आम्ही साहित्यिकमहाराष्ट्रराज्य

सुपारीचा मान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

🌹🌹🌹 सुपारीचा मान 🌹🌹🌹

🙏 खरंतर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सुपारीला पहिला मान….. आणि पूजेमध्ये…
🌹…श्री गणपतीचे प्रथम मानाचे स्थान… 🌹
अन सुपारी म्हणजे साक्षात श्री गणेशाचे प्रतीक… या सुपारी फळा विषयी आपण जरा प्रामुख्याने विचार करू…
आता सांगतो तो किस्सा आहे साधारण 80 च्या दशकातला त्यावेळी लग्नामध्ये रुखवत असायचा त्याच्यामध्ये ज्या विविध जिन्नसा असायच्या त्याच्यामध्ये सुपारीचा भरपूर वापर केलेला असायचा म्हणजे बघा बारा सुपाऱ्या ड्रिल पाडून एका तारेमध्ये ओवायच्या खालीवर प्लास्टिकच्या प्लेट उलट्या लावून अर्धे बदामाचे कवच ज्योती लावण्यासाठी अशी रचना करून त्याला सोनेरी रंग दिला की विहीन बाईला भेट देण्यासाठी पितळेची समय तयार.. पाच सुपाऱ्या काळ्या गंधाने डोळे, कान, नाक, ओठ, काढून लाल रंगाचा गंधाचा टिळा वर दहा-बारा लोकरीचे धागे डोक्यावर शेंडी म्हणून…गळ्यामध्ये गोधडी दोरा चार पदरी तिरका घालून जाणवं करायचं बारीक चपटी लेस तिरकी उपरण्यासारखी टाकून सुबक भटजीला तिचं लेणं डोक्याभोवती एक गोल राऊंड म्हणजे पुणेरी पगडी वाटायची
आणि या सर्व किंवा काहींच्या निर्मिती करण्यामध्ये माझ्या होणाऱ्या मालकीणीचा हातखंडा तवा आम्ही दौंडला फराटे गल्लीमध्ये राहायचो खरं बघायला गेलं तर तवापासून माझा अन सुपारीचा घनिष्ठ संबंध कारण एका एका वेळी किलोभर सुपारी पुण्यावरून खरेदी करून आणावी लागायची आणि ही वस्तू इथल्या मोठ्या प्रमाणात क्वचितच कोणीतरी घेत असल आता सुपारी म्हणजे साक्षात गणेशाचं रूप पाहुण्यांच्या बैठकीत पान सुपारी तंबाखूचा विडा याला विशेष मान पण काही वाईट प्रवृत्तीच्या घटकांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये या शब्दाचा वापर ऍडव्हान्स म्हणून केलेला असतो काही गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागतात तर गावच्या जत्रेतील हाच ऍडवांस तमाशा मंडळाला दिलेला ऍडव्हान्सला सुपारीच म्हणतात किती प्रतिष्ठेची बाब लग्न जमवताना दोन्ही पक्षातील कराराची पुष्टी व सफलता याचं प्रतीक म्हणून सुपारी फोडली की दोन्ही पक्ष या मानसिक तणावातून कार्य आणि नातं पक्क झालं याचं समाधान मानतात आता खरंतर याचे मुख्य उत्पादन क्षेत्र म्हणजे कोकण किनारपट्टी आणि भूभाग तसेच गोवा आधी ठिकाणचा समुद्रकिनारा आपल्याकडे किती ऊस बागायती क्षेत्र आहे यावरून श्रीमंतीचं गणित केलं जातं त्याप्रमाणे कोकणामध्ये किती झावळ्या पोफळ्या आहेत यावरून श्रीमंती गृहीत धरतात आता पोफळ्या म्हणजे सुपारीची झाडं खरं बघायला गेलं तर सुपारी या शब्दालाच संस्कृतिक इतिहास आहे आणि संस्कृती म्हणाल तर याला फार मोठा इतिहास असतो.


सर्वसाधारणपणे जेवल्यानंतर अडकित्यात धरून फोडलेलं सुपारीचं खांड चार जणांच्या गराड्यामध्ये आपला मान वाढवत असतं सुपारीच खांड तोंडात चघळणं कनवटीला सुपारी बांधणं विड्याच्या पानावर सुपारी ठेवायची पद्धत हळद-कुंकू अक्षदा वाहा… अक्षदा सुपार्‍या मांडा हे सुपारीचे जुने उपयोग झाले पण कलावंतीण बाईला जत्रेमध्ये नाच गाण्यासाठी सुपारी देणं कधीच बंद झालेलं फक्त आता सुपारीची जागा ऍडव्हान्स नी घेतली सुपारीचं पीक आहे ती कोकणात येतं पण आता शेती क्षेत्रात केलेल्या विविध प्रयोगामुळे मराठवाड्यात सुद्धा सुपारी लागवडीचे प्रयोग सुरू झालेले आहेत त्यासाठी लातूर भागातील जमीन उपयुक्त आहे असे सुपारी तज्ञांचे मत व अनुमान आहे पण सुपारी खाण्याऐवजी सुपारी देण्याच्या व्यवहाराकडेच अधिक कल दिसतो माझा अनुभव तो काय वेगळा असणार आता प्रत्येक माणसाला एखादा विषय हाताळायचा झाला तर एक जिज्ञासा निर्माण होते समुद्र काठावर खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होणाऱ्या सुपारीला गुजरातमध्ये सोपारी…पारशीमध्ये पोपल… कोकणामध्ये पोफळ… पुगफळ…संस्कृतमध्ये छालिया…विविध नावाने ओळख आहे सुपारी ही किंचित तुरट आणि मधुर रसाची असते तिच्या मादक आणि रुचकर गुणामुळे विड्यामध्ये हिला मानाचं स्थान आहे सुपारी स्वतंत्रपणे एके काळी खूप मंडळी येता-जाता खायची त्यासाठी विविध धातूचे आकर्षक असे अडकिते घरोघर असायचे युनानी मतानुसार तोंडातील फाजील थुंकी दूर करण्याचे काम सुपारी करते कच्च्या सुपारीच्या सेवनाने चपटे कृमी मरतात एक काळ असा होता लग्न समारंभामध्ये अत्तर, गुलाब पाणी, फुल, साखरेची पुडी, आणि पान सुपारी म्हणजे विड्याची दोन पानं आणि त्याच्यावर कातरलेली थोडीशी बारीक सुपारी अशी आवर्जून निमंत्रित पुरुष मंडळींना देण्याची प्रथा होती
म्हणून त्याकाळी होणाऱ्या निमंत्रिताच्या स्वागत समारंभाला पान सुपारीची वेळ असं म्हणायचा प्रघात होता त्याकाळी पण सुपारी देण्याची पद्धत शिष्ट संमत होती बहुतेक कुटुंबामध्ये आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करताना त्यांच्यापुढे पान सुपारीचा डबा म्हणजे पानपुडा किंवा तबक ठेवण्याची पद्धत होती पण सुपारी खाणं आणि ती अगत्याने सादर करणे हा एक सरबराईचा भाग समजला जायचा.

