धक्कादायक! डॉक्टर महिलेला पती अन् सासऱ्याने दगडाने ठेचून संपवलं

धक्कादायक! डॉक्टर महिलेला पती अन् सासऱ्याने दगडाने ठेचून संपवलं

डॉक्टर महिलेची पती आणि सासऱ्याने मिळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी हत्या करुन अपघात झाल्याचा बनाव बाप-लेकाने रचला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकच्या नांदगाव येथील डॉ. भाग्यश्री किशोर शेवाळे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा आधी समोर आलं होतं. मात्र त्यांचा मृत्यू अपघाती नसून पतीसह सासऱ्यानेच दगडाने ठेचून त्यांची हत्या केल्याची फिर्याद नांदगाव पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी भाग्यश्री यांचा पती डॉ. किशोर नंदू शेवाळे व त्याचे वडील नंदू राघो शेवाळे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे अपघाताचा बनाव उघडकीस आला असून, तब्बल १५ दिवसांनी खुनास वाचा फुटली आहे.

पत्नीचा अपघात झाल्याची माहिती

डॉ. भाग्यश्री यांचा २७ सप्टेंबरला मन्याड फाटा या ठिकाणी दुचाकीचा अपघात झाला असून त्या अपघातात त्या मृत्युमुखी पडल्याची माहिती पती डॉ. किशोर शेवाळे याने चाळीसगाव पोलिसांना दिली होती. त्यानुसार चाळीसगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत हा गुन्हा नांदगाव पोलिसांकडे वर्ग केला होता.

पती किशोर शेवाळे याला दवाखाना बांधायचा होता. त्यासाठी डॉ.भाग्यश्रीने माहेराहून २५ लाख रुपये आणावे, असा तगादा पतीने लावला होता. मात्र भाग्यश्री यांनी ही मागणी पूर्ण केली नाही म्हणून बाप-लेकाने संगनमताने त्यांची हत्या केली, असा आरोप डॉ. भाग्यश्री यांच्या भावाने केला आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line