करमाळा

‌उजनी परिक्रमा.. गेल्या पंचवीस वर्षात उजनीचे काय झालं..? वाचा उजनीचा सविस्तर इतिहास

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‌उजनी परिक्रमा …गेल्या पंचवीस वर्षात उजनीचे काय झालं..?

लेखन- अक्षय आखाडे ; उजनी हे पश्चिम महाराष्ट्राला लाभलेलं महत्वाचं आणि राज्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेले धरण.एक दोन नाही तर चक्क चार नद्या इथं एकत्र येतात. मुळा , मुठा, पवना आणि इंद्रायणी या सगळ्या नद्यांच पाणी एकत्र येतं आणि भीमा या नावाची एक अथांग मोठी आणि शक्तिशाली नदीच तयार होते.पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्याची जीवनदायीनी ठरलेल्या भीमा नदीच्या नावातच भीम असल्याने या नदीवर बांधलेलं उजनी धरण देखील भीम पराक्रमाइतकंच रुबाबदार आणि अथांग असं आहे.

या भीमा नदी आणि उजनी धरणाच्या बाजूने शेती आणि मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे वाढले. उजनी धरणाने शेती फुलवली, समृध्दी आणली. यातील गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी वाढली , साखर कारखाने निर्माण झाले, दुधाचा व्यवसाय उभा केला वाढवला, गुळाची गुऱ्हाळं वाढली बहरली. आपल्या सर्वांना उजनीनौ हे सगळ उदार अंतःकरणाने बहाल केलं असलं तरी गेल्या काही वर्षात उजनीला मानवाने केलेल्या प्रदूषणाच्या अपरिमित अत्याचाराचा शाप मिळालेला होता.

परंतु कोरोना या रोगामुळे केलेल्या लॉकडाऊनने जसा मानवाच्या जीवनावर परिणाम झाला तसाच परिणाम आपल्या परिवेशात असलेल्या सगळ्याच नैसर्गिक गोष्टींवर झाला का ? लॉकडाऊन झाल्यानंतर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कोणते बदल झाले हे जाणून घेण्यासाठी युवा पत्रकार अक्षय आखाडे यांनी उजनीची सफर केली असता काही महत्त्वपूर्ण नोंदी टिपल्या गेल्या. चला तर मग त्याचाच आढावा आपण या पुढील रिपोर्ताज मधून घेऊयात….

१)पाण्यावर असलेल्या दुर्गंधीयुक्त हिरव्या तवंगाचे काय झाले.?

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मी जेव्हा पुणे – सोलापूर सीमेवरील उजनीचा पट्टा असलेल्या गावांमध्ये फिरलो तेव्हा एकेकाळी स्वच्छ, निर्मळ असलेल्या भीमाईचे सौंदर्य प्रदूषणाने हरवले असल्याचे दिसले. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी पिण्यालायक असलेले उजनीचे पाणी हातात घेण्यालायक सुद्धा राहिले नाही. परिसरातील वापरलेले सांडपाणी तसेच औद्योगिक वसाहतींमधील खराब रसायनयुक्त पाणी, कोणतीही प्रक्रिया न करता थेट उजनी जलाशयात येत असल्याने दूषित झालेल्या पाण्यावर दुर्गंधीयुक्त हिरवट तवंग आल्याने हे पाणी विषारी बनले होते.

परंतु पश्चिम महाराष्ट्राचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनीचे लॉकडाऊनच्या काळात रूपडे बदललेलं दिसेल अशी अनेकांची आकांक्षा होती. या लॉकडाऊन काळात अविघटनशिल घटकापासून धरणाने मोकळा श्वास घेतला असं म्हणता येणार नाही. चार ते पाच महिन्याच्या कालावधीत धरणाच्या पाण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्या, देव- देवतांच्या प्रतिमा अथवा इतर अविघटनशिल पदार्थ कमी झाले तसेच उजनी अथवा भीमेच्या पाण्यावर तरंगत असलेला खच आणि पाण्याला आलेला हिरवा रंग किंचितसा कमी झाला असला तरी उजनीच्या पाण्यात मैला मिश्रित पाण्याचं प्रमाण स्थिरावले असले तरी पाण्यात मिसळलेले रसायन कमी झालेले नाही.