घरात एखादा लहानसा घरगुती गाण्याचा कार्यक्रम भजन किंवा कोजागिरीचे जागरण अशा प्रसंगी पान सुपारीचे साहित्य ठेवले जायचं आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या एखाद्या घरामध्ये एखादा साधा पत्र्याचा डबा बहुतेक पूर्वी गॅस बत्तीची मेंटल्स पत्र्याच्या चपट्या डब्यातून मिळायची त्या डब्याचा उपयोग बऱ्याच कुटुंबातून पान सुपारीचा डबा म्हणून होताना दिसायचा आता या मेंटल वरून आठवलं बघा दुनियाची रीत काही न्यारी आहे गॅस बत्ती मध्ये असणारी स्वतः जाळून घेऊन राखं करून घेऊन आपल्याला ट्यूबलाईट सारखा प्रकाश देऊन प्रकाशमान करणारी एक रेशमी जाळीदार पिशवी तिलाच आपण मेंटल म्हणतोय म्हणजे आपण किती शहाणे… चला ही दुनियाची रीतच आहे असं म्हणायचं त्याला आपण तरी काय करणार आहे सुपारीच्या फळाबद्दल सांगायचं झालं तर हे फळ आठळी युक्त असतं दिसायला गोलाकार असतं ते कच्चं असताना कवच हिरवगार असून बी मऊ असतं फळ पक्व झाल्यावर नारंगी किंवा लालसर होतं ते सुकल्यानंतर बी टणक होतं व त्याचा रंग करडा आणि तपकिरी असतो पोफळीचं फळ हे सुपारी पोपळ फळांची कठीण साल काढल्यावर मिळणाऱ्या बीजाला सुपारी म्हणतात
सुपारीचे बी वाळवून पांढरी सुपारी मिळते सुपारीच बी पाण्यामध्ये उकळलं की सुपारीचा रंग तांबडा होतो आणि तिला भरडी सुपारी म्हणतात सुपारीचं बी दुधामध्ये उकळून वाळवलं की तिच्यापासून चिकणी सुपारी तयार होते मस्त सणावाराचे दिवस असावे काही निमित्ताने गोडधोड खाल्ल्यानंतर पचायला सुगंधी पान व सुपारी हवीच बरं का सुरेख भरलेलं ताट त्याचा आस्वाद घेत घेत केलेलं तुडुंब जेवण त्यावर तोंडात टाकायला तांबूल किंवा छानशी सुगंधी सुपारी म्हणजे जेवणाचं एक अतिव सुख असं किती तरी छान जेवणानंतर पोट भरलं की आठवण येते ती मुखव्वासाची मुखवास म्हणजे जेवणानंतर पचनासाठी खाल्ली जाणारी सुपारी आपल्याकडे विविध प्रकारचे तांबूल, सुपार्‍या, सुकामेवा, खाण्याची परंपरा तशी फार जुनी अगदी ऐतिहासिक, पौराणिक काळामध्ये याचा उल्लेख आढळतो.

राजे, महाराजे, सरदार, लोकांकडं पान सुपारीचा सुरेख नक्षीकाम केलेला डब्याचा सरंजाम असायचा सुंदर नक्षीकाम पानाचे डबे, चुन्याच्या डब्या, आडकित्ते, सोन्या चांदीचे सुबक सुंदर वेलबुट्टी असलेले तबक, सहज म्हणून तोंडात टाकले जाणारे वेलदोडे, केशर, आव्हानाचे विडे, एक एक वर्णन एकूणच थाटमाट आता गेला तो काळ पण आवड मात्र आहेच ना अर्थात आपल्यालाच काय देवालाही नैवेद्याच्या ताटाबरोबर तांबूल लागते छान भात, भाज्या, पोळी, गोडधोड, असलेल्या ताटाबरोबर सुबक हिरवागार विडा, ठेवला की नैवेद्याचं ताट कसं परिपूर्ण वाटतं.

आणि दुसरी गोष्ट पाहिली तर सुपारी वरून विषय निघालाच म्हणून सांगतो आमच्या गावातील एक जण खरोखर घरंदाज आणि सरंजामी वाटायचा करवत काठी धोतर, मलमलचा नेहरू शर्ट, डोकी रेशमी मुंडासं, पायात कावळीचा चीक भरलेला कोल्हापुरी जोडा, हातात पानाची छोटीशी पिशवी, थोडासा वजनदार अडकित्ता, ती सुपारी कातरताना कार कार आवाज करीत सुपारी कातरायचा रुबाब अजून पण डोळ्यासमोर दिसतोय
*************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Comment here