देश/विदेशमनोरंजनमुंबई

ए.आर.रहमान यांनी बदलून टाकला दिखाऊ भंपकपणाचा “मौसम”!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ए.आर.रहमान यांनी बदलून टाकला दिखाऊ भंपकपणाचा “मौसम”!

इंडियन आयडॉल च्या १२ व्या पर्वामध्ये पाहुणा म्हणून मोझार्ट ऑफ मद्रास ए. आर. रहमान येणार असं समजलं, आणि आपण हा कार्यक्रम पहायचाच, असं ठरवून टाकलं. या आधी देखील काही स्पर्धकांची गाणी मी ऐकली होती. त्या गाण्यांवर परिक्षक कशा प्रतिक्रिया देत होते, हे सगळा देश पाहतोच आहे.

एकदा संगीतकार अनु मलिक कुणाचं तरी गाणं ऐकून जमदग्नीचा अवतार धारण करून आरडाओरडा करत स्टुडिओ सोडून निघूनच गेले आणि बाहेर जाऊन रस्त्यावर लोकांना ओरडून सांगून पुन्हा परत आले. अभिनेत्री रेखा पाहुण्या म्हणून आल्या आणि चक्क स्पर्धकांच्या आवडीच्या जेवणाचा डबाच घेऊन आल्या आणि त्यांनी स्टेजवरच स्पर्धकांना घास भरवले. त्या गजरा घेऊन आल्या, साडी घेऊन आल्या, चांदीची नाणी घेऊन आल्या. असली कसली स्पर्धा? हे म्हणजे बारावीनंतरच्या मेडिकल एन्ट्रन्सच्या वेळीच क्लासरूम सुपरवायझरने स्वखर्चानं प्रत्येक विद्यार्थ्याला स्टेथोस्कोप वाटण्यासारखं आहे.

पाळण्यात असतानाच फिल्म फेअर ॲवार्ड?
उदित नारायण अगदी लडिवाळपणे अलका याज्ञीक यांचं जाहीर कौतुक करत होते, तोवर मागून त्यांच्या पत्नीला स्टेजवर आणलं गेलं. जॅकी श्रॉफ ने तर कमाल केली. स्टेजवर येऊन धोतर नेसलं, कुडता डोक्यातून जाईना तर कुडता फाडला, राम लखन मधल्या गाण्यावर अभिनय (?) करण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या एका स्त्री स्पर्धकाने माधुरी दीक्षित चा अभिनय केला. स्पर्धा आहे की विविध गुणदर्शन आहे, हेच कळेना.

हे सगळे व्हिडीओ मी पाहिले होते. ही कसली रिॲलिटी? हे तर सगळं आधीच ठरवलेलं असणार, हे शेंबड्या पोरालाही कळेल. या सगळ्या शोबाजी विषयीची नाराजी प्यारेलालजी यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. बाकीचे सगळे तर मजा करायलाच आल्यासारखे आले होते.
“आऊट स्टॅन्डींग, माईंड ब्लोईंग, मैं आपका दुनिया का सबसे बडा फॅन हू” हे सगळे संवाद ह्याच्या आधीचे ११ पर्वांमधले विजेतेसुद्धा ऐकतच होते.

पण आज ते कुठं आहेत? त्यांच्यापैकी कितीजणांना चित्रपटसृष्टीमध्ये काम मिळालंय? ज्या संगीतकारांनी त्यांचं तोंड भरून गुणगान केलं होतं, त्यांनी तरी त्या स्पर्धकांना काम दिलं का? पार्श्वगायन नाही, निदान कोरस मध्ये तरी गाण्याची संधी दिलीय का? मग हे ‘देखल्या देवा दंडवत’ चं नाटक कशासाठी?

गाणं सुरू असताना परिक्षक स्वतःच नाचत असतात, पार खुर्चीवर चढून उभे राहतात. गाणं झाल्यावर पळत पळत स्टेजवर जातात, स्पर्धकांना मिठी मारतात. एका गाण्याच्या वेळी परीक्षकांनी एका स्पर्धकाला “तुला कसा नवरा हवा?” असं विचारलं होतं. आता ए. आर. रहमान आल्यावर काय होतं, याची उत्सुकता होती. गाणं सुरू झालं की, अन्य स्पर्धकही उठून नाचायला लागतात आणि त्यांचे पालकही उठून नाचायला लागतात. हा स्पर्धेचा भाग आहे की स्पर्धेच्या नावाखाली दुसरंच काही चालू आहे, असं सतत वाटत राहतं. रहमान यांना बघून षण्मुखप्रिया ज्या प्रकारे नाचायला लागली, ते फार फार बालिश वाटलं मला.

