महिला पोलिसाचा डेंग्यूने मृत्यू, दहा दिवसांपूर्वी जन्मलेलं बाळ पोरकं
पुणे जिल्ह्यातील बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. शीतल जगताप गलांडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर पुणे शहरातील केईएम रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेलं त्यांचं बाळ पोरकं झालं आहे.
शीतल गलांडे काही दिवसांपूर्वीच त्या प्रसुती रजेवर गेल्या होत्या. प्रसुती झाल्यानंतर त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती. उपचारांसाठी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचार सुरु असताना आज (20 सप्टेंबर) पहाटे त्यांचं निधन झालं.
शीतल या शहर पोलीस ठाण्याची संपूर्ण संगणकीय प्रणालीचं कामकाज पाहत होत्या. गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पाहत होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी आणि दहा दिवसांपूर्वी जन्मलेलं बाळ असा परिवार आहे.
पुण्यात सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ
सध्या सुरु असलेल्या पावसामुळे सप्टेंबर महिन्यातच पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ झाली आहे. या महिन्यातच शहराच्या हद्दीत डेंग्यूच्या 41 रुग्णांची नोंद झाली असून डेंग्यूचे 509 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूमुळे पुणे महापालिका हद्दीत एकही मृत्यू झाला नसल्याचं स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
Comment here