दुर्दैवी: स्थळ पाहण्यासाठी जाताना भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तीन ठार
सोलापूर : जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले आहेत व चौघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतदेह अक्कलकोट येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत, तर जखमींना स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कर्नाटकातील इंडी (जि विजयपूर) गावावर शोककळा पसरली आहे.
स्थळ पाहण्यासाठी जात असताना अपघात – गुलबर्गा (कर्नाटक) जिल्ह्यातील आळंद येथे मुलाला स्थळ पाहण्यासाठी निघाले असता अक्कलकोट जवळील शिरवळ गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. इंडी गावातील प्रतिष्ठित असे कुटुंब म्हणून त्यांची ओळख आहे. बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. निसार मच्छीवाले अशी त्यांची इंडी गावात ओळख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उमामा लष्करे (वय 3) , बशीरा सलगरे (वय 35 ), जुबेर लष्करे (वय 22) व खालिद लष्करे (वय 55) चौघे रा इंडी,जि बिजापूर,कर्नाटक अशी जखमींची नावे आहेत. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. सदर घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
चिमकुलीसह दोन पुरूषांचा जागीच मृत्यू – अक्कलकोटहुन आळंदकडे भरधाव वेगाने निघालेल्या चारचाकी कारची समोरून येणाऱ्या ट्रकला शिरवळजवळ (ता. अक्कलकोट) जोरात धडक बसली. त्यात एका चिमुकलीसह दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिन्ही मृतदेह अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे. तर जखमींवर स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
असा झाला अपघात – अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावावरून फरशी घेऊन सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या
ट्रकला आळंदकडे जाणाऱ्या अल्टो कारने (एमएच 12 सीवाय 5552) समोरून धडक दिली. दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला आहे. चारचाकी वाहनाचा वेग खूप होता, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. रस्ता मोठा असताना देखील कारचालकाचा ताबा सुटला आणि सरळ कार ट्रकला धडकली. त्यात कार चालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे. अतिवेग व सलग ड्रायव्हिंग हेच अपघाताचे कारण असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
Comment here