महाराष्ट्रमाणुसकी

कौतुकास्पद; ‘या’ तालुक्यातील शिक्षकांनी वर्गणी करून उभारले ६० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कौतुकास्पद; ‘या’ तालुक्यातील शिक्षकांनी वर्गणी करून उभारले
६० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर!

अकोले(प्रतिनिधी) ;

अकोले तालुका शिक्षक समन्वय समितीच्या सहकार्याने उभारलेले ६० बेडचे ऑक्सिजन कोव्हिड सेंटर महाराष्ट्र दिनी रुग्णांच्या सेवेत रुजू होत आहे… त्यानिमित्ताने…

दुर्गम भाग आणि आदिवासी तालुका अशी अकोल्याची राज्यात ओळख आहे. महामारी आली. अनेक कुटुंबांना विषाणूने विळखा घातला. अनेक लोक बाधित झाले. पेशंट आणि नातेवाईकांचे प्रचंड हाल झाले. ‘परदुख शीतळ असतं‘ असं आई म्हणायची. थोडक्यात काय तर ‘ज्यांचे जळते त्यांना कळते!‘ तर असो. आमच्या अकोल्यात ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत. आहेत ते बेड पेशंट संख्येच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहेत. म्हणजे पेशंट ८०० असतील तर एकूण बेड अवघे ७०!

संगमनेर आणि नाशिकला बेड मिळत नव्हते. आजही हा त्रास सुरू आहे. हे हृदयद्रावक चित्र बघून अस्वस्थ झालेल्या अकोल्यात संवेदनशील मनाच्या प्राथमिक शिक्षकांनी निधी जमवायला पुढाकार घेतला. दोन तीन दिवसांत दोन अडीच लाख रुपये निधी उभा राहिला. या कामाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल हे तेव्हा कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं. आधी माध्यमिक- उच्च माध्यमिक शिक्षक आणि नंतर महाविद्यालयातले प्राध्यापक सोबत आले आहेत, आणखी येत आहेत. प्राथमिक शिक्षक ते प्रोफेसर हे सारे एकाच ‘शिक्षण शरीराचे अवयव‘ आहेत. मदतीचा ओघ चारी दिशांनी अविरतपणाने सुरू आहे. आणखी दानशूर व्यक्ती पुढं येत आहेत. कोव्हिड सेंटर उभारायचे कामदेखील जोरात सुरू आहे. काम अंतिम टप्प्यात आहे.

एकीकडे मदतनिधी उभा केला जातो आहे. त्यात सातत्याने वाढ होत आहे. ६० ऑक्सिजन बेडसाठी अवघ्या तीन दिवसांत सगळं पाईपिंग पूर्ण झालं आहे. त्यासाठी साहित्य उपलब्ध होणं कठीण असताना मोजक्या शिक्षकांनी जीव धोक्यात घालून ते मिळवलं. रस्त्यावर उभ्या उभ्या चार पाच लाख पेमेंट केले. उद्योजक मित्र नितीन गोडसे यांनी मनावर घेतलं पुढाकार घेतलं. काही शिक्षकांनी ‘हाय रिस्क एरियात‘ पाय ठेवले. त्यामुळेच बऱ्याच गोष्टी सुकर झाल्या. सलाईन स्टँडपासून मास्क, सॅनीटायझर सगळं सर्जिकल साहित्य शिक्षकांनी स्वतः नाशिकला जाऊन आणलं. नाशिक हॉटस्पॉट असताना जीव धोक्यात घालून काही कार्यकर्ते शिक्षक तिकडे गेले होते.

सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शिक्षक तिकडे सेंटरला थांबून असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ‘एक नाम केशव‘ असा मंत्र जणू सेंटर उभारण्यासाठी सरसावलेले कार्यकर्ते शिक्षक जपत आहेत. तोदेखील सध्याच्या गंभीर परिस्थितीत. आज सामानाची गाडी येऊन उभी राहिली. सामान उतरावयाला हमाल काही मिळेना तेव्हा गाडीमधून खाटा आणि गाद्या शिक्षकांनी उतरवल्या. तेथे उपस्थित पत्रकार मित्र देखील मदतीला धावून आले.

आलेल्या निधीचा हिशोब ठेवणे अत्यंत किचकट बाब. काही जण त्यात डोकं घालून बसले आहेत. खरेदी आणि खर्च करणे आदी बाबी अत्यंत पारदर्शक पद्धतीने केल्या जाताय. सुमारे साडे सतरा लाख रुपये देऊन शिक्षकांनी आणि समाजाने टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ द्यायचा नाही. कोणत्याही कामात कुठं कमी पडायचं नाही, हा दृढनिश्चय सगळ्यांनी केला आहे.

सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजन मिळणे कठीण आहे. तो मिळवण्यासाठी शिक्षकांनी जबरदस्त फिल्डींग लावली. मंत्री, आमदार, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांची आवश्यक तेथे मदत घेतली. सुगाव खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा सगळा सेटअप रेडी झाला की आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पुढील काम बघतील.
प्राथमिक शिक्षकांनी नऊ लाख ७० हजार रुपये निधी आज अखेर जमवला. माध्यमिक शिक्षक संघटनेने यात सहभागी होत साडेसात लाख रुपये निधी जमवला. महाविद्यालयातील शिक्षक यात सहभागी होत आहेत, होणार आहेत.

