धक्कादायक! तीन महिलांचा निर्घृण खून, चार वर्षांच्या रूद्रचे वाचले प्राण

धक्कादायक! तीन महिलांचा निर्घृण खून, चार वर्षांच्या रूद्रचे वाचले प्राण 

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात तीन महिलांचा निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली असतानाच या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हॉटेल व्यावसायिक महादेव माळी यांच्या दोन बहिणी आणि सुनेला समाधान लोहार याने डोक्यात दगड घालून ठार मारले होते. मात्र, हे तिहेरी हत्याकांड घडले तेव्हा या घरात महादेव माळी यांचा नातू रुद्र हादेखील त्याठिकाणी होता. चार वर्षांचा रुद्र समाधानच्या हाताला लागला असता तर त्याचाही मृत्यू अटळ होता. परंतु, महादेव माळी यांच्या चिमुरड्या नातवाने प्रसंगावधान राखत घराच्या दरवाजाला आतून कडी लावून घेतली. त्यामुळे या चिमुरड्याचा जीव वाचला. अगदी शेवटपर्यंत या लहान मुलाने दार उघडले नाही.

काहीवेळानंतर या मुलाचे वडील म्हणजे महादेव माळी यांचा मुलगा बाळू याठिकाणी आला. तेव्हा त्याला आपल्या दोन्ही आत्या आणि पत्नीचा मृतदेह दिसला. तेव्हा बाळूने आपल्या लहान मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. आपला मुलगा घरात असल्याचे त्याच्या लक्षात आले. बराचवेळ दरवाजा ठोठावल्यानंतर आणि वडिलांनी आवाज दिल्यानंतर या रुद्रने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच रुद्रने हंबरडा फोडला आणि आईला मारून टाकल्याची हकीगत वडिलांना सांगितली. हा सर्व घटनाक्रम अंगावर अक्षरश: काटा आणणार आहे. या तिहेरी हत्याकांडामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या समाधान लोहार याचा शोध घेत आहेत. त्याच्या अटकेनंतर या संपूर्ण प्रकरणाचा नेमका उलगडा होऊ शकेल.

महादेव माळी हे गेल्या अनेक वर्षांपासून नंदेश्वर येथे वास्तव्याला आहेत. गावात त्यांचे हॉटेल आहे. मंगळवारी सकाळी महादेव माळी हे आपल्या लहान मुलासोबत हॉटेलवर गेले होते. महादेव माळी यांचा मोठा मुलगा बाळू याचे गावात कपड्यांचे दुकान आहे. तो सकाळी आपल्या आईला सांगोल्यातील दवाखान्यात घेऊन गेला होता. यावेळी बाळूची पत्नी दिपाली माळी(वय २१) आणि आत्या पारूबाई माळी (वय ६०), संगीता माळी(वय ५५) या तिघीजणी घरी होत्या. साधारण दुपारच्या सुमारास दिपाली माळी घराबाहेर कपडे धूत होती. त्यावेळी शेजारच्या वस्तीवर राहणारा समाधान लोहार त्याठिकाणी आला. त्याने दिपालीवर दगडाने हल्ला चढवला आणि तिला ठार केले. दिपालीने जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केली. हा आवाज ऐकून दिपालीच्या आतेसासू पारुबाई माळी अंगणात धावत आल्या. त्यांच्यावरही समाधान लोहारने दगडाने हल्ला केला. यावेळी शेजारी असलेला फावडा उचलून त्याने पारुबाई माळी यांना मारले. हा सगळा प्रकार बघून संगीता माळी या पळत सुटल्या. मात्र, समाधान लोहारने त्यांना घराच्या पाठच्या बाजूला गाठून त्यांची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केली. हा सर्व प्रकार घडत असताना बाळू आणि दिपाली यांचा चार वर्षांचा मुलगा रुद्र हादेखील घरातच होता. समाधानच्या डोक्यावर सैतान स्वार झाल्याने त्याने रुद्रलाही सोडले नसते. परंतु, चार वर्षांच्या रुद्रने प्रसंगावधान दाखवत घराचा दरवाजा आतून लावून घेतला. त्याने शेवटपर्यंत दरवाजा उघडलाच नाही, त्यामुळे रुद्रचा जीव वाचला.

काहीवेळानंतर रुद्रचे वडील घरी आले. त्यावेळी घराच्या अंगणात पत्नीचा आणि आत्याचा मृतदेह त्यांना दिसला. त्यानंतर बाळू माळी आपली दुसरी आत्या आणि मुलाला बघायला धावले. तेव्हा घराच्या पाठीमागे दुसरी आत्या संगीता माळी यांचा मृतदेह पडला होता. त्यानंतर बाळूने आपल्या मुलाला हाका मारल्या. भेदरलेला रुद्र बराचवेळ दरवाजा उघडायला तयार नव्हता. अखेर वडिलांचा आवाज ऐकल्यानंतर रुद्रने दरवाजा उघडला आणि घडलेली सर्व हकिगत सांगितली.

karmalamadhanews24: