** आलं मनात उतरलं कागदावं **
( मराठी शाळेने आता वयाची साठी वलांडलीय )
*****
आता बघा तसं बघायला गेलं तर मला पण काही एवढं आठवत नाही पण लय डोसकं खाजवून खाजवून आठवलं म्हणजे…आलं मनात आणि उतरलं कागदावं…कारण ती वेळ होती 66 सालची आणि मी होतो इयत्ता पहिलीत ही लिहायची बुद्धी कुठून सुचली आता बघा आमची नातवंड म्हणजे दोन पोरींच्या दोन पोरी म्हणजे नाती… पार सकाळी सहाला असल्या कडाक्याच्या थंडीत उठून जेवणाचा छोटासा टिफिन म्हणजे एखाद्याला वाटल चपाती भाजी आणि थोडासा वरण भात पण हे असलं खाण्यावर बंदी त्यांचा डबा टिफिन म्हणजे एखादा केक किंवा ब्रेड स्लाईस अन फ्रुट जाम नाहीतर सॉस आणि ती शाळेत सोडायला जायला इथं कोणाला वेळ आहे सगळं कसं बुद्धिबळाच्या पटावरचे प्यादे कसं दान पडल्यावर आपोआप पुढे सरकतात अगदी तसंच शाळेत न्यायला त्यांना दाराशी व्हॅन येऊन उभी राहते.
पण स्कूल व्हॅन अगदी दोघीच्या पण दारात येते साडेसहा वेळ येण्याची पण ही चिल्लर कंपनी 6.25 लाच दारामध्ये हजर व्हॅन हलली की बाय बाय करायच्या तयारीत आता एवढा इतिहास सांगायचा म्हणजे मी पण एकेकाळी इयत्ता पहिलीत होतो पण आम्हाला शाळेत सोडायचा कार्यक्रम म्हणजे एक सोहळाचं असायचा कारण सकाळ सकाळी एक तर ती खेड्याची थंडी येड्यावानी असती अव बोलतानी नाहीतर नुसतं खोकलं तरी पण असं वाटतंय चारमिनारच पेलंय तेव्हा धूर म्हणजे वाफ बरं का तोंडातून बाहेर पडायची सकाळच्या पारी बहुतेक अंधाऱ्या सकाळची ती आंघोळ दिवाळीच्या पहिल्या आंघोळी वाणी वाटायची मस्तपणे कपडे घालायचं डोक्याला पचपचीत खोबरेल तेल लावलेलं असायचं पण बघा एखाद्या पोरीला सासरी दुनियाचा सासरवास असतोय एक तर सासरवास अन माहेरचे लावतात तगादा नांदायला जायचा अशा वेळेला तिच्या मनाविरुद्ध होत असतयं अगदी तसलीच गोष्ट आमच्या नशिबात आम्ही काय शाळेमध्ये खुशीत जायला तयार नसायचो तवा आमची आई उंबऱ्याच्या आत एखादी गचांडी नाहीतर गालावर चापटी मारून मग आमचं शाळेच्या दिशेने प्रस्थान सुरू व्हायचं आईच्या एका हातात चप्पल आणि दुसऱ्या हातात आमचा हात त्यो हात आई पुढे वडायची आणि आम्ही मागं वढायचो अशी आमची पदयात्रा चाललेली असायची असं वाटायचं काय ही दादागिरी पण ती बोलायचं वय नव्हतं वय होतं ती गपचिप दोन-चार फटके खायचं.
बरं आमची गणना चांगल्या हुशार आणि चुणचणीत पोरांच्या मधी व्हायची तेवढाच काय तो अभिमान वाटायचा पण हे बघा ती एक वय असतं कधीतरी थोडं खोटं बोलायचं असतं कधी शाळेचा कंटाळा आला तर थोडं डोकं चालवायचं नुसता नाकानच हळूहळू हुंकार द्यायचा आई विचारायची काय होतयं तेव्हा सांगायचं आई गं sss पोट लय दुखतंय आज शाळेला जाणार नाही आई म्हणजे काय एक तर तिचं मन लय मायाळू ती थोडी काळजीपोटी म्हणायची बरं झोप वरून अजून एखादी गोधडी टाकायची पण आम्हाला ती रंगभूमीवरची पोट दुखीची भूमिका म्हणावी तशी साकार करता येत नव्हती थोडी अंघोळ पांघोळ झाल्यावर चहा बटर खाऊन पॉश मधी हातामध्ये भवरा… इटीदांडू… नाहीतर गोट्या घेऊन जेव्हा आम्ही बाहेर जायचो बोंबलत हिंडायचं तेव्हा त्या पोट दुखीचा आईला पक्का अंदाज यायचा कारण की त्यातली डॉक्टर होती त्या दिवशी ती काही म्हणत नसायची पण उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी वलांडून जातानी लाथनी सरकवायची आणि उठ कि आता म्हणायची दोन सेकंदांनी कंबरवर हात ठेवून पुन्हा उभी आम्ही काय उठलेलं नसायचं पण नजरा नजर झाल्यावर डायरेक्ट गडग्याच्या मोरीत गरम पाण्याच्या अगोदर आम्ही मोरीत हजर
साधारण बघा त्या वेळेला नामांकित गुरुजी लोकांची फलटण पोमलवाडीला तैनात केलेली होती ही सात आठ शिलेदार गुरुजी मंडळी मराठी शाळेचा गड लढवायचं काम करायचे आणि परिसरातल्या शाळेपेक्षा आपल्या शाळेचं नाव मोठं करायचे दरवर्षी निकाल पण चांगला लागायचा त्याच्यामध्ये एक मुख्याध्यापक होते माननीय पोळ गुरुजी म्हणजे सगळे त्यांना सेनापती समजायचे यांना सगळे गुरुजी टरकायचे रंग सावळा..धोतर…नेहरू शर्ट…टोपी… खिशाला दोन चार पेन…चालू होते का नव्हते काय माहित नाही पण त्यांनी फक्त एकाच पेननी म्हणजे निळ्या शाईनी लिहीलेलं मला चांगलं आठवतंय त्यांचं एक तत्त्व होतं काही कारणाने रागावले तर चेहरा खाली जमिनीकडे डोळे समोर असे काही बघायचे कि बुबळे दिसत नव्हती फक्त पांढरी कोर दिसायची शरीर यष्टी मजबूत होती त्यांचा एक दरारा होता.
दुसरे होते आमचे माननीय निंबाळकर गुरुजी त्यांची मात्र पहिलीपासून सातवीपर्यंत सगळ्यांना एक दहशत सगळी पोरं जाम चपापायची ते राहायचे माननीय रघुनाथ लोखंडे यांच्या वाड्यात पण तिथली हुलग्यांची पोरं खेळायला मारुतीच्या देवळाजवळ यायची एवढा धाक कारण शर्ट असायचा लांब बाह्याचा बर असू द्या आपल्याला काय करायचयं त्याचं पण तो कोपराच्या वरपर्यंत दुमडलेला त्यामुळे दंडाच्या बेटकुळ्या असायच्या बारक्याच पण गडी फडातल्या पैलवानवानी दिसायचा आणि भरीत भर म्हणून चालताना दोन्ही पण हात जरा शरीरापासून किंचित लांब केलेले असायचे त्यामुळे नुकतंच जिम मधनं आल्यावाणी वाटायचं बरं महत्त्वाचं म्हणजे त्यांचा एकच उद्देश विद्यार्थी हुशार असो का नसो फटका लावायचा मला तर लागोपाठ एका कारणामुळे दोनदा मारलं पहिल्यांदा विचारलं नाव काय मी सांगितलं किरण…फटका…बापाचं नाव नाही का पूर्ण नाव सांग दुसऱ्यांदा विचारलं नाव काय मी सांगितलं किरण बाबुराव बेंद्रे…पुन्हा फटका… लय शहाणपणा करतो का विचारलं तेवढेच सांगायचं कामापुरतं बोलायचं आता काय बोलायचं असल्या विचारसरणीला बर दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही घरात मी अन आई-वडील शाळेत वात्रटपणा केला अभ्यासात मार खात नव्हतो खात होतो ती वात्रटपणामुळे तवा कोणत्यातरी गुरुजींनी मारलेलं असायचं घरी गेल्यावर कौतुकाने सांगायला जावं तर आई अन बाप मिळून दोघं पण हात धुऊन घ्यायचे तवा झोपताना आई बापाला म्हणायची जरा उद्या शाळेत जा आणि बघा ह्याला कोणी मारले आणि का मारले बाप आधीच आदल्या रात्री फुल्ल झालेला असायचा मास्तरचं अन त्याचं काय हळूहळू हितगुज व्हायचं मास्तर म्हणायचं अभ्यासात मस हुशार आहे व पण वळण चांगलं लागावं.
