बुलेट ट्रेनला विरोध नाही, बागायती भाग वाचवा- दत्तात्रय भरणे
रेडा -इंदापूर तालुक्यातून बुलेट ट्रेन जाणार आहे. याचा मनोमन आनंद आहे. या प्रकल्पास माझा कोणताही विरोध नाही, मात्र बागायती क्षेत्रातून हा सर्वे न करता जिरायती भागातून मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राबवला पाहिजे, अशी अपेक्षा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
हैदराबाद-मुंबई बुलेट ट्रेन संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे ते बोलत होते.
बुलेट ट्रेन प्रकल्प वेगाने सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत. इंदापूर तालुक्यातील शेतकरी हा प्रचंड कष्टातून शेती पिकवतो आहे. त्याने आपले बागायती क्षेत्र केलेले आहे. त्यामुळे हा बागायती शेतीचा पट्टा बुलेट ट्रेनमुळे चिरडला जाऊ नये.
यासाठी केंद्र सरकारकडे मी स्वतः साकडे घालणार आहे. कोणत्याही बागायती शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही,या ची काळजी घेणार आहे. बागायती क्षेत्र वगळून जिरायत पट्ट्यातून हि ट्रेन पर्यायी मार्गाने जाण्यासाठी संबंधित विभागाने सर्वे करणे गरजेचे आहे.
सध्या इंदापूर तालुक्यातील सणसर, भवानीनगर परिसरातून बुलेट ट्रेनच्या सर्वेचे काम सुरू आहे. यामध्ये तालुक्यातील बागायती जमीन हस्तांतर होणार आहे. शेकडो नागरिकांची राहती घरे मोडली जाणार आहेत. तसेच तालुक्यातील निरा डावा कालव्याला याचा धोका होणार आहे.
साहजिकच तालुक्यातील शेती अडचणीत येणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांकडून या प्रकल्पास विरोध होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून हा प्रकल्प अन्य पर्यायी मार्गाने पूर्ण करण्याबाबत पाठपुरावा करणार आहे.
अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. माजी कृषी मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत तात्काळ मी चर्चा करणार असून, हा प्रकल्प आणल्या पर्यायी मार्गाने पूर्ण करण्यासाठी साकडे घालणार आहे.
Comment here