शिवाय मानवनिर्मित प्रदूषणामुळे भीमेचे पाणी अत्यंत विषारी बनलेले आहे. अनेक शहरांना भीमा नदीतून पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो.आरोग्यास हे पाणी हानिकारक असून  नदीच्या पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी वापरणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भीमा नदीच्या गोड्या पाण्यात असलेल्या प्लवंग चे प्रमाण कमी झाल्यामुळे नदीतील पाण्याला हिरवा रंग आलेला आहे. प्लवंग हे माशांचे सूक्ष्म अन्न असून त्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे माशांची वाढ खुंटलेली आहे. अशा काही ठळक बाबी नोंदवता येतील.

२) उजनीवरील फ्लेमिंगो पक्ष्यांचा लांबणीवर पडलेला परतीचा प्रवास :

उजनी धरण परिसर हे देशी – परदेशी पक्ष्यांचे नंदनवन समजले जाते. उजनीच्या या विस्तीर्ण जलाशयाबाबत ही चांगली आणि महत्वाची गोष्ट म्हणावी लागेल. या ठिकाणी थंडीच्या हंगामात अनेक परदेशी पाहुणे पक्षी येत असतात. वृत्तपत्रात काम करत असल्याकारणाने दरवर्षी उजनी परिसरात फिरून निरीक्षणाच्या आधारे परिसरात आढळनाऱ्या पक्ष्यांवर वृत्त करण्याची संधी हमखास मिळते. तशी यंदादेखील ती मिळाली. परंतु यावेळी एकटाच धरण परिसरात फिरलो.

लॉकडाऊनमुळे माणसांची वर्दळ कमी झाल्याने कधी नव्हे इतका मुक्त संचार मिळाल्याचे जाणवले. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण थांबल्यामुळे हजारो किमी अंतर पार करून आलेल्या पक्ष्यांनी यंदा जास्त काळ मुक्काम केलेला दिसला. स्थलांतरीत पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांचे आश्रयस्थान उजनी परिसरात असते. बाहेरून येणार्‍या पक्ष्यांचीही अद्यापदेखील मोठ्या संख्येने रेलचेल आहे. यामध्ये फ्लेमिंगो,  चक्रवाक, बदक, नदीसुरय, कुरकीरा, उघड्या चोचीचा करकोचा (आसाम) आदि पक्षी मोठ्या संख्येने आहेत. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी फ्लेमिंगो हा देखणा पक्षी हजारोंच्या थव्याने मुक्त संचार करताना दिसत आहे.

करड्या, पांढर्‍या  अशा विविध रंगाचे  बगळे, चित्रबलाक, करड्या रंगाचा करकोचा, वकील, वंचक, शराटी किंवा कुदळ्या, वारकरी बदक आदि प्रकारचे स्थानिक पक्षी देखील उजनी धरणपात्रात मुक्तपणे बागडत आहेत. कोणत्याही भिती व वर्दळीशिवाय पक्ष्यांची मुक्तशाळा नदीकाठी भरत आहे. यावर्षी झालेला भरपूर पाऊस यामुळे उजनीमध्ये पक्ष्यांसाठी अत्यंत पुरक अशा प्रकारचे वातावरण होते.

मुबलक मिळणारे जलीय अन्न , निर्भय वातावरण यामुळे उन्हाळ्यात प्रजनन व वीण करणाऱ्या पक्ष्यांसाठी हा कालावधी अत्यंत पोषक व सुरक्षित बनला होता. लॉक डाऊन काळात चंबळच्या खोर्‍यातून येणार्‍या नदीसुरय आणि कुरकीराया पक्ष्यांनी आता अंडी उबवून त्यातून छोटी पिल्ले बाहेर आली आहेत. आसामवरून येणार्‍या उघड्या चोचीचा करकोचा आणखीन मोठ्या संख्येने दिसतो आहे.

