धक्कादायक! पैशासाठी नातवानं आजीला पेटवलं
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली असून शेतातील काम करून घेतल्यानंतर पैसे दिले नाहीत म्हणून संतप्त झालेल्या नातवाने आजीला पेटवून दिल्याचे समोर आलेले आहे. माढा तालुक्यातील लऊळ गावात ही घटना घडलेली असून कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हर्षद शिंदे असे आरोपी नातवाचे नाव असून आजोबा शेतावरून परतल्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे. आरोपी नातू हा पुण्यात वडिलांसोबत राजगुरुनगर येथे राहत होता. माढा तालुक्यातील आपल्या गावी तो आजी आजोबाकडे नेहमीप्रमाणे राहायला आला त्यावेळी आजी त्याच्याकडून शेताचे काही काम करून घेत असायची त्यातून उसाचे काही पैसे आजोबाच्या खात्यात आलेले होते.
हर्षद याने काही पैसे मला काढून द्या असे अनेकदा त्यांना सांगितले मात्र त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला, म्हणून आजोबा आणि नातू यांच्यात भांडणही झालेले होते. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी आजीने मध्यस्थी केली. त्याचा राग हर्षद याला आलेला होता. Aajit आपल्यापेक्षा जास्त आपल्या आत्याच्या मुलाला जीव लावते याचा देखील त्याच्या मनात राग होता.
आरोपी हर्षद याने चुलीजवळ जेवण बनवत असलेल्या आजीला बाहेर खेचले आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले . दुसऱ्या गावात शेतात मजुरीसाठी गेलेले आजोबा परतले त्यावेळी त्यांना त्यांची पत्नी मयत अवस्थेत आढळून आलेली होती. कुर्डूवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आजीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासांती हा प्रकार नातवानेच केल्याची माहिती समोर आलेली असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.