंगणी, केत्तूर-1/2, गोवळवाडी, खातगाव, कुंभारगाव, दिवेगव्हाण, पोमलवाडी, गुलमरवाडी, भगतवाडी, गोयेगाव, अशी सुमारे नऊ ते दहा गावे आहेत, या गावांमधून कित्येक नागरिक व विद्यार्थी पुणे, सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद, मुंबई, या शहरांमध्ये ये-जा करतात, यामध्ये विद्यार्थी, लहान-मोठे उद्योजक, कोर्टकचेरी, शेतीशी निगडित व्यवसाय, दवाखाना अशा अनेक कारणांसाठी नागरिकांचा प्रवास होत असतो.
सदरची गावे उजनी धरण क्षेत्रातील असल्याने रस्ते वाहतूक कमीच असते पुणे, सोलापूर किंवा मुंबई या शहरात लवकर पोहोचण्यासाठी रेल्वे प्रवास सर्वांच्या सोयीचा ठरतो, त्यामुळे सध्या तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेली दौंड- कलबुर्गी रेल्वे कायम स्वरूपी करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.