100 दिवसात 7 वी आवृत्ती; ‘जग बदलणारा बापमाणूस’ ठरले बेस्ट सेलर; गल्ली पासून दिल्ली पर्यंत पुस्तकाची चर्चा !

100 दिवसात 7 वी आवृत्ती; ‘जग बदलणारा बापमाणूस’ ठरले बेस्ट सेलर; गल्ली पासून दिल्ली पर्यंत पुस्तकाची चर्चा !

पुणे(प्रतिनिधी); “नवी पिढी पुस्तके वाचत नाही, पुस्तके खरेदी करत नाही” असे अनेकांकडून सध्या बोलले जात आहे. परंतु ‘जग बदलणारा बापमाणूस: या पुस्तकाच्या विक्रीने हा गैरसमज मोडून काढला आहे. आजच्या तरुणाईला त्यांच्या भाषेत, त्यांना समजेल, उमजेल अशा भाषेत लिहिलेले पुस्तक दिले तर ते आवर्जून खरेदी करून वाचतात असे या पुस्तकाच्या विक्रीच्या विक्रमातून दिसून येत आहे.

प्रेरणादायी व्याख्याते व लेखक जगदीश अशोक ओहोळ यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी प्रेरणादायी पद्धतीने लिहिलेले ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पुस्तक 3 डिसेंबर 2023 रोजी पुण्यात फुलेवाडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात प्रकाशित करण्यात आले.

‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक वाचताना सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील

त्यानंतर अवघ्या शंभर दिवसात म्हणजे 13 मार्च 2024 पर्यंत या पुस्तकाच्या सात आवृत्ती प्रकाशित करण्यात आल्या आहेत, असे प्रकाशिका छाया जायकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या पुस्तकाला तरुणाईकडून विशेष मागणी आहे. तसेच महाराष्ट्र सह महाराष्ट्राच्या बाहेर व अगदी दुबई, अमेरिका, युरोप या देशात ही मराठी वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचले आहे. या पुस्तकाबद्दल अनेक दिग्गज विचारवंत लेखक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेले आहेत.

‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक वाचताना देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब

‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकास ज्येष्ठ विचारवंत, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी प्रस्तावना लिहिली असून लेखकाचे पाठराखण पर शब्द प्राच्यविद्यापंडित डॉ. आ ह साळुंखे यांनी लिहिले आहे. तसेच या पुस्तकाबद्दल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर, बीबीसीचे संपादक अभिजीत कांबळे यांच्यासह अनेक दिग्गज अभ्यासक, विचारवंत व पत्रकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक वाचताना प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू भाऊ कडू

पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आठ दिवसातच या पुस्तकाची प्रथमावृत्ती संपली व पुस्तकाची सर्वत्र चर्चा सुरू झाली. नव्या पिढीला समजेल अशा प्रेरणादायी शब्दात हे पुस्तक लिहिल्याने तरुणाईने या पुस्तकाला विशेष पसंती दिली आहे. तसेच अशा प्रकारे मोटिव्हेशनल पद्धतीने शून्यातून विश्व निर्माण करणारे सर्वांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर, जातसंघर्षाच्या पलीकडे प्रत्येकासाठी कसे प्रेरणादायी आहेत? ते अजून आमच्या वाचनात आले नव्हते अशा प्रतिक्रिया वाचक देत आहेत.

वंचितचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांना पुस्तक भेट देताना लेखक जगदीश ओहोळ

अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमात, वाढदिवसाला, सत्कारासाठी हे पुस्तक लोक एकमेकांना भेट म्हणून देत आहेत, तसेच भीमजयंती निमित्त वितरणासाठी या पुस्तकाला आतापासूनच मोठी मागणी होऊ लागली आहे. हे पुस्तक मिळविण्यासाठी 8956960801 या क्रमांकावर संपर्क करावा.

हेही वाचा – करमाळा येथील रुबीना मुलाणी यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते महिला दिनाच्या पूर्व संध्येला झाला सन्मान

करमाळा कुटीर रुग्णालयाचे नाव बदलून ‘हे’ नाव देण्याची मागणी; तहसीलदार यांना निवेदन

जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाला मिळत असणारा प्रतिसाद हे बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचे, संघर्षाचे यश आहे. नव्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून त्यांना पचतील, पटतील व रूचतील अशा भाषेत बाबासाहेब सांगणे हे माझे कर्तव्य होते ते मी करत आहे व ते सर्वसमावेशक पद्धतीने सर्वांना आवडले आहे हे मला जास्त महत्वाचे वाटते. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही चौकटीत बांधावे असे व्यक्तिमत्व नाही त्यांचं कार्य हे जागतिक स्तरावरील असून जगाला प्रेरणा देणारे आहे, असं आपण म्हणत असतो पण ते या पुस्तकाच्या माध्यमातून सप्रमाण वाचकांना दाखवून देण्याचा प्रयत्न मी केला आहे. हे पुस्तक जात, धर्म, प्रदेश सीमा ओलांडून सर्वव्यापी झाले तशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत याचा मनस्वी आनंद वाटतो. वाचकांच्या मागणीनुसार लवकरच हिंदी आणि इंग्रजी भाषेत भाषांतरित आवृत्ती प्रकाशित करू.

— जगदीश ओहोळ
लेखक व व्याख्याते

दुबईतील वाचक सुरज लोंढे

karmalamadhanews24: