धक्कादायक! जमिनीच्या वादातून दिराने विधवा वहिनीला तिच्या मुलांसह दिले पेटवून
जमिनीच्या वादातून विधवा वहिनी, पुतण्या आणि पुतणीला घरासह पेटवून दिल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील कोनड बुद्रुक गावात रविवारी मध्य रात्री तीनच्या सुमारास घडली आहे. जखमी महिला व तिच्या दोन मुलांवर बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जाफराबाद तालुक्यातील कोनड गावातील मंगलाबाई परिहार या महिलेच्या पतीचा मृत्यू पाच महिन्यापूर्वी झाल्याने ही महिला आपला मुलगा व एक लहान मुलगी यांच्यासोबत शेतात राहत होती. गेल्या अनेक दिवसांपासून तिचा दीर जमिनीच्या वाटणी वरून सतत वाद घालत होता. चार दिवसापूर्वी मंगलबाई पेरणी करत असताना दिर समाधान रामसिंग परिहार यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
रविवारी रात्री तीनच्या सुमारास मंगलाबाई आपल्या मुलासह घरात झोपली असताना घरात धूर निघत असल्याचे मुलीला लक्षात आले. त्यानंतर तिने भाऊ आणि आईला उठवले तेव्हा घराला आग लागली असल्याचे लक्षात आले. मंगलाबाई यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयन्त केला मात्र दरवाजाची कडी बाहेरून लावली असल्याने त्यांनी खुर्ची घेऊन बाहेर हात घालून कडी उघडून बाहेर पळ काढला.
तेव्हा बाहेर फवारणी पंप पाठीवर घेऊन उभ्या असलेल्या दिराने फवारणी पंप मुलासह वाहिनीच्या अंगावर मारून हातात असलेला टेम्भा अंगावर फेकून आग लावली यात मंगलबाई, मुलगा आणि मुलगी गंभीर भाजल्याने त्यांना ग्रामस्थांनी चिखली येथील खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
पूनम परिहार या मुलीच्या तक्रारी वरून पोलीस ठाण्यात आरोपी समाधान रामसिंग परिहार यांच्या विरुद्ध ३०७,५३६, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.
Comment here