एकतर्फी प्रेमातून 21 वर्षीय तरुणीची हत्या, कुटुंबीय नसताना घरात घुसून चाकूहल्ला
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात राहणाऱ्या युवतीची हत्या करण्यात आली. खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या रामपूर नगर भागात सुवर्णा अर्जुन चव्हाण ही 21 वर्षीय युवती सहकुटुंब राहत होती. गावात राहणारा 25 वर्षीय आरोपी आकाश श्रीराम आडे याचे सुवर्णावर एकतर्फी प्रेम होते. सुवर्णाचे वडील, आई, भाऊ बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून आरोपी आकाश तिच्या घरात शिरला.
सुवर्णाच्या पोटात आकाशने चाकू आणि गुप्तीने वार केले. गंभीर जखमी झाल्यामुळे सुवर्णाच्या घरात रक्ताचा सडा पडला होता. हल्ल्यात सुवर्णाला प्राण गमवावे लागले. तिच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावात राहणाऱ्यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला माहिती दिली.
खंडाळा पोलिसांनी तात्काळ रामपूर गाव गाठत हत्या प्रकरणी पंचनामा केला. सुवर्णाचा मृतदेह पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
आरोपी आकाश आडे घटनास्थळावरुन पसार झाला होता. पोलिसांनी 5 पथके पाठवून त्याचा कसून शोध घेतला. अखेर त्याला धनसळ जंगलातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
बाहेरगावी गेलेल्या सुवर्णाच्या वडील, आई आणि भावाला याबाबत माहिती देण्यात आली. शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपी आकाश आडे याच्याविरोधात खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Comment here