अनेक पक्ष्यांच्या दृष्टीने हा अनुकूल काळ आहे. त्यामुळे पुढील काळात, यातील अनेक पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. मागील सुमारे चार महिन्यांपासून अधिक काळ सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे नदीपात्रात माणसांची वर्दळ अजिबात नाही.अनेक दिवस मासळी बाजार बंद असल्याने मासेमारीपण बंद होती. शिवाय पक्षी पर्यटन सुद्धा बंद असल्याने माणसांचा संपर्क नदीपात्रात अत्यंत कमी असल्यामुळेच या पक्ष्यांना मोकळीक मिळाली असल्याचे पक्षी अभ्यासक अरविंद कुंभार आणि कल्याणराव साळुंखे यांचे मत आहे.

३) जलिय परिसंस्था यांना निर्माण झालेला धोका लॉकडाऊन मध्ये देखील आहे तितकाच आहे-

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातून दोन नद्यांच्या माध्यमातून मैला मिश्रित काळे पाणी पुढे येऊन उजनीत मिसळले जाते. या रसायन आणि मैला मिश्रित पाण्यामुळे उजनी धरणातील पाण्याला मानवनिर्मित प्रदूषणाच्या विळख्याने अक्षरशः गटारगंगेचे स्वरूप बहाल केले आहे.

भीमा नदीच्या सौंदर्यावर प्रदूषणाचा घाला घालणाऱ्या अवैध व्यवसायांवर वेळीच निर्बंध न घातल्याचा हा परिणाम म्हणावा लागेल. उजनीच्या पाण्यात अनेक परिसंस्था वास्तव करत आहेत.मग त्या जलिय परिसंस्था असतील अथवा जमिनीवरील परिसंस्था असतील.

जमिनीप्रमाणे पाण्यातसुध्दा अनेक परिसंस्था असतात. पाण्यात जीवन जगणाऱ्या अनेक वनस्पती , पाण्याच्या तळाशी  राहणारे अनेक जलचर प्राणी, विविध जातींचे मासे , खेकडे, झिंगे , कासव , विविध प्रकारचे जलिय साप ,छोट्या-मोठ्या मगरी असे अनेक प्रकारचे जीव उजनीची जलीय परिसंस्था समृद्ध करतात. दुर्गंधीयुक्त हिरवट पाण्यामुळे या परिसंस्था धोक्यात आलेल्या आहेत.

पुणे परिसरात असलेल्या रासायनिक कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या रसायनाचा धोका उजनीत असलेल्या परिसंस्थांना खूप मोठ्या प्रमाणात बसत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि परिसरात असलेल्या दहा नगर पालिका ,जवळपास दोनशेच्या आसपास असलेली छोटी- मोठी गावे , दहा औद्यागिक वसाहती तर काही इतर खाजगी वसाहती, सहकारी आणि खाजगी साखर कारखाने त्याचबरोबर काही शेतमाल प्रकिया उद्योग या सर्वांच्या प्रदूषणामुळे उजनी धरणातील परिसंस्थांची गळचेपी झालेली दिसतेय.

गेल्या काही महिन्यात लॉकडाऊनमुळे अनेक दिवस उद्योग बंद असले तरी उजनीमध्ये असलेल्या परिसंस्थांना पूर्वी जितका धोका होता तितकाच धोका आजही असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. इथली अन्न साखळी आणि परिसंस्था वाचवायची असेल तर वेळीच पाऊल उचलायला हवं.

४) उजनी धरणातील माश्यांचे घटलेले प्रमाण :

उजनी जलाशय राज्यातल्या गोड्या पाण्यातील मासेमारीचे सर्वात मोठे ठिकाणांपैकी एक गणला जातो. या जलाशयाच्या पाण्यावर तब्बल १५ ते २० हजार लोकांचा मासेमारीचा व्यवसाय चालतो. उजनीतील माश्यांना महाराष्ट्रभरातून मोठी मागणी असते. परंतु काठोकाठ भरलेल्या उजनी जलाशयातील पाण्यात मच्छीमारांना मासे मिळण्याचे प्रमाण आता अत्यल्प झाले आहे. कारण इथल्या माश्यांना प्रदूषणाचं ग्रहण लागलंय.

करमाळा, इंदापूर, दौंड आणि कर्जत इत्यादी तालुक्यातील उजनी धरण पट्यात येणाऱ्या ४०० गावांमध्ये सर्रास बोटीद्वारे मासेमारीचा व्यवसाय चालतो. इंदापूर, भिगवण या दोन ठिकाणीच माशांसाठीची मुख्य बाजारपेठ आहे. ही उजनीकाठची मुख्य आणि मोठी गावे आहेत. शिवाय इथूनच उजनी जलाशयातील मासे शहरात पाठवले जातात.

धरणाच्या शेजारील गावातील मासेमारी करणारे मच्छीमार व्यावसायिक इंदापूर आणि भिगवण येथे माश्यांची लिलाव पद्धतीने विक्री करत असतात. भिगवण येथील मच्छी ही चविष्ट म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. साधारणतः दहा वर्षांपूर्वी इथल्या पाण्यात रव , कटला , मरळ , सिमटा ,गुगळी, मांगुर इत्यादी प्रकारचे मासे सापडायचे. मात्र सध्या इथल्या पाण्यात चिलापी हा एकमेव अती घाण पाण्यात तग धरणारा एकमेव मासा सापडतोय. बाकी सगळे मासे नाहीसे झालेले आहेत. त्याचे एकमेव कारण म्हणजे जलाशयातील पाण्याचे वाढलेले वारेमाप प्रदूषण.

उजनीचे पाणी दूषित असल्याची चर्चा होतेच, मात्र इथल्या पाण्यात वाढणाऱ्या माश्यांवरदेखील आता संशय वाढू लागलाय. जर उजनीतल्या पाण्याची अवस्था अशीच सुरू राहिली तर इथल्या चवदार माश्यांना एक दिवस मुकावे लागेल हे मात्र निश्चित….

५) नदीकाठच्या सांस्कृतिक वारशाचे काय ?

तुम्ही कधी पांडुरंगाच्या नगरीत अर्थात पंढरीला गेलात का.? मी अनेक वेळेस गेलोय तुम्ही ही गेला असालच .जशी सगळी माऊली मंडळी पंढरपूरला जातात तसे मी पण जातोच की, पांडुरंगाला हात जोडावे लागतातच हो…हात जोडून पांडुरंगाला मागितलेले मागणं ठीक झालं हो, पण तुम्ही कधी चंद्रभागेत अंघोळ केलीय का.? “चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे ….” म्हणजेच विठ्ठलाच्या दर्शनाइतकचं महत्त्व वारकऱ्यांमध्ये चंद्रभागेच्या स्नानाला आहे.

पंढरपूरला गेल्या नंतर पांडुरंगाचे दर्शन आणि चंद्रभागेचं स्नान या दोन गोष्टी व्यतिरिक्त आपण दुसरा विचार केला नसेल…पण तुम्ही समस्यांची पंढरी पाहिलीय .?….हो मी पाहिलीय आणि अनुभवली देखील आहे. सह्याद्रीतील भीमाशंकर येथे उगम पावलेली भीमा पाऊले चालत पंढरपुरात येते आणि तिची जशी चंद्रभागा होते. तसे तिचे पावित्र्यदेखील वाढत जाते. तरीसुद्धा संतांच माहेरघर म्हणून ओळखलं जाणारे पंढरपूर आज प्रदूषणाने पुरतं बदलून गेले आहे.

हजारो वारकरी चंद्रभागेत अंघोळ करत असले तरी वीस वर्षांपूर्वीची अनुभूती इथल्या पाण्यात अनुभवायला मिळते का असच विचारायला हवं.? लॉकडाऊनच्या कालावधीत सकारात्मक बदल दिसून आलाही असेल परंतु उजनीचाच भाग असलेल्या चंद्रभागेचे पावित्र्य मैलामिश्रित पाण्यामुळे धोक्यात आले आहे.

परिणामी वारीसाठी येणाऱ्या हजारो भक्तांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय. यासाठी निव्वळ शासनाच्या भरोशावर अवलंबून न राहता प्रत्येकाने स्वच्छतेचा वारकरी होऊन चंद्रभागेचं पावित्र्य कायम राखण्यासाठी कार्यरत झाले पाहिजे.
साभार
जागर समाज परिवर्तनाचा
लेखक संपर्क ९३७०९५७४४६ ( ग्रामीण पत्रकार असून शेती ग्रामीण जीवन यात त्यांचा हातखंडा आहे.)

litsbros

Comment here