रहमान आल्यावरही तेच झालं, रहमान सोडून अन्य परिक्षक प्रत्येक गाण्यावर उठून नाचतच होते. पण रहमान हे मात्र अत्यंत गंभीर मुद्रेने प्रत्येकाचं गाणं ऐकत होते. स्वतःचीच गाणी इतरांच्या तोंडून ऐकत असताना माणूस अधिक सावध होतोच. आपण तयार केलेली मूळ चाल नेमक्या कोणत्या विचारानं बांधली, याचा त्यांचा अभ्यास पक्का असणारच. प्रत्येक चालीमागचा तो मूळ विचार आणि प्रत्यक्षात समोर सुरू असणारा सादरीकरणाचा प्रयत्न हे दोन्ही एकमेकांशी अजिबातच जुळत नाही, याचा खेद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, असं मला वाटलं.

स्पर्धक त्यांच्या मनाप्रमाणे मूळ गाण्यांची खुशाल तोडफोड करत होते आणि त्यावर अन्य परिक्षक मस्त थिरकत होते, ही गोष्ट रहमान यांना मुळीच पटली नसावी. कुणी वेगळं गाऊ लागला की, त्यांचा चेहरा गंभीर व्हायचा आणि गायकाकडे डोळे अधिक रोखले जात. मूळ संगीतरचनेत मनाजोगे बदल करून ते सादर करण्याची स्पर्धा होती का? नव्हती. तरीही हा उपद्व्याप करण्यात आला.


एखादं स्वत:चं संगीतबद्ध केलेलं गाणं सादर करण्याची देखील फेरी अशा कार्यक्रमांमध्ये असली पाहिजे. मातृभाषेतली गाणी सादर केली गेली पाहिजेत. चार-चार मराठी स्पर्धक स्पर्धेत असतानाही एकही मराठी गाणं त्या मंचावर का सादर केलं गेलं नाही? बाकीचे स्पर्धक त्यांच्या भाषेतली लोकगीतं गातात ना, मग मराठी स्पर्धकांना अडचण काय होती? मराठीतही अनेक दिग्गज संगीतकारांची कितीतरी जगद्विख्यात गाणी आहेत. “मी माझ्या भाषेतलं गाणं गातो किंवा गाते” असं का घडू नये? की, मराठी स्पर्धकांना त्या मंचावर मराठी गाणी गाण्याची परवानगी नाहीय? एवढ्या मोठ्या स्पर्धेत पंजाबी गाणी चालतात, तमिळ गाणी चालतात, भोजपुरी चालतात, मग मराठी का नाही?

आजवर आलेले पाहुणे कलाकार कसे अगदी उत्साही असतात, गातात, नाचतात, सारखे स्टेजवर जातात, “दिल खूष कर दिया”, “माईंड ब्लॉईंग”, “आऊट स्टँडिंग” इत्यादी प्रतिक्रियांचा सुळसुळाट झालेला असतो, इथे तर यातलं काहीच घडेना. त्यामुळे, कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकाला रहमान यांना विचारावं लागलं की, तुम्ही प्रतिक्रिया का देत नाही? त्यावेळी रहमान यांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे, ते म्हणाले, “मी इथं गाणं ऐकायला आलो आहे आणि गाणं एकाग्र होऊन ऐकावं लागतं.” उत्तर अगदी खरं आणि स्पष्ट होतं. लोकांना काय समजायचं ते समजलं. जे मोजकं, मुद्द्याचं, महत्वाचं बोलणं गरजेचं होतं, तेवढं रहमान बोलले.

कुठलीही दिखाऊ प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही. पण कक्कर बाई मात्र वारंवार उभं राहून “क्या गानें हैं यार… what songs…” असलं काहीतरी बोलून लोकांना टाळ्या वाजवायला लावत होत्या. पण खरी टाळी ‘घेतली’ ती ए. आर. रहमानानीच…!
रहमान यांनी त्या कार्यक्रमाचा इव्हेंट होऊ दिला नाही, हरभऱ्याच्या झाडावर चढवणारा कौतुक सोहळा होऊ दिला नाही आणि कुणाचीही खोटी स्तुती वगैरे केली नाही. डोळ्यात पाणी येणे, ढसाढसा रडणे, जोरदार दाद देणे, ओरडणे, स्टेजकडे पळत सुटणे असले प्रकार त्यांनी केले नाहीत.

यातून खूप काही समजून घेण्यासारखं आहे… रहमानानी सगळ्याच रिॲलिटी शोज् च्या परिक्षणाला आरसा दाखवला हे बरं झालं. ते गरजेचंच होतं. “मी कुणीतरी फार मोठा श्रेष्ठ माणूस आहे” अशी आढ्यता त्यांच्यात नव्हती, उलट “विद्या विनयेन शोभते” अशीच त्यांची देहबोली होती. केवळ दिखाऊ भंपकपणाचा “मौसम” बदलून टाकल्याबद्दल रहमान यांचं मन:पूर्वक अभिनंदन..!

ए.आर.रहमान यांना ‘मोझार्ट ऑफ मद्रास’ म्हणतात ते उगीच नाही..!

लेखक : मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

litsbros

Comment here