कुऱ्हाडीने काकाचं मुंडकं तोडलं अन् बाईकवर घेऊन पुतण्या गावात फिरला, जमिनीच्या वादातून घडलेल्या घटनेने माढ्यात खळबळ!

कुऱ्हाडीने काकाचं मुंडकं तोडलं अन् बाईकवर घेऊन पुतण्या गावात फिरला, जमिनीच्या वादातून घडलेल्या घटनेने माढ्यात खळबळ!

 माढा (प्रतिनिधी): जमिनीच्या तुकड्यासाठी नात्याचा खून करण्याची घटना समोर आली आहे. जमिनीसाठी वृद्ध चुलत्याचा सावत्र पुतण्याने खून केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात घडली आहे. धक्कादायक म्हणजे, खून केल्यानंतर पुतण्या काकाचं मुंडके गाडीवर घेऊन फिरत होता.

माढा तालुक्यातील शेवरे इथं ही घटना घडली आहे. शेवरे येथील शंकर प्रल्हाद जाधव (वय 65) असं हत्या केलेल्या वृद्धाचं नाव आहे. सावत्र पुतण्या शिवाजी जाधव यानेच शंकर जाधव यांची निर्घृणपणे खून केला. पोलिसांनी पुतण्याला अटक केली आहे.

जमिनीसाठी गेल्या काही दिवसांपासून काका शंकर जाधव आणि पुतण्या शिवाजी जाधव यांच्यामध्ये वाद सुरू होता. या वादाला सोमवारी भयानक वळण मिळालं. सोमवारी दोघांमध्ये जमिनीच्या मुद्यावरून वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात आरोपी शिवाजी जाधव याने काकावर कुऱ्हाडीने हल्ला केला. कुऱ्हाडीने सपासप वार करून मुंडके धडावेगळे केले. काकाची हत्या केल्यानंतर तो तिथेच थांबला नाही. काकाचं मुंडके आपल्या दुचाकीवर ठेवून तो गावात फिरत होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत काका शंकर जाधव यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यानंतर आरोपी शिवाजी जाधव याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालं. एकीकडे पोलीस त्याचा शोध घेत होते.

तर आरोपी शिवाजी जाधवने अकलूज रोडवर माळीनगर इथं आल्यानंतर मुंडके आणि दुचाकी रस्त्यावर सोडून दिली. त्यानंतर तो अकलूज पोलीस ठाण्यात पोहोचला आणि स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. अकलूज पोलिसांनी गाडी आणि मुंडके ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line