सध्याचे आमदार किरण लहामटे आपल्या आमदार निधीतून आवश्यक ती औषधं देतील. म्हाळादेवी येथील केरू हासे नामक सामान्य शेतकरी व्यक्तीने एक लाख रुपये दिले.
अगस्ती आणि बुवासाहेब नवले दोन आघाडीच्या पतसंस्थांनी एकेक मिळून दोन लाख दिले. जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एक लाख रुपये औषधं खरेदी करायला दिले आहेत. माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दोन लाख रुपये ऑक्सिजन टाकी खरेदी करायला दिले. उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगळूरे यांनी परवा भेट दिली. तहसीलदार मुकेश कांबळे, आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. घोगरे, डॉ. श्यामकांत शेटे यांनी साथसोबत मोलाची आहे. शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून होत असलेलं काम अभूतपूर्व आहे असे गौरवोद्गार अनेक मान्यवरांनी काढले. त्यातून कार्यकर्त्यांचे नितीधैर्य वाढले. आणखी काम करायला बळ मिळते आहे. ‘तुम्ही इतकं सगळं केलं आहे. आता ऑक्सिजन मिळवण्यासाठी शिक्षक बांधवांना यातायात करायला लागणार नाही‘ असा शब्द लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मंडळीनी दिला. सामाजिक कार्यकर्ते मदत लागल्यास तातडीने उभे राहत आहेत. गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, बाळासाहेब दोरगे, राजेश पावसे आणि सर्वच विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचे सक्रिय योगदान मिळत आहे.

काम मोठं आहे, आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. आणखी हात मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. आता तर राज्यभरातून या दानयज्ञात समिधा अर्पण केल्या जात आहेत. महाराष्ट्र दिनी रुग्णांच्या सेवेसाठी हे सेंटर सज्ज होईल असा विश्वास आहे. अर्थात या सगळ्याला खूप ज्ञात अज्ञात लोकांचे हात लागले आहेत. तिसरी लाट येते आहे! धोका समोर उभा आहे.

आपसांतले सगळे हेवेदावे, गटतट विसरून सगळ्या शिक्षक संघटना एका छत्राखाली एक झाल्या आहेत, कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, ही अभूतपूर्व गोष्ट आहे. शिक्षक एकत्र आले, सगळ्यांनी समन्वय ठेवून काम केलं तर केवढं मोठं काम उभं राहू शकतं! याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे हे अकोले तालुक्यातील कोव्हिड सेंटरचं काम.

अवघं जग जेव्हा त्रासात होतं ताणात होतं. विषाणूच्या दहशतीनेग्रस्त होतं. तेव्हा अकोल्यातले शिक्षक ‘खरेखुरे कोरोना योद्धे‘ बनून गोरगरिबांचे प्राण वाचवण्यासाठी फ्रंट फुटवर येऊन कोरोनाशी दोन हात करत लढत होते.
जेव्हा भलेभले समाज घटकदेखील गळपटले होते, तेव्हा रस्त्यावर येऊन शिक्षक मंडळी पुढं येऊन स्थितीची कमान सांभाळायला मदत करत होती, हे योगदान समाज कधीही विसरू शकणार नाही. ही ‘पुण्याची कमाई‘ केल्यामुळे समाजात शिक्षकांची काहीशी डागाळलेली प्रतिमा यातून उजळून निघायला मदत होईल, हे निःसंशय खरे आहे. शिक्षक म्हणजे समाजाचं आपत्य असतात. समाजानं आजवर शिक्षकांना जे काही दिलं आहे ते सध्याच्या अडचणीच्या काळात पुन्हा समाजाला देण्याची हीच ती वेळ आहे, या भावनेतून शिक्षक बांधव हे काम करत आहेत. म्हणूनच यात कुठंही दातृत्वाचा आव किंवा भाव नाही, तो प्रमाद कोणीही करणार नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ध्येयाचा ध्यास घेतला, त्यांना त्यांना इतिहासानं सुवर्णाक्षरांनी गौरवलेलं आहे! सेंटर उभारायच्या ध्येयाचा ध्यास घेतलेल्या अकोल्यातील शिक्षकांना कामाचा त्रास वाटेनासा झाला आहे.

हेही वाचा-करमाळा तालुक्यातील युवा नेतृत्वाचा मुंबईत होणार गौरव; अभिषेक आव्हाड यांना पुरस्कार जाहीर

करमाळयाच्या कन्येची राज्यसेवेतून केंद्रीय सेवेत पदोन्नती

जेव्हा केव्हा या महामारीच्या काळातला इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अकोले तालुक्यातील सर्व शिक्षकांनी सुसज्ज सेंटर उभारून अनेक रुग्णांना प्राणवायू उपलब्ध करून देत त्यांचे प्राण वाचवले होते अशी नोंद सुवर्ण अक्षरांत घेतली जाईल.

कोण्या कवीनं लिहून ठेवलेलं आणि ख्यातनाम गायक अरुण दाते यांनी गायलेल्या भावगीतातल्या ओळी आठवतं आहेत—
आयुष्याला उधळीत जावे
केवळ दुसऱ्यापायी।।
या त्यागाच्या संतोषाला
जगी या उपमा नाही।।
जन्म असावा देण्यासाठी
एकचि मनाला ठावेll

समाज अडचणीत सापडलेला असतानाच्या कठीण काळात सामान्य लोकांच्या मदतीला धावून आलेले शिक्षक त्यागातला हा संतोष सध्या अनुभवत आहेत. हा शब्दप्रपंच त्यांना अर्पण करत आहे.

भाऊ चासकर
अकोले.
तारीख : तीस चार दोन हजार एकवीस

litsbros

Comment here