तवा बापाच्या डोक्यातली ट्यूबलाईट पेटायची मास्तर देखत पुन्हा एकदा मारामारीचा सीन व्हायचा असं वाटायचं बाप पण मास्तरच ऐकून मलाच मारतंय कसलं लोक धार्जिनं म्हणायचं बर बाकीचे गुरुजी तसं बघितलं तर लय मायाळू म्हणजे माननीय काळे गुरुजी…माननीय गणगे गुरुजी… माननीय रणदिवे गुरुजी… माननीय जाधव गुरुजी… माननीय निंबाळकर गुरुजी… माननीय धुमाळ गुरुजी ते राहायचे सोनाराच्या वाड्यात आम्हाला वाटायचं ती आपल्या घरचाच माणूस आहे आणि आपल्या माननीय शालन बाई निसळ आणि माननीय जाडकर बाई म्हणजे त्या बाई आहे का आई हेच कळत नव्हतं घाईघाईत आलेल्या पोरींची वेनीफनी सुद्धा त्या कधीकधी करायच्या पण काहीही म्हणा ती जाळीची शाळा आणि ती पोस्टाजवळची खालची शाळा कांही केल्या डोळ्यासमोरून 58 वर्षे झाल्यात पण जात नाही
नंतर पुढे थोडं मोठ्या वर्गात गेल्यावर एक होतं गावकऱ्याचं पोरगं त्यांनी दोन-चार दिवस शाळेचा अभ्यास न केल्यामुळे गुरुजींनी त्याला मारलं तरा तरा गेलं रडत शाळेतनं आणि उद्या आप्पाला शाळेत घेऊन येतो म्हणून म्हणालं खेड्याची पोरं गुरुजींना हवा भरायला लागले गुरुजी आता तुमचं काय खरं नाही तुमची बदली पण होईल इकडे गुरुजीला आलं टेन्शन सांगितलं हेडमास्तरला हेड मास्तर म्हणाले तुम्ही वर्गवरच रहा मी बोलावल्याशिवाय येऊ नका झालं ना दुसऱ्या दिवशी आप्पा शाळेत आला आप्पा म्हणजे अख्खा गाव त्याच्या ताब्यात आल्या आल्या हेडमास्तरच्या समोर बसून म्हणतंय कसं ते आमचे गुरुजी कुठे आहेत त्यांनी आमच्या ह्याला मारले तवा हेडमास्तरांनी त्या गुरुजीला बोलवायला शिपायाला पाठवलं गुरुजी गेले रामराम वगैरे झाला विचारलं काय झालं तर मी सांगितलं तेव्हा त्याला विचारलं गुरुजी सांगत्यात ही खरयं का तवा ती पण व्हय म्हणलं नंतर आप्पा मास्तरला म्हणतयं कसं आता इथनं पुढे असं झालं तर… दोन सेकंद काहीच बोलाना मास्तरची उत्कंठा शिगेला पोहोचली सगळं ध्यान आप्पा काय म्हणतय इकडं…तेव्हा आप्पा म्हणाला शाळेच्या मैदानात खड्डा करायचा ह्याला तिथेच पुरायचा काही खर्च येईल ती मला सांगायचा मी सगळा खर्च देईन काय टेन्शन घेऊ नका माझ्या देखत कंबरत लाथ घातली असे पण पालक दूरदृष्टीचे असतात हीच पोरगं स्कॉलरशिपला अख्ख्या वर्गात पास झालं बरं
नंतर काय झालं सांगाय सारखं म्हणजे तवा आमच्या शाळेला फारशा नव्हत्या मातीने सारवायचे वर्ग होते दर शुक्रवारचा बाजार अर्धी शाळा असायची गुरुवारी तेवढं आम्ही दोन-चार थोराड दिसणारी पोरं पण स्टेशनच्या नळावरनं बादलीने पाणी दोघा दोघांनी एक बादली असं करून आणायचं वाडी वस्तीवर राहणारी पोरं शेणाचा पव आणायचे शाळेतच पोरी वर्ग सारवून घ्यायच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार सरस्वतीची पूजा करायची दोन-चार नारळाचा पण प्रसाद पुरत नसायचा त्याच्यानंतर थोडा फार अभ्यास करून 10-11 ला शाळा सुटायची दिवसभर बर्फाच्या कांड्या खात उन्हाळा साजरा करायचा रसूलभाई कडून आणलेलं वाट्यावरचं मटण पहिलं पिवळं पिवळं प्यायचं आणि तीच पिवळं दुपारच्या जेवणाला पण खायचं का तर आमची आई आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला अजिबात म्हणजे थोडं पण तिखट देत नव्हती
…………………………………………………………
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
Comment here