“अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकी दिली”; वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक
मुंबई | काही दिवसांपूर्वी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी टाइम्स या मासिकाला मुलाखत दिली होती. ते सध्या परदेशात असून त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे की लसींच्या मागणीसाठी भारतातील मोठे नेते आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून गंभीर स्वरूपाचे फोन येत आहेत.
या सर्व प्रकरणात इंडिया टुडे या वृत्तवाहिनीचे सूत्रसंचालक राहुल कनवाल यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राहुल कनवाल यांनी
वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या दरम्यान अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकावल्याचं म्हटलं होतं. यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी आक्षेप नोंदवत इंडिया टुडे समूहाला पत्र पाठवलं आहे.
राहुल कनवाल यांचं वक्तव्य धादांत खोटं आणि बदनामीकारक आहे. तसेच शिवसेनेची प्रतिमा मलिन करण्याच्या कटाचा हा भाग वाटतो. त्यामुळे राहुल कनवाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी इंडिया टुडे समूहाला पत्र लिहून केली आहे. तसेच आमचा इंडिया टुडे समूहाच्या पत्रकारितेवर विश्वास आहे, म्हणून राहुल कनवाल यांनी जाहीर माफी मागावी, अशी देखील मागणी त्यांनी पत्राद्वारे केली.
अदर पुनावाला यांनी कोणाचेही नाव न घेता दबाव येत असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं त्यातच राहुल कनवालांनी वृत्तवाहिनीवरील चर्चेत केलेल्या या वक्तव्यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.